बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच नाही, तर चंद्रपुरात सुद्धा धर्मांतरण केलं होतं

दीक्षाभूमी म्हटलं की नागपूरच्या दीक्षाभूमीवरील भव्य स्तूप डोळ्यासमोर येतो. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या स्तुपासमोर भव्य तोरण, डोक्यावर तीन छत्र असलेला हा स्तूप दर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी निळ्या-पांढऱ्या लाईटने सजवला जातो. लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या स्तुपासमोर जमतात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतरणाचा सोहळा साजरा करतात.

पण हे झालं नागपूरचं, पण कधी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीबद्दल ऐकलंय का? 

होय, नागपूरप्रमाणेच एक दीक्षाभूमी चंद्रपूरला सुद्धा आहे आणि त्या दीक्षाभूमीवर सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ ते ३ लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती.  

नागपूरच्या धर्मांतरणानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चंद्रपूरला आले आणि त्यांनी धर्मांतरणाची प्रक्रिया पुन्हा एकदा पार पाडली. चंद्रपूरला झालेल्या धर्मांतरणामुळे दरवर्षी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो.

या धर्मांतरणासाठी बाबासाहेबांना नागपूरवरून चंद्रपूरला आणणे, कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं सर्व काम चंद्रपूरच्या आंबेडकरी अनुयायांनी स्वतः केलं होतं.  

१४ ऑक्टोबरला नागपुरात धर्मांतरणाचा सोहळा पार पडला तेव्हा विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश, तेलंगणा या प्रदेशातील लाखी अनुयायी नागपूरला पोहोचले होते. त्यांनी या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेकरांसोबतच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. पण नागपूर पासून जवळच असलेल्या चंद्रपूर आणि आसपासच्या भागातल्या अनेकांना धम्माची दीक्षा घ्यायची होती. पण ते नागपूरला पोहचू शकले नव्हते.

नागपूरच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवतांना बाबासाहेबांचे मानस पुत्र बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांनी बाबासाहेबांना चंद्रपूरला येण्याची मागणी केली होती.

राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीचा मान राखत बाबासाहेबांनी चंद्रपूरला येण्याचं मान्य केलं होतं. ते नागपूरनंतर चंद्रपूरला येणार असल्याची चंद्रपूरकरांना खात्री होती त्यामुळे चंद्रपुरात सुद्धा नागपूरप्रमाणे धर्मांतरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

१४ ऑक्टोबरचा कार्यक्रम आटोपल्यांनंतर १५ ऑक्टोबरला बाबासाहेबांनी नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये आराम केलं. १६ ऑक्टोबरला सकाळी बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पत्नीसोबत चंद्रपूरला जाण्यासाठी कारमध्ये बसले. पण नागपूरवरून चंद्रपूरला जाणारा रस्ता अतिश्याय खराब असल्यामुळे त्यांच्या कारचा मार्ग बदलण्यात आला. त्यांना नागपूर, जाम, चंद्रपूर मार्गाऐवजी नागपूर, उमरेड, भिवापूर, नागभीड, मुलमार्गे चंद्रपूरला आणण्यात आलं.

बाबासाहेबांना वृद्धपकाळामुळे मणक्यांचा आणि मधुमेहाचा त्रास होता त्यामुळे येतांना मुलच्या विश्रामगृहात त्यांनी विश्रांती घेतली. तिथे पिसाबाई गोवर्धन यांच्या घरी बनवण्यात आलेली चटणी भाकर खाऊन बाबासाहेब चंद्रपूरला पोहचले.   

चंद्रपुरात यवतमाळ, वर्धा, आदिलाबाद या भागातून आलेले २-३ लाख अनुयायी गोळा झालेले होते. सगळीकडे समता सैनिक व्यवस्था सांभाळत होते.

संध्याकाळच्या सुमारास अखेर बाबासाहेब चंद्रपुरात दाखल झाले. काही काळ विश्रांती घेण्यासाठी ते सर्किट हाऊसवर थांबले. इतक्या लांब प्रवासामुळे त्यांना त्रास होत होता, चालत येत नव्हतं मात्र लाखो अनुयायी त्यांची आतुरतेने वाट बघत आहेत याची त्यांना जाणीव होती. ते सर्किट हाउसवरून निघाले आणि दीक्षाभूमीच्या मैदानावर पोहोचले.

मैदानावर २ मजल्याचा मंच उभारण्यात आला होता. संध्याकाळ झाल्यामुळे मैदानासह मंडपातल्या ट्यूबलाईट पेटवण्यात आल्या होत्या. रिमझिम पाऊस चालू होता, बाबासाहेबांना वेदना होत होत्या मात्र बाबासाहेब कसेबसे मंचावर चढले. संध्याकाळची वेळ असल्याने मंचावरच्या ट्यूबलाईटवर प्रचंड किडे भिरभिरत होते आणि त्या किड्यांचा बाबासाहेबांना त्रास होत होता.

त्यांना होणार त्रास कमी करण्यासाठी मंडपावरच्या लाईट्स बंद करण्यात आली पण यामध्ये सर्व मैदानावरचीच लाईट गेली.

मात्र मंचाच्या खाली एक १०० व्हॉटसचा बल्ब जळत होता. तोच बल्ब हातात घेऊन समता सैनिक दलाचा एक जावं मंचावर चढला. त्या प्रकाशात बाबासाहेबांनी सर्वांना आवाज दिला…  

“उठा, उभे रहा, हात जोडा….”

बाबासाहेबांचा आवाज ऐकून सगळे अनुयायी उभे झाले, त्यांनी हात जोडले. मंचावर असलेल्या तथागत बुद्धांच्या मूर्तीसमोर उभे राहून बाबासाहेबांनी त्रिशरण आणि पंचशीलाला सुरुवात केली. ते झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांच्या २२ प्रतिज्ञा वाचल्या आणि अनुयायांना त्या प्रतिज्ञांचे पालन करण्यासाठी वचनबद्ध केलं. अशाप्रकारे चंद्रपूरचा धर्मांतरणाचा सोहळा पार पडला. पण त्यांना मणक्याचा त्रास होत असल्यामुळे ते मंचाच्या खाली उतरले आणि सर्किट हाऊसला पोहोचले. 

सकाळी अनेक अनुयायी बाबासाहेबांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी सर्किट हाऊसला पोहोचले होते.

बाबासाहेब व्हरांड्यातल्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी अनुयायांना मार्गदर्शन केलं.

ते म्हणाले, तुमच्यासाठी शक्य तितकं मी करून ठेवलंय, आता पूर्वीप्रमाणे जगण्याची पद्धत सोडून द्या. नवरा दारू पिऊन येत असेल तर त्याला घरात घेऊ नका, स्वतःच्या मुलं मुलींना भरपूर शिकवा. आता तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतलीय, आपापल्या वस्तीवर बौद्ध विहार बांधा आणि दर रविवारी तिथे गोळा व्हा. मी लिहिलेल्या ‘बुद्ध व त्यांचा धम्म’ या ग्रंथाचं वाचन करा.”

बाबासाहेब बोलत असतांना त्यांनी अनेकांशी चर्चा केली. तेव्हा त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळ असलेल्या विज्जासन बौद्ध लेण्याबद्दल माहिती देण्यात आली. ही माहिती ऐकूण बाबासाहेबांनी लेण्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. पण जाण्याचा रास्ता अतिशय खराब असल्यामुळे त्यांना तिथे जाता आलं नाही.

ते म्हणाले की, “परत जेव्हा मी इथे येईन तेव्हा विज्जासन लेण्याला आवश्य भेट देईन.” पण त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

स्वतःच्या अनुयायांना मार्गदर्शन करून १७ सप्टेंबरला बाबासाहेब दिल्लीला जाण्यासाठी निघाले. त्यांना त्रास होत असल्यामुळे चंद्रपूरहुन ग्रँड ट्रंक एक्सप्रेसने ते नागपूरला रवाना झाले. त्यांनी अनुयायांना १६ ऑक्टोबरला चंद्रपुरात बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. म्हणून दरवर्षी १६ ऑक्टोबरला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.