सायकलवर फिरत कर्नाटकात पक्ष रुजवला, त्याच येडीयुरप्पांची कमी भाजपला जाणवली…

भाजप कर्नाटकमध्ये हरलं, निकालाचं आत्मचिंतन करु अशी घोषणा झाली, काँग्रेसचं अभिनंदन झालं आणि या सगळ्यात भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करताना एक कारण सगळ्यांकडून सांगण्यात आलं, ते म्हणजे..

येडीयुरप्पांना साईडलाईन करणं.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे येडीयुरप्पा या निवडणुकीत ना तिकीट वाटपाच्या पिक्चरमध्ये होते आणि ना प्रचाराच्या. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली खरी, पण ती नवं नेतृत्व पुढं आणायला उत्सुक असलेल्या भाजपच्या नाही तर काँग्रेसच्या पथ्यावर पडली.

येडीयुरप्पांनी निकालानंतर, ‘भाजपनं असे अनेक विजय आणि पराभव पाहिले आहेत,’ असं विधान केलं. आत्मपरिक्षणाची गरज असल्याचंही सांगितलं आणि या सगळ्यात एक गोष्ट अधोरेखित झाली, ‘कर्नाटक भाजपमधलं येडीयुरप्पांचं स्थान’

ज्यावेळी चारचाकी, दुचाकी नव्हत्या त्या काळात हाताशी काहीच कार्यकर्ते घेऊन येडीयुरप्पा यांनी सायकलवरून कर्नाटकमध्ये भाजपला उभा केलं.

बुकानेकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा असं त्यांचं पूर्ण नाव. शिमोगा जिल्ह्यातल्या शिकारीपुरा मतदारसंघातून ते आठ वेळा आमदार झाले. कर्नाटकात सलग चार वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केलं.

विरोधी पक्षनेते म्हणून ३ वेळा आणि मुख्यमंत्री म्हणून सलग ४ वेळा कार्यरत असणारे ते कर्नाटकमधील आतापर्यंतचे एकमेव मुख्यमंत्री आहेत. 

त्यांच्या करिअरची सुरुवात झाली गव्हर्मेंट क्लार्क म्हणून

१९९५ मध्ये त्यांची समाज कल्याण विभागात फर्स्ट डिव्हिजन क्लर्क म्हणून नियुक्ती झाली परंतु त्यांनी काहीच काळात क्लर्कची नोकरी सोडली आणि शिकारीपुराला वीरभद्र शास्त्री यांच्या शंकरा तांदूळ गिरणीत कारकून म्हणून रुजू झाले. त्यांनी तांदूळ गिरणी मालकाची मुलगी मायथ्रादेवी यांच्याशी लग्न केलं.पुढं  गिरणीमधली कारकुनाची नोकरी सोडली आणि शिमोगामध्ये हार्डवेअरचं दुकान सुरू केलं.

पण याच दरम्यान त्यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्दही सुरू झाली.

आपल्या कॉलेजच्या दिवसांपासूनच येडियुरप्पा यांची संघाशी जवळीक होती. १९७० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना शिकारीपुरा युनिटचे कार्यवाहक म्हणून नेमलं. १९७२ मध्ये ते शिकारीपुरा नगरपालिकेत निवडून आले. तिथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावतच राहिला. कारण त्यांना त्याच वर्षी पक्षाने जनसंघाच्या तालुका युनिटचे अध्यक्ष बनवले. १९७५ मध्ये ते प्रथमच नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले होते. 

आणीबाणीच्या काळात येडीयुरप्पा यांना बेल्लारी आणि शिमोगाच्या तुरुंगात टाकण्यात आले होते.

१९८० मध्ये ते भाजपच्या शिकारीपुरा तालुका युनिटचे अध्यक्ष तर १९८५ मध्ये ते भाजपच्या शिमोगा जिल्ह्याचे अध्यक्ष झाले होते आणि १९८८ मध्ये ते कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले.

१९८३ मध्ये ते पहिल्यांदाच कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात निवडून गेले आणि त्यानंतर त्यांनी शिकारीपुरा मतदार संघाचे सहा वेळा प्रतिनिधित्व केले. १९९९ मध्ये ते निवडणूक हरले परंतु भाजपकडून कर्नाटकच्या विधानपरिषदेचे सभासद होण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली. २००४ मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि धरम सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या वेळी कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले. 

त्याचवेळी जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करायचा प्लॅन आखला…

 
या प्लॅननुसार एच. डी. कुमारस्वामी हे पहिले २० महिने मुख्यमंत्री असतील आणि त्यानंतर येडियुरप्पा उर्वरित २० महिने मुख्यमंत्री होतील, असं ठरलं. येडीयुरप्पा उपमुख्यमंत्री आणि कुमारस्वामी यांच्या सरकारमधील अर्थमंत्री झाले.
 
मग ऑक्टोबर २००७ मध्ये येडियुरप्पा यांची मुख्यमंत्री होण्याची पाळी आली, तेव्हा कुमारस्वामी यांनी त्यांचं पद सोडण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली आणि हे गणित फिस्कटलं.
पण नोव्हेंबर मध्ये कर्नाटक राष्ट्रपती राजवटीखाली आला. जेडीएस आणि भाजपनं आपापसातील मतभेद मिटवण्याचा निर्णय घेतला, येडीयुरप्पा यांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.
येडियुरप्पा यांनी १२ नोव्हेंबर २००७ रोजी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आपल्या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार  २००७ साली शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांनी आधीच्या Yeddyurappa येडीयुरप्पाचे नावाचे स्पेलिंग येडियुरप्पा (Yediyurappa) असे केले होते.
पण खातेवाटपाबाबतच्या वादामुळे पुन्हा जेडीएसने सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला, ज्यामुळे १ नोव्हेंबर २००७ रोजी येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

२००८ च्या विधानसभा निवडणुकीत येडीयुरप्पा यांनी शिकारीपुरा येथून समाजवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री एस बंगारप्पा यांच्या विरोधात निवडणूक लढवली. आमच्यावर अन्याय झाला, असं म्हणत त्यांनी राज्यातील लोकांची सहानुभूती मिळवली आणि एकहाती सत्ताही. दक्षिणेकडच्या राज्यात भाजपला मिळालेला हा पहिला विजय ऐतिहासिक होता.

त्यांनी ३० मे २००८ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत विघ्न येण्यास सुरुवात झाली…

त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर खाण प्रकरणाचा तपास करणार्‍या कर्नाटक लोकायुक्तने आपला अहवाल सादर केला. त्यात येडियुरप्पांवर बेंगळुरू आणि शिमोगामधील जमिनीच्या व्यवहारातून बेकायदेशीरपणे नफा कमावल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या दबावानंतर त्यांनी ३१ जुलै २०११ ला राजीनामा दिला.

त्यानंतर येडियुरप्पा यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये आपल्या आमदारकीचा आणि भाजपच्या पक्ष सदस्यत्त्वाचाही त्याग केला. नाराज झालेल्या येडियुरप्पा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत कर्नाटक जनता पक्ष हा स्वत:चा पक्ष काढला.

येडियुरप्पा यांनी नव्याने काढलेल्या या पक्षामुळे सर्वात मोठं नुकसान भाजपला झालं होतं.

२०१३ च्या विधानसभा निवडणुकी वेळी येडियुरप्पा यांच्या पक्षाच्या फक्त सहा जागा निवडून आल्या, तरी इतर ४० जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे भाजपने ५० जागा गमावल्या त्यामुळे त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला होता. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी येडियुरप्पांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यांच्या घरवापसीसाठी अमित शहा यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी येडीयुरप्पा यांना मानानं पुन्हा पक्षात घेतलं आणि भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये एक पद दिलं आणि नंतर कर्नाटक प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

येडियुरप्पा याचं वजन लक्षात घेऊन २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत तेच  मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, यावर भाजपच्या केंद्रीय समितीने शिक्कामोर्तब केलं होतं.

२०१८ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर येडियुरप्पा यांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी आमंत्रित केले होते.

१७ मे २०१८ रोजी त्यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

परंतु विधानसभेत त्यांना बहुमत कमी होतं, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना १५  दिवसांची मुदत दिली पण सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून केवळ २४ तासांची मुदत दिली आणि लवकरच फ्लोअर टेस्ट देण्याचे आदेश दिले.

१९ मे २०१८ रोजी संध्याकाळी ४ वाजता फ्लोर टेस्ट होणार होती.

फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी एक भावनिक भाषण दिले आणि त्यानंतर ‘मी बहुमत सिद्ध करण्यास अक्षम असल्याचे’ सांगत त्यांनी राजीनामा दिला. अशाप्रकारे ते केवळ २ दिवसांचे भारतातील सर्वात कमी काळ पदावर असणारे मुख्यमंत्री बनले होते. 

पुढं २६ जुलै २०२१ ला त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, काही महिन्यांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यांची सगळ्यात जास्त कमतरता भाजपला काही महिन्यातच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जाणवली…
हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.