सौदीचा प्रिन्स आता पंतप्रधान झालाय पण राजकुमारचा इतिहास बघता सौदी खरंच बदलेल का ?
तशी आपली स्टोरी आहे सौदी अरेबियाची पण याची सुरवात करू तुर्कीची राजधानी असलेल्या इस्तंबूलपासून. दिवस होता २ ऑक्टोबर २०१८ चा. अख्या जग महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहत असताना इस्तंबूलमध्ये अशी हिंसक घटना घडली होती ज्याने जग सुन्न झालं होतं. मूळ सौदी अरेबियाचे असलेले पण सध्या तुर्कीमध्ये राहणारे जमाल खशोगी काही कामासाठी सौदी अरेबियाच्या इस्तंबूलमधल्या दूतावासात आले होते.
सौदी अरेबिया सोडून कधी अमेरिकेत तर कधी तुर्कीमध्ये जमाल किशोगी फिरतीवर होते यामागही कारण होतं.
सौदी अरेबियामध्ये असताना त्यांनी राजघराण्याविरोधात लिहलं होतं तसेच तिथल्या राजकीय व्यवस्थेत देखील सुधारणा कराव्यात याच्या बाजूने कशोगी लिहीत असत. मात्र हे लिखाण तितकंसं तीव्र नसायचं त्यामुळे सौदी सरकारने सुद्धा त्यांच्या विरोधात कधी जास्त कारवाई केली नाही. मात्र २०१५ मध्ये कशोगी यांचे ग्रह फिरले.
सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणजेच एमबीएस सत्तेत आले होते. नावाला जरी त्यांचे वडील सत्तेत असले तरी सत्तेची सगळी सूत्र एमबीएस यांच्या हातात आली होती. सत्तेत आल्यानंतर एमबीएस राजघराण्याच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी लागलीच खाशोगी यांच्या लिहण्यावर बंदी घातली.
सरकारकडून चालू असलेली दडपशाही बघून कशोगी यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते सरळ अमेरिकेत गेले.
मात्र तिथं त्यांनी एमबीएसच्य विरोधात असलेला राग बाहेर काढण्यास सुरवात केली. त्यांचं वॉशिंग्टन पोस्टसाठी पाहिलं आर्टिकल होतं ” क्राऊन पोस्ट एमबीएस सत्तेत आल्यानंतर देशात दडपशाही वाढली आहे”. त्यानंतर त्यांनी सौदी अरेबियाच्या राजघरण्यावर, तिथल्या कठोर कायद्यांवर , धार्मिक कट्टरतेविरोधात अनेक आर्टिकल लिहले.
आता पुन्हा येऊ २ ऑक्टोबरच्या घटनेकडे जमाल कशोगी इस्तंबूलमधल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात आले होते.
आपल्या गर्लफ्रेंडला दूतावासाच्या बाहेरच उभा करून झटक्यात काम उरकायचं म्हणून ते आले होते. मात्र तिथं एक सात जणांची टीम त्यांची वाट पाहत होतं. त्यांच्यापुढे मिशन होतं एकतर कशोगील सौदी अरेबियामध्ये घेऊन येयचं किंवा त्याचा आवाज कायमचाच बंद करायचा. कशोगी यांनी पहिली गोष्ट मानण्यास नकार दिल्यानंतर या सात जणांच्या वूल्फ पॅकने दूतावासातच कशोगी यांचा आवाज कायमचा बंद केला.
या प्रकरणाची जगभर चर्चा झाली. या सात जणांनी ज्यांच्या सांगण्यावरून हि हत्या केली होती ते नाव होतं क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान.
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ यांनी त्यांचा मुलगा आणि वारस प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याला राज्याचे पंतप्रधान आणि त्यांचा दुसरा मुलगा प्रिन्स खालिद याला संरक्षण मंत्री पदी नियुक्त केल्याचे शाही फर्मानात म्हटले आहे.
राजे सलमान बिन अब्दुलअझीझ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात इतरही बदल केलेले आहेत मात्र चर्चा होताना दिसते ती फक्त क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांचीच. त्याला कारणही तसच आहे. वडील किंग सलमान यांच्यानंतर सिंहासनावर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बसणार तर आहेच मात्र त्याच्याकडे आधीपासूनच विस्तृत अधिकार आहेत आणि त्याला राज्याचा वास्तविक शासक म्हणून देखील ओळखले जाते.
या सगळ्याआधी आपण सौदीचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊयात.
जगात सर्वाधिक तेलाची निर्यात करणारा आणि इथे अस्तित्वात असलेला ‘शरीया’ कायदा अशी या देशाची विशेष ओळख. मध्य पूर्वेतील वसलेला सर्वात मोठा अरब देश. रियाध सौदीची राजधानी आणि इथलं सर्वत मोठ शहर. मुस्लीम धर्मीयांची पवित्र ठिकाण मक्का व मदिना याच देशात आहेत. इथं पूर्णपणे राजेशाही सरकार असून ‘सलमान बिन अब्दुलअझीझ’ हे सध्याचे इथले राजे. सलमान यांचे वडील अब्दुल अझीझ इब्न अब्द रहमान इब्न फैसल अस् सौद हे सौदी अरेबियाचे संस्थापक आणि पहिले राजे. त्यांनीच १९३२ मध्ये याला ‘सौदी अरेबिया’ हे नाव दिले.
आता जाणून घेऊयात मोहम्मद बिन सलमान यांच्याबद्दल.
३१ ऑगस्ट १९८५ ला सौदीच्या रॉयल परिवारात मोहम्मद यांचा जन्म झाला. ते सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ यांचे सातवे चिरंजीव. जगात त्यांची ओळख MBS अशीच आहे. त्यांनी २००७ साली सौदीच्या रियाध विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. अगदी तरुण वयापासूनच त्यांना प्रशासनाची, राजकारणाची आवड असल्याने वडिलांच्या सोबत राहून या सर्व गोष्टी शिकून घेतल्या. २००९ मध्ये त्यांचे वडिल रियाध चे गव्हर्नर असताना मोहम्मद त्यांचे औपचारिक सल्लागार म्हणून काम करू लागले.
पुढे २०१२ मध्ये त्यांचे वडील सलमान हे क्राउन प्रिन्स बनले त्यावेळी आपला विश्वासू मुलगा मोहम्मद याला त्यांनी कायम त्यांच्यासोबतच ठेवले.
जानेवारी २०१५ मध्ये सौदी अरेबियाचे किंग अब्दुल्ला यांचे निधन झाले आणि सलमान हे सौदीचे राजे बनले. लगोलग त्यांनी मोहम्मद यांची संरक्षण मंत्री पदी नेमणूक केली आणि इथूनच खरी मोहम्मद बिन सलमान यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मोहम्मद बिन सलमान यांची कारकीर्द हि आक्रमक आणि तितकीच वादग्रस्त राहिली आहे. संरक्षण मंत्रीपदी विराजमान होताच काही महिन्यातच मोहम्मद यांनी येमेन च्या गृहयुद्धात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी Operation Decisive Storm सुरु केले.
त्यानंतर मोहम्मद यांना प्रतिष्ठित अशा ‘अरामको’ या तेल कंपनीचे आणि देशाचे प्राथमिक धोरण ठरविणारी प्रमुख संस्था असलेल्या, आर्थिक आणि विकास व्यवहार परिषदेचे प्रभारी म्हणून नियुक्त केले गेले. याचाच फायदा उचलत त्यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी ‘व्हिजन २०३०’ योजना आखली. त्यातीलच एक धाडसी निर्णय म्हणजे अरामकोचा IPO बाजारात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
ज्यातून ऊर्जा क्षेत्राबाहेरील उद्योगांसाठी विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात आला होता.
पुढे मोहम्मद यांची जून २०१७ मध्ये क्राउन प्रिन्स म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर लगेचच त्याने कतार च्या विरोधात भूमिका घेऊन कतारची नाकेबंदी केली. सौदी मधील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकसत्र सुरु केले ज्यामध्ये, डझनभर सौदी राजपुत्र, व्यापारी नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. या कारवाईतून सौदी सरकारने तब्बल 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा केल्याचे मानले जाते. यातून त्याने स्वतःची चांगली प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला त्याच्या हातात सत्ता मिळविणे हा त्याचा मुख्य हेतू होता.
या सत्तेतून मोहम्मद यांना त्यांचे सौदीसाठीचे व्हिजन साध्य करायचे आहे.
यातील त्यांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्टांपैकी एक म्हणजे ‘Global Investment Powerhouse’. देशातील अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणून वाढ करायची असेल तर देशात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आली पाहिजे यावर त्यांचा भर राहिला आहे. मोहम्मद बिन सलमान देशातील “तेलापेक्षा जास्त मौल्यवान” मानतात ते म्हणजे मक्का आणि मदिना. एक अब्जाहून अधिक मुस्लिम जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा काबाकडे वळतात आणि ते सौदी अरेबियामध्ये आहे.
त्याच्या विकासावर त्यांनी भर देण्याला प्राधन्य दिले आहे.
तसेच फायदेशीर भौगोलिक स्थितीमुळे सौदी अरेबिया हे जगाचे प्रवेशद्वार आणि व्यापाराचे केंद्र बनले आहे. त्यानुसार ते आशिया, युरोप आणि आफ्रिका या तीन खंडांना जोडणाऱ्या क्रॉस रोडमध्ये त्याचे रुपांतर करत आहेत. सौदी अरेबिया मुख्यतः त्याच्या तेलासाठी ओळखला जात असला तरी, त्यात सोने, फॉस्फेट, युरेनियम आणि इतर अनेक मौल्यवान खनिजे देखील आहेत.
तथापि, मोहम्मद यांच्यामते, सौदी अरेबियाची खरी श्रीमंती तेथील नागरिकांच्या आकांक्षा आणि तरुण पिढीच्या क्षमतेमध्ये आढळते.
“आमचे लोक पुन्हा जगाला चकित करतील,” अशी आशा मोहम्मद बिन सलमान यांना आहे. मोहम्मद यांना देशातील सार्वजनिक गुंतवणूक निधीला जगातील सर्वात मोठ्या सार्वभौम संपत्ती निधीमध्ये बदलायचे आहे आणि अरामकोला तेल उत्पादक पासून ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुपांतर करायचे आहे. देशातील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि राष्ट्रामध्ये अधिक संसाधने वाढ व्हावी यासाठी आपल्या लष्करी आवश्यकतांपैकी निम्मे उत्पादनाची निर्मिती हि देशांतर्गतच करण्याच्या प्रयत्नात ते आहेत.
याशिवाय ते देशातील आर्थिक व्यवहार वाढावेत याकरिता नागरिकांना स्वातंत्र्य देऊन काही सुधारणा करताना देखील दिसत आहेत.
ज्यातून त्यांनी स्वतःची सुधारक अशी प्रतिमा बनवण्यावर भर दिला आहे. सौदी मध्ये असलेल्या अनेक धार्मिक आणि रूढीवादी परंपरा बाजूला करत त्यांनी कठोर असे सामाजिक निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी चित्रपटगृहांवरील बंदी मागे घेतली. महिलांना क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. २०१८ मध्ये स्त्रियांच्या ड्रेस कोड मध्ये देखील थोडी सवलत देण्यात आली.
तसेच महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची परवानगी देण्यात आली.
मात्र उदारीकरणाची ही पावले स्वातंत्र्याच्या इच्छेने नव्हे तर आर्थिक लाभाने प्रेरित असल्याचे दिसून येते. कारण दुसर्या बाजूला येथील महिलांनी त्यांच्या अधिक स्वातंत्र्याची मागणी केली असता, महिला चळवळीच्या कार्यकर्त्यांवर सरकारने कठोर अशी कारवाई देखील केली आहे.
मार्च 2020 मध्ये, जगाने कोविड-19 साथीच्या आजाराशी झुंजायला सुरुवात केली तेव्हा मोहम्मदने पुन्हा एकदा सौदी राजघराण्यातील सहकारी सदस्यांना ताब्यात घेतले. राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकशी सुरू असल्याचे सांगून अटक केलेल्यांमध्ये राजे सलमानचा भाऊ अहमद आणि मुहम्मद बिन नायेफ यांच्यासह सिंहासनाच्या अगदी जवळ असलेल्या राजपुत्रांचा देखील यामध्ये समावेश आहे. दरम्यान, साथीच्या रोगाचा आर्थिक परिणाम आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे तेलाच्या उच्च किमती आणि चलनवाढीने जगभरातील अर्थव्यवस्थेला त्रस्त केले.
यामुळे २०२२ मध्ये जागतिक आर्थिक पातळीवर तेलाचे भाव स्थिर होण्याकरता तुर्की, अमेरिकेसह सर्वांनी मोहम्मद चे स्वागत केल्याने मोहम्मदच्या प्रतिष्ठेचे सध्यातरी पुनरुज्जीवन झाल्याचे पाहायला मिळते. जागतिक पातळीवर स्वतःला सुधारक अशी प्रतिमा निर्माण करण्यावर भर असलेले मोहम्मद बिन सलमान देशांतर्गत मात्र नेहमीच वादातीत राहिले आहेत.
मात्र सौदीबाबत ते प्रचंड महत्वकांक्षी आहेत. देशाला तेल व्यवसायातून बाहेर काढून विविध व्यवसायांसाठी देशाची दारे त्यांनी उघडली आहेत. ज्यातून ते भविष्यातील सौदी अरबीया घडविताना दिसत आहेत.
हे ही वाच भिडू :
- सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून सुप्रिया कर्णिक एअर होस्टेसचं काम करायच्या
- या मुंबईच्या गँगस्टरमुळंच दाऊदसकट सगळ्या डी कंपनीला दुबईचं बस्तान हलवावं लागलं…
- ६ लग्न- १६ मुले, आता पोटगीत ५५०० कोटी खर्च करणाऱ्या दुबईच्या राजाची कहाणी