दामोदर नदीला बंगालचा शाप म्हणून ओळखलं जायचं. बाबासाहेबांमुळे तिचं वरदानात रूपांतर झालं..

नद्यांना आपल्या संस्कृतीमध्ये माता आणि देवीची उपमा दिली आहे. कृषिप्रधान संस्कृतीमध्ये आपलं सगळं जगणं या नदीशी निगडित असत. नदीची पूजा करण्यापासून ओटी भरून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

मात्र एक नदी अशी आहे जिला माता नाही तर आपल्या बंगालला लागलेला अभिशाप मानलं जातं.

या नदीचं नाव आहे दामोदर नदी.

आत्ताच्या झारखंड मध्ये छोटा नागपूरच्या पठारात उगम पावणारी आणि बंगालमध्ये हुगळी नदीमध्ये विलीन होणारी दामोदर नदी. या नदीला कधीही अचानक पूर येत असतात. एककाळ असा होता जेव्हा या नदीला महापूर आला की गावच्या गावं वाहून जायची. लाखो लोकांचं जीवन या महापुरामुळे विस्कळीत होऊन जायचं. शेत, घरे, दुकाने सामान नष्ट तर व्हायचं शिवाय हजारो लोक दरवर्षी मृत्युमुखी पडायचे.

दामोदर नदीला इंग्रज देखील sorrow of bengal म्हणून ओळखायचे.

१९४३ साली असाच एक मोठा महापूर आला. तो आजवरचा सर्वात मोठा महापूर मानला जातो.  या संकटात बंगालची संपूर्ण वाताहात झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. रस्ते वाहून गेले, रेल्वेचे मार्ग उखडले गेले. दामोदर नदीच्या प्रलयाने न भूतो न भविष्यती इतकी अपरिमित हानी केली. कित्येक जण मृत्युमुखी पडले.

पण हे संकट इथे थांबले नाही. अशात बंगालला दुष्काळाचा फटका बसला. जवळपास पंचवीस हजार लोक टाचा घासून उपासमारीने मृत्यूमुखी पडले. इतका महाभयंकर दुष्काळ असूनही सरकारी मदत देखील पोहचली नाही. सरकारने कारण सांगितलं,

“दामोदर नदीच्या महापुरामुळे रस्ते खचून गेलेत त्यामुळे बंगालला मदत पाठवता येणार नाही.”

शिवाय हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ, कलकत्त्यावर बॉम्ब वर्षावाची भीती होती. त्यामुळे देखील मदत पाठवली गेली नाही. असं म्हणतात की विन्स्टन चर्चिलने अन्नधान्याचा साठा युद्धात उपयोगी यावा म्हणून बंगालला मिळू दिला नाही.

हि सगळी तत्कालिक कारणे तर होतीच पण सर्वात मोठा प्रश्न दामोदर नदीच्या महापुराचा होता. यावर लवकरातल्या लवकर उपाय काढणे गरजेचे होते.

दामोदर नदीवर धरण बांधायचं ठरवलं. पण नसुत धरण बांधून उपयोग नव्हता, कायम स्वरूपी त्यावर उपाय योजना करावी लागणार होती. हा महाप्रचंड प्रकल्प आखायचा तर जबाबदारी तितक्याच विद्ववत्तापूर्ण, कामाची उरक असणाऱ्या व्यक्तीकडे सोपवावी लागेल याची  सरकारला जाणीव होती.

त्या काळी व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळात असा एकच माणूस होता जो हे शिवधनुष्य पेलू शकणार होता.

डॉ.बाबासाहेब आंबडेकर

बाबासाहेब तेव्हा संपूर्ण भारताचे ऊर्जा, मजूर, बांधकाम व जलसंपदा खाते सांभाळत होते. त्यांनी दामोदर खोऱ्यातील प्रकल्पाचे मॉडेल कसे असावे यासाठी जगभरातील अशा प्रकल्पाचा अभ्यास केला आणि त्यातून अमेरिकेतील टेनेसी खोरे प्राधिकरणाचे (टीव्हीए) उदाहरण समोर ठेवून त्या धर्तीवर या निगमाची व प्रकल्पाची उभारणी करायचं ठरवलं.

त्यांनी टेनेसी खोऱ्याच्या योजनेचे अनेक अहवाल मागवून घेतले व स्वतः अभ्यास केला. नोकरशहांवर अवलंबून राहिले नाहीत. त्याचप्रमाणे भारतातील म्हैसूर येथील तुंगभद्रा व पंजाब मधील छोट्या मोठ्या धरणांचा सुद्धा अभ्यास केला.

त्यांच्या नेतृत्वाखाली मजूर खात्याच्या अंतर्गत सेंट्रल पॉवर बोर्ड नावाचे एक मंडळ स्थापन करण्यात आले. स्वतः आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. नद्या, धरणे अणि विद्युत प्रकल्प हे सर्व या खात्याकडे सोपविण्यात आले. सुमारे तीस महिने दामोदर नदीच्या धरण प्रकल्पावर राजकीय विचार मंथन करण्यात आले.

शेवटी आंबेडकरांच्या खंबीर धोरणामुळे राजकीय निर्णय घेण्यात येऊन दामोदर प्रकल्प डॉ. आंबेडकरांनी कार्यान्वित केला.

ही योजना राबविण्याकरिता अनुभवी आणि हुशार तंत्रज्ञ हवा होता. त्यासाठी हे काम इजिप्तमधील आस्वान धरणावर काम करणाऱ्या प्रमुख ब्रिटिश इंजिनीयरला द्यावे असे इंग्रज सरकारचे मत होते. परंतु आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये भारतासारख्या विस्तीर्ण अशा नद्या नाहीत आणि तेथील इंजिनीअरनां अशा मोठ्या नद्यांवर धरणे बांधण्याचा अनुभव नाही असे ठणकावून सांगितले. त्यापेक्षा अमेरिकन तंत्रज्ञ उपयुक्त आहेत असे आपले म्हणणे त्यांनी ब्रिटिश सरकारला मान्य करण्यास भाग पाडले.

पूरनियंत्रण, जलसिंचन व वीजनिर्मिती हे तिन्ही उद्देश साधण्यासाठी भारत सरकारच्या निमंत्रणानुसार डब्ल्यू. एल्. व्हूरदुइन या अमेरिकन तज्ञाने दामोदर खोरे प्रकल्पाचा आराखडा तयार केला.

अमेरिकन तंत्रज्ञांचे काम संपल्यानंतर सेंट्रल वॉटर इरिगेशन नेव्हिगेशन कमिशनचे काम बघण्याकरिता लायक भारतीय तंत्रज्ञ नेमणे आवश्यक होते. आणि आंबेडकरांना यासाठी केवळ भारतीय माणूसच हवा होता. त्यावेळी पंजाबमध्ये मुख्य अभियंता पदावर ए.एन.खोसला होते. त्यांच्या नावाची शिफारस झाली.

या खोसला इंजिनियरचे डॉ.आंबेडकरांबद्दल मत कलुषित होते. त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या हाताखाली काम करण्यास प्रथम नकार दिला. परंतु डॉ.आंबेडकरांनी त्यांना भेटीस बोलावून स्पष्ट सांगितले की

एखादा इंग्रजी किंवा अमेरिकन इंजिनिअर नेमणे मला कठीण नाही. परंतु मला भारतीय तंत्रज्ञ हवा आहे.

आंबेडकरांचे हे खडे बोल ऐकून मुख्य अभियंता खोसला यांचे डोळे उघडले आणि त्यांनी ते पद तात्काळ स्वीकारले.

डॉ.बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या या प्रकल्पाला वेग मिळाला. लवकरच देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकरांची कायदा मंत्री पदी निवड झाली. बाबासाहेब संविधानाच मसुदा बनवण्यात गढून गेले होते मात्र त्यांनी दामोदर प्रकल्पावरील आपले लक्ष कमी केलं नाही.

संसदेने फेब्रुवारी १९४८ मध्ये संबंधित कायदा संमत केल्यावर जुलै १९४८ मध्ये दामोदर खोरे निगम (डिव्हीसी )अस्तित्वात आला.

निगमाकडे कायद्याने खालील कार्ये सोपविण्यात आली आहेत:

(१) धरणे बांधून जलसिंचनाची सोय करणे, (२) वीजनिर्मिती करून तिचा पुरवठा करणे, (३) पूरनियंत्रण करणे, (४) दामोदर नदीचा व तिच्या उपनद्यांचा जलमार्ग म्हणून उपयोग करणे, (५) दामोदर नदीच्या खोऱ्यात जंगलांची लागवड करून जमिनीची धूप थांबविणे व (६) खोऱ्यातील आरोग्य, शेती, उद्योग यांचे संवर्धन करणे.

या प्रकल्पाची उभारणी बिहार व प. बंगाल राज्ये आणि केंद्र सरकार यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

दामोदर व बराकर या नद्या व त्यांच्या उपनद्यावर तिलैया, मैथॉन, पानचेत व कोनार येथे धरणे बांधण्यात आले. त्यातील पहिल्या तीन ठिकाणी एकूण १०४ मेवॉ. क्षमतेची तीन जलविद्युत केंद्रे उभारण्यात आली. ही चारही धरणे झारखंडमध्ये असून त्यांच्यासाठी एकूण ४२ कोटी रु. खर्च झाला. तिलैया धरण १९५३ मध्ये, कोनार धरण १९५५ मध्ये व मैथॉन धरण १९५७ मध्ये पूर्ण झाले.

१३६·८ किमी. लांबीच्या डाव्या अंगाच्या कालव्याने राणीगंज येथील कोळशाच्या खाणी कलकत्त्याशी जलमार्गाने जोडल्या गेल्या.

खास पूरनियंत्रणासाठी बांधलेले दामोदर नदीवरील पानचेत धरण व तेथील जलविद्युत केंद्र ही दोन्ही १९५९ अखेर कार्यान्वित झाली. बंगालमधील विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला. बिहार, झारखंड येथील शेतांना पाण्याची सोय झाली. दामोदर नदीचे महाप्रलयकारी पूर येणे बंदच झाले. झारखंडपासून ते बंगाल पर्यंतच्या करोडो लोकांचे जगणे सुसह्य झालं.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीने उभा केलेला हा प्रकल्प दामोदर नदीला बंगालच्या शापापासून तिथल्या शेतकऱ्याचा वरदान बनला.

( संदर्भ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लेखक – वसंत मून )

Leave A Reply

Your email address will not be published.