गडकरी म्हणाले होते, आशा पारेख १२ मजले चढून माझ्याकडे पुरस्कार मागण्यासाठी आल्या….

आशा पारेख म्हणजे एक काळ गाजवलेल्या आणि फिल्म इंडस्ट्रीत कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री. नुकतंच त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय, याचं कारण म्हणजे पारेख यांना प्रतिष्ठेचा असा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ केंद्र सरकारकडून जाहीर झालाय. आगामी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांचा हा सन्मान करता येईल.

बरं या पुरस्कारासाठी पारेख यांची निवड करणारी ज्युरीही काय साधी नाही, आशा भोसले, हेमा मालिनी, उदित नारायण, पूनम धिल्लोन आणि टी. एस. नागभरा असली दिग्गज लोकं या ज्युरीमध्ये आहेत. साहजिकच भारतीय चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी मिळणारा हा पुरस्कार अगदी विचारपूर्वक दिला गेला असणार यात शंकाच नाही.

आशा पारेख यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतल्या कारकिर्दीची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यांच्या आईनं त्यांना शास्त्रीय नृत्य शिकायला पाठवलं, त्यात त्यांनी लहानपणीच मास्टरकी मिळवली. मग व्हायच्या फक्त दहाव्या वर्षी १९५२ साली त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री मारली, तो पिक्चर होता ‘माँ.’ एवढ्या लहान वयातच पिक्चरमध्ये काम केल्यानं त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या. खुद्द आशा पारेख यांचा आत्मविश्वासही वाढला.

बालकलाकार म्हणून त्या काही पिक्चर्समध्ये झळकल्या, पण १९५४ मध्ये त्यांचा बाप-बेटी पिक्चर खतरनाक आपटला आणि त्यांनी ठरवलं, ‘बास झाली ऍक्टिंग, आपण आपलं शिक्षण पूर्ण करु.’

पण १९५९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला अभिनय क्षेत्रात एक चान्स द्यायचा ठरवलं, दिल देके देखो या पिक्चरमधून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री मारली आणि तोच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही, कटी पतंग, लव्ह इन टोकियो, आओ मिलो साजना अशा अनेक सुपरहिट पिक्चरमध्ये काम केलं. अगदी १९९९ पर्यंत त्या बॉलिवूडमध्ये कार्यरत होत्या, जवळपास ९५ पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं आणि यासाठीच…

 १९९२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

तुम्ही म्हणाल भिडू इथवर एवढी माहिती दिली, विषयाला हात घाल की… तर कसंय तुम्हाला बॅकग्राउंड माहिती पाहिजे म्हणून एवढं सांगितलं. इतिहास माहित असला की कसं पुढं समजायला सोपं जातंय.

तर १९९२ मध्ये आशा पारेख यांना पद्मश्री मिळाला, आता भारताच्या नागरी पुरस्कारांमध्ये पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार. सगळ्यात मोठा भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, तिसरा पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री.

पण आशा पारेख यांची इच्छा होती की, भारतीय चित्रपट सृष्टीला आपण दिलेल्या योगदानासाठी आपल्याला पद्मभूषण पुरस्कार मिळावा, आता त्यांची ही इच्छा भिडूला कशी कळली, तर नितीन गडकरींनी सांगितलं, थेट आम्हाला नाय सांगितलं तर जाहीर कार्यक्रमात सांगितलं.

२०१६ ची गोष्ट आहे, 

नागपूरमध्ये सेवा सदन संस्थेच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बोलता बोलता त्यांनी काढला पद्म पुरस्कारांचा विषय. गडकरी सांगत होते की, पद्म पुरस्कार मिळावेत यासाठी लोकं कशी मागं लागतात…

मग त्यांनी उदाहरण दिलं आशा पारेख यांचं, गडकरी म्हणाले, ‘आशा पारेख माझ्याकडे आपल्याला पद्मभूषण मिळावा अशी मागणी करायला आल्या होत्या. त्या माझ्या मुंबईतल्या घरी आल्या होत्या. नेमकी लिफ्ट खराब झाली होती, त्यामुळं त्या १२ मजले चढून आल्या याचं मला फार वाईट वाटलं. त्यांचं म्हणणं होतं की, मला पद्मश्री मिळाला आहे, पण भारतीय चित्रपट सृष्टीतलं माझं योगदान पाहता मला पद्मभूषण मिळायला हवं.’

‘या पुरस्कारांमुळे आता डोकेदुखी व्हायला लागलीये,’ असंही गडकरी पुढं म्हणाले. आता तेव्हा पद्धत अशी होती की, मंत्री पद्म पुरस्कारांसाठी नाव सुचवायचे. त्यामुळं साहजिकच गडकरी यांच्याकडे अनेक जणांनी पुरस्कारांची मागणी केली असेल ही शक्यता काय नाकारता येत नाही.

पण जेव्हा गडकरींनी हे विधान केलं, त्यावर आशा पारेख चांगल्याच चिडल्या. त्या म्हणाल्या, ‘गडकरींनी सांगितलेली ही गोष्ट चुकीची आहे आणि मला दुखावणारीही. त्यांनी अशा गोष्टी बोलायला नव्हत्या पाहिजे. मात्र चित्रपट सृष्टीत असे वाद-विवाद होतच राहतात.’

त्यांनी नंतर सारवासारव केली असली, तरी तेव्हा गडकरींच्या वक्तव्यामुळं पद्म पुरस्कारांच्या निवडीवरुन बरेच वादविवाद झाले होते. आता आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानं हा जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आलाय, एवढं मात्र खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.