पुण्यात अंडरवर्ल्ड शिरलं त्याला अरुण गवळी कारणीभूत ठरला होता…

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या झाली आणि त्याबाबत वेगवेगळे धागेदोरे उलगडू लागले. महाराष्ट्रात खळबळ तेव्हा झाली जेव्हा या प्रकरणात पुण्यातल्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. संतोष जाधव या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याचं अरुण गवळी टोळीशी कनेक्शन असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईतल्या दगडी चाळीतून साम्राज्य उभं करणाऱ्या गवळीनं पुण्यात वर्चस्व कसं स्थापित केलं, हा विषय पुन्हा एकदा चघळला जाऊ लागला. प्रसन्न केसकर यांनी डीएनएच्या एका लेखात गवळीच्या पुणे कनेक्शन बाबत लिहिलं आहे. 

मराठी तरुणांना सुरवातीला सोबत घेऊन अरुण गवळीने आपलं साम्राज्य भायखळ्यात दगडी चाळीत वाढवलं. पण अरुण गवळीने मुंबईच नाही तर पुण्यात सुद्धा अंडरवर्ल्डच्या वाढीसाठी मदत केली.

स्वतःला देशभक्त गुन्हेगार आणि परिस्थितीचा बळी म्हणवून घेणारा अरुण गवळी हा अंडरवर्ल्डमधला सगळ्यात हुशार गुन्हेगार म्हणून ओळखला गेला. पुण्याने गेली २२-२५ वर्षे अरुण गवळीचे अनेक चेहरे पाहिले. 

पुणे शहरात अंडरवर्ल्ड वाढीसाठी पद्धतशीर खंडणी रॅकेट आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंग ऑपरेशन गवळीने राबवली आणि मुलं संघटित केली.

डॅडी म्हणून अरुण गवळी नावारूपाला येण्याआधी किंवा डॉन म्हणून उदयास येण्याआधी पुण्याशी अरुण गवळीचा पहिला संबंध आला तो त्याच्या लव्ह स्टोरीमुळे. खेड शिक्रापूरच्या रस्त्यावरील शांत वडगाव पाचपीर गावात पाच पिरांच्या दर्ग्याचे सुप्रसिद्ध विश्वस्त शेख लाल मुजावर यांनी पुण्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर त्यांची मुलगी आयेशाला तिच्या मावशीसोबत सुट्टीसाठी मुंबईला पाठवले होते. तिथं गवळी आणि आयेशाचं प्रेमप्रकरण फुललं. पुढे आयेशाची आशा गवळी झाली.

हा तोच क्षण होता जेव्हा अरुण गवळी वडगाव पाचपीरचा जावई बनला.

पण हा एक संबंध झाला, अजून एक संबंध गवळीचा ग्रामीण पुण्याशी होता तो म्हणजे त्याची काकू लोणावळा येथे रहिवाशी होते. त्या जोडप्याने गवळीला बरीच मदत केली होती. 

पुण्याला महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणलं जायचं तेव्हा त्या पुण्यात १९९० च्या दशकाच्या सुरवातीला गवळीने आपली दहशत पसरवायला सुरवात केली.

जेव्हा गवळीला टाडा अंतर्गत अटक करण्यात आली आणि येरवडा जेलमध्ये दाखल करण्यात आलं. येरवडा कारागृहात गवळीच्या आगमनाने पुण्यातील त्याच्या टोळ्यांनी मोठा जल्लोष केला होता. पण जितका काळ गवळी जेलमध्ये होता तितकी त्याने पुण्यात आपली दहशत पसरवली.

त्याच्या टोळीने स्थानिक गुंडाना वठणीवर आणलं आणि स्थानिक व्यावसायिकांशी खंडणी व हत्या करण्यास सुरवात केली.

नंतर हळूहळू इतर टोळ्यांनीसुद्धा पुण्यात प्रवेश केला आणि पुण्याची शांतता भंग झाली, यात भरपूर चकमकी वारंवार घडल्या. या टोळीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक स्थानिक गुंडांचा खात्मा केला कारण त्यांनी गवळीचं वर्चस्व धुडकावून लावलं होतं. 

पुण्यातल्या बऱ्याच तरुणांनी स्वतःहून गवळी टोळीत सहभाग नोंदवला. येरवडा कारागृहात बसून गवळी स्वतः ऑपरेशन हॅन्डल करत होता. पुण्यातल्या व्यावसायिकांना खंडणीच्या धमक्या जात होत्या.

पोलिसांनी याला जबर प्रत्युत्तर देत किरण वाळावकर आणि रवी करंजवकर यांच्यासह टोळीतल्या अनेक प्रमुख सदस्यांना ठार केलं. १९९४ च्या सुमारास गवळी तुरुंगात होता तेव्हा लोणावळ्यातील एका मंडळाने त्याला सल्लागार बनवलं. अरुण गवळीने राजकारणात जाण्याचा हा पहिला संकेत होता.

पुढे गवळीने स्वतः याला दुजोरा दिला आणि वकिलांद्वारे त्याने देशभक्त गुन्हेगार आणि परिस्थितिचा बळी असल्याचा दावा केला. तुरुंगातून सुटल्यावर गवळीने आपली अखिल भारतीय सेना सुरु केली आणि पुण्यातल्या अनेक तरुणांनी दगडी चाळीत जाऊन पक्षात नावनोंदणी केली होती.

गवळी पुढे मुंबईत गेला खरा पण पाठीमागे पुण्यात अंडरवर्ल्डचा घाट घालून गेला. कारण जेव्हा गवळी पुण्यात येरवड्यात होता नेमकं त्याच काळात खंडणीच्या केसेस वाढल्या होत्या. 

हे हि वाच भिडू ;

Leave A Reply

Your email address will not be published.