या दुर्मिळ फोटोमध्ये बाबासाहेबांच्या मांडीवर बसलेली व्यक्ती कोण आहे?

आपल्या पैकी अनेकांनी हा फोटो इंटरनेटवर पाहिला असेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॅट घालून बसले आहेत आणि हातात काठी घेतलेले एक वृद्ध गृहस्थ त्यांच्या  मांडीवर बसलेले आहेत. शेजारी बसलेल्या माई दिलखुलास हसत आहेत,  खुद्द बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर देखील मिश्किल हसू आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक अप्रूपाने  दृश्याकडे पाहत आहेत.

बोल भिडूच्या ऑफिसमध्ये देखील हा फोटो आहे. बऱ्याचदा ऑफिसमध्ये कोणी आलं कि हा फोटो बघून एक प्रश्न हमखास विचारतो.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या मांडीवर बसलेली व्यक्ती कोण?

त्या व्यक्तीच नाव आहे रावबहादूर सीताराम केशव बोले.

सी.के.बोले यांचा जन्म २९ जून १८६८ रोजी कोकणात पालशेत येथे झाला. त्याचन्हे वडील मुंबईमध्ये एका प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करायचे. त्यामुळे सी.के. बोले यांचं  बालपण मुंबईमध्ये नागपाडा डोंगरी या भागात गेलं. त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचं महत्व जाणलं होतं. त्यांनी सीताराम यांना शिकण्याची प्रेरणा दिली.

सी.के.बोले यांना स्वतःच शिक्षणाची मोठी आवड होती. अगदी शाळेत असतानाच त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळी नावाच्या संघटनेची स्थापना केली होती. अनेक थोरामोठ्यांना या संघटनेच्या कार्यक्रमात व्याख्यानासाठी ते बोलवत असत.

एसएससी साठी त्यांनी मुंबईच्या सुप्रसिद्ध विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी  मुलांसाठी रात्रशाळा सुरु केली व स्वतः तिथे शिकवू लागले. 

पुढे वयाच्या बाविसाव्या वर्षी १४ जानेवारी १८९० ला कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी स्थापन केली. त्याचबरोबर तळागाळातील गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भंडारी शिक्षण परिषद स्थापन केली. दिन दुबळ्या समाजाला जर वर आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना ठाऊक होतं.

१८९३ च्या दंगलीत त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा सी.के.बोले सरकारी नोकरीला चिकटले मात्र सामाजिक कार्याची खूमखूमी कधी गेली नाही. मुंबईच्या कुप्रसिद्ध प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं. तिथून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव मुंबईमध्ये ओळखलं जाऊ लागलं.

प्लेगची साथ ओसरल्यावर शहरात  आरोग्य चाचणी शिबिरं भरवली जावीत म्हणून इंग्रज सरकारवर  दबाव आणणारे बाबासाहेब बोलेच होते. या सामाजिक राजकीय कार्यासोबत सी.के.बोले यांचा शैक्षणिक कार्याचा वसा सुद्धा सुरूच होता.

१९०७ रोजी एल्फिन्स्टन विद्यालयात एक अस्पृश्य समाजातील विद्यार्थी मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाला आहे हे त्यांच्या कानी पडले. असंख्य अडचणीतून दलित समाजातील मुलगा शिक्षणाच्या क्षेत्रात आपली कामगिरी करतोय हे प्रचंड कौतुकास्पद होते. त्याविद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यासाठी व त्याला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासाठी एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. तेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरूजी या सत्कार समारंभाचे अध्यक्ष होते.

त्या विद्यार्थांचे नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर.

सीके बोले यांच्या सकट सर्व प्रमुख पाहुण्यांनी बाबासाहेबांच कौतुक केलं. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत बाबासाहेबांना  भेट म्हणून दिली. हीच बाबासाहेबांची बुद्ध विचारांशी झालेली पहिली ओळख.

बाबासाहेबांना पुढील शिक्षणासाठी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची स्कोरळशीप मिळाली यासाठी देखील केळुस्कर गुरुजी यांनी केलेली मदत महवताची ठरली. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या जीवनात पहिले मार्गर्शक म्हणून आलेल्या सीके बोले आणि कृष्णरावजी केळुस्कर यांना विसरले नाहीत.

महात्मा फुलेंच्या पठडीत तयार झालेल्या कामगार नेते नारायण मेघाजी लोखण्डे यांच्या निधनानंतर मुंबईच्या कामगार चळवळीला मोठा धक्का बसला. तेव्हा या चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब बोले यांच्याकडे आले. त्यांनी Worker Welfare Association नावाच्या संस्थेची सुरवात केली व त्यातून कामगार चळवळीच कार्य हाती घेतलं.

देशातील पहिला कामगार संघटक म्हणून १९०९ मध्ये रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी कामगारांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नांवर आवाज उठवला. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

१९२१ ला प्रांतीय कायदेमंडळात त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळूनच पाहिले नाही. त्यांची तोफ कौन्सीलमध्ये धडधडू लागली. 

१९२३ मध्ये त्यांनी अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे व अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे खुले झाले पाहिजेत यासाठी बील आणले. त्याला कौन्सिलने मंजुरीही दिली. अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले करण्याचे मोठे काम बोले यांनी केले.

१९२५ ला नवयुग साप्ताहिक सुरू करून समाजात जागृती निर्माण केली. १९२९ ला पुणे येथे अतिमागास वर्गासाठी झालेल्या कार्यक्रमात सर रहिउद्दीन अहमद यांनी त्यांना रावबहाद्दूर ही पदवी दिली. त्यांनी शाळा, रूग्णालये, विहीरी यासारखी असंख्य कामे केली.

देवदासी प्रथा ही बेकायदा असल्याची घोषित करण्यासाठी या देशात पहिले पाऊल जर कोणी उचलले असेल तर रावबहाद्दूर सी.के बोले यांनी. ब्रिटीशांच्या कालखंडात १९३४ मध्ये बॉम्बे देवदासी प्रोटेक्शन ऍक्ट आणला गेला. हा कायदा अंमलात आणण्यासाठी बोले यांनी प्रयत्न केले. 

रावबहादूर बोले यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत ब्राम्हणेतर चळवळीत प्रचंड योगदान दिलं. मुंबईत नवरात्रोत्सव सुरु करणे आणि त्याची पूजा एका दलित व्यक्तीच्या हस्ते करून एका सामाजिक बदल घडवण्यास त्यांनी सुरवात केली. 

त्यांनी सार्वजनिक पाणवठे सर्व समाजांना खुले करण्यासाठीचा कायदा विधिमंडळात पास करून आणला होता मात्र त्याची गाव पातळीवर अमंलबजावणी होत नव्हती. अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली याची चळवळ सुरु करण्यात आली. रावबहादूर सी के बोले या सामाजिक चळवळीत अग्रस्थानी होते. त्यांच्या सहकार्याने महाड येथील सत्याग्रह प्रणित करण्यास खूप मोठी मदत झाली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि रावबहादूर बोले यांचं नातं हे अनेक वर्षांपासून दृढ झालेलं होतं. यातूनच बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्याला त्यांच्या आंदोलनाला खंबीर पाठिंबा देणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये सी.के.बोले यांचे नाव प्रामुख्याने येते.

पुढे वयोमानाने त्यांचा सार्वजनिक कार्यातील सहभाग कमी होत गेला मात्र त्यांचं बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्याप्रती असलेलं प्रेम आणि आदर कधीच कमी झाला नाही.

स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशाच्या संविधानाचा मसुदा एकहाती लिहून काढला. त्याचबरोबर देशाच्या पहिल्या कायदेमंत्र्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. देशाच्या निर्मितीच्या घटनेचे साक्षीदार व शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे योगदान अतुलनीय असे होते.

पुढे काही मतभेदांमुळे ते सरकारमधून बाहेर पडले. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी थेट पंतप्रधान नेहरूंना सोपवला. अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र स्वाभिमानापुढे राजकीय पदाला किंमत न देणाऱ्या बाबासाहेबांनी राजीनामा मागे घेतला नाही.

कायदेमंत्र्याची वस्त्रे उतरवलेले डॉ.बाबासाहेब पंजाब मेलने दिल्लीहून निघाले ते १८ नोव्हेम्बर १९५१ रोजी मुंबईला पोहचले. त्यांचा या प्रसंगी व्हीटी स्टेशन म्हणजेच आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सत्काराचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शे.का.फे आणि समाजवादी पक्ष यांनी केले होते.

तेव्हा वार्धक्याची ऐंशी वर्षे पार केलेले रावबहाद्दूर सीताराम बोले हट्टाने या कार्यक्रमाला येऊन पोहचले. प्रचंड गर्दीचा महापूर जमला होता. अचानक आलेल्या सी.के.बोले यांना बसण्यासाठी खुर्ची देखील नव्हती. तेव्हा आपल्या या वयोवृद्ध सहकाऱ्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मांडीवरच बसवलं.

त्या प्रसंगी काढलेला हाच तो ऐतिहासिक फोटो.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.