थिएटरच्या अंधारात प्रेक्षकांमध्ये बसलेला तो कलाकार पुढच्या तीन तासात सुपरस्टार झाला

कसं असतं भिडूंनो, अभिनय हे क्षेत्र इतकं विलक्षण आहे की इथे तुमच्यात कलागुण ओतप्रोत भरले असतील, तरीही तुम्हाला स्ट्रगल काही चुकत नाही. किंबहुना अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेताना स्ट्रगलचे दिवस प्रत्येकाला अनुभवावे लागतात.

हा संघर्ष ना अमिताभ बच्चनला चुकला ना इतरांना. प्रत्येकाला या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी थोडाफार संघर्ष हा सोसावाच लागतो.

परंतु असेही काही नट आहेत जे एका रात्रीत स्टार पदावर जाऊन पोहोचले आहेत. भिडूंनो, मराठी सिनेसृष्टीत मात्र असा एक कलाकार होता ज्याला फक्त ३ तासात कलाकार म्हणून मोठं यश मिळालं. आधी इतकी ओळख नसलेला हा कलाकार या तीन तासात स्टार झाला.

हा अभिनेता म्हणजे अशोक सराफ.

जवळपास ५० पेक्षा अधिक वर्ष आपल्या सर्वांचे लाडके अशोकमामा आजही त्याच एनर्जीने सिनेसृष्टीत काम करत आहेत. अशोक मामांचा सिनेमा भले चांगला – वाईट असो. पण कोणत्याही सिनेमात अशोकमामांचा अभिनय पाहणं म्हणजे निव्वळ आनंद.

अशोकमामांची धनंजय माने ही अगदी लहानपणापासून माहीत असलेली. या भूमिकेवर आधारीत जोक्स, मिम्स आपली हसवणूक करतात.

ही अप्रत्यक्ष रित्या अशोकमामांच्या अफलातून विनोदी अभिनयाला असलेली दाद म्हणावी लागेल. अशोक सराफ यांना जेव्हा कोणी ओळखत नव्हतं तेव्हा एका सिनेमाने त्यांना अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवून दिली.

यामुळे अशोक मामांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा न थांबता आजही सुसाट सुरू आहे. ही भूमिका कोणती हे जाणून घेऊया, पण त्याआधी अशोक मामांच्या सुरुवातीच्या जीवनाकडे एक नजर…

बॉलीवुडमधले प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांच्या नावापासून प्रेरित होऊन बाळाचं नाव अशोक ठेवण्यात आलं.

अशोक मामांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. छोटा अशोक त्यावेळी सिनेसृष्टीत स्वतःचं अढळपद निर्माण करेल याची कोणालाच कल्पना नव्हती. अशोक सराफ यांचं प्राथमिक शिक्षण ग्रँट रोड येथील डी.जी. टी. शाळेत पार पडले. १९६९ पासून अशोक मामांनी अभिनय क्षेत्रात स्वतःचं नशीब आजमवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.

दुसरीकडे याच वर्षी दादा कोंडके नावाचा कलंदर माणूस मराठी सिनेसृष्टीत आला होता. १९६९ साली आलेल्या भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या सिनेमामधील एक भूमिका करून दादा कोंडकेंनी मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली.

दादा कोंडके आणि अशोक सराफ यांची तशी ओळख नव्हती.

पण दादा कोंडके याचं त्याकाळी रंगभूमीवर गाजत असलेलं ‘विच्छा माझी पुरी करा’ हे विनोदी वगनाट्य अशोक सराफ यांनी अनेक वेळा पाहिलं होतं. निखळ मनोरंजन देणारं आणि लोटपोट हसवणारं हे नाटक अशोकमामांच्या खास आवडीचं.

१९६९ साली अशोक सराफ सुद्धा ‘जानकी’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत दाखल झाले. यानंतर पुढील चार – पाच वर्षात अशोक मामांनी ‘दोन्ही घरचा पाहुणा’, ‘आलंय तुफान दर्याला’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं.

एकूणच अशोक सराफ यांना सिनेमांच्या ऑफर येत होत्या पण त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती.

‘पांडू हवालदार’ या सिनेमाच्या माध्यमातून अमाप लोकप्रियता अनुभवायला मिळेल, याची कल्पना खुद्द त्यांनी सुद्धा केली नव्हती.

अशोकमामांना ‘पांडू हवालदार सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात त्यांच्यासोबत होते दादा कोंडके.

दादा कोंडके हे त्यावेळेस मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या हटके सिनेमांमुळे लोकप्रिय झालेलं नाव. प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणारं सिनेमाचं कथानक, निखळ कॉमेडी, समोर दादा कोंडके अशा सर्व गोष्टींमुळे आपला हा सिनेमा हिट होईल याची अशोकमामांना खात्री होती.अशोक मामांनी सुद्धा दादा कोंडके या कलंदर माणसासमोर आत्मविश्वासाने अभिनय केला. संपूर्ण सिनेमाचं शुटिंग संपलं.

१९७५ साल. ‘पांडू हवालदार’ सिनेमा थोड्याच दिवसात प्रदर्शित होणार होता.

त्याआधी दादा कोंडकेंनी दादरच्या कोहिनूर सिनेमागृहात ‘पांडू हवालदार’ चा प्रीमियर आयोजित केला. या प्रिमियरला प्रेक्षक आणि सिनेसृष्टीत मधील काही कलाकार उपस्थित होते. कोहिनूर सिनेमागृह खच्चाखच भरलं होतं. अशोक सराफ सिनेमागृहात आले.

आश्चर्य म्हणजे जो सिनेमा पाहण्यासाठी सर्वांनी इतकी गर्दी केली होती, त्या सिनेमातला कलाकार आला असूनही कोणीही अशोक सराफ यांना बघितलं नाही.

‘पांडू हवालदार’ सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग असूनही अशोक सराफ यांची त्यावेळी कोणीही दखल घेतली नाही.

सिनेमा सुरू झाला. सिनेमा चालू असताना उपस्थित सर्वजण ‘पांडू हवालदार’चा निखळ आनंद घेत होते. त्यातल्या पंचवर तुफान हसत होते. सिनेमा संपला.

जेव्हा लोकांना कळालं की सिनेमात हवालदार सखारामची भूमिका करणारा नट आपल्यामध्ये उपस्थित आहे तेव्हा लोकांनी अशोक सराफ यांना गराडा घातला.

अशोक सराफ यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तिथे असलेले सर्वजण पुढे सरसावले. त्याक्षणी लोकांचं अमाप प्रेम त्यांना मिळालं. लोकांच्या या गर्दीमधून सिनेमागृहाबाहेर येणं अशोकमामांसाठी त्यावेळी मोठं आव्हान होतं.

सिनेमा सुरू होण्याआधी अशोक सराफ हा एक सर्वसामान्य कलाकार होता. ३ तासांचा सिनेमा संपल्यानंतर अशोक सराफ हा कलाकार स्टारपदावर पोहोचला.

‘पांडू हवालदार’ मधील अशोकमामांच्या भूमिकेची त्यावेळी सर्वत्र चर्चा झाली. या एका सिनेमामुळे अशोक सराफ यांना तुफान लोकप्रियता मिळाली. यशाची हवा डोक्यात जाऊ न देता, अशोक सराफ यांनी अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरूच ठेवला.

आज गेली ५० हून अधिक वर्ष विविध भूमिकांच्या माध्यमातून अशोकमामा आपलं मनोरंजन करत आहेत.

यशस्वी होणं आणि मिळालेलं यश टिकवणं ही कलाकारासाठी तशी अवघड गोष्ट असते. परंतु या सर्व गोष्टींच्या पलिकडे अशोकमामा स्वतःचं काम प्रामाणिकपणे करत असून, नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहेत.

हे ही वाच भीक।

Leave A Reply

Your email address will not be published.