पुण्याच्या नाडकर्णींंना जगातला सर्वात कंजूष बॉलर म्हणून ओळखले जायचे.

साठच दशक होत. त्याकाळात क्रिकेट तसही खूप कमी खेळल जायचं. इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारखे त्याकाळातले दादा टीम भारत पाकिस्तान या उपखंडातल्या टीम बरोबर सामना खेळायला तयार नसायचे. वर्षातून एखादा आंतरराष्ट्रीय टीमचा दौरा व्हायचा, त्यासाठी सुद्धा बीसीसीआयला त्यांची खूप मनधरणी करावी लागायची. मग कधी तर उपकार केल्यासारख्या मोठया टीम भारत-पाकिस्तानला यायच्या.

१९६४ सालच्या जानेवारी महिन्यात इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर आली. त्यावेळी त्यांचा कॅप्टन होता एम.जे.के स्मिथ आणि भारताचा कर्णधार होता नवाब मन्सूर आली खान पतौडी. ३ जानेवारीला इंग्लिश टीम भारतात उतरली.

१० जानेवारीला खेळला जाणारा पहिला सामना होता मद्रासमध्ये म्हणजे आजच्या चेन्नईला.

टायगर पतौडीने टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली. कधी नव्हे ते भारतीय बॅट्समननी जबरदस्त सुरवात केली. ओपनर बुधी कुंदरनने अफाट बॅटिंग करून १९२ धावा ठोकल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायला दीड तास उरला होता. भारताच्या ४५७ रन्स धावफलकावर लागल्या होत्या, अजून ३ विकेट हातात होत्या. टायगर पतौडीने भारताची इनिंग डिक्लेअर केली.

संध्याकाळच्या वातावरणाचा फायदा घेऊन भारतीय बॉलरनी इंग्लंडचे त्याच दिवशी ६३ धावात २ विकेट घेऊन टाकल्या.

तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा इंग्लंडची टीममध्ये वेगळीच आणीबाणी निर्माण झाली होती. तो म्हणजे पोटदुखी. हॉटेलमध्ये आदल्या रात्री खालेल्या मद्रासी सांबरचा इफेक्ट सकाळी दिसू लागला . मॅच सुरु झाली तरी निम्मे खेळाडू टॉयलेट मधून बाहेरच आले नव्हते. अगोदरच भारतीय स्पिनरनी परेशान केलेलं त्यातच हा नवा प्रॉब्लेम.

सहा खेळाडू पूर्णपणे आजारी होते. त्यापैकी काही जणांना अजून फलंदाजी करायची होती. दोन खेळाडू तरीही मैदानात आले होते पण कधीही इमर्जन्सी मध्ये हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं तर स्टेडियमच्या बाहेर गाडी तैनात करून ठेवली होती.

क्रीज वर होते ब्रायन बोलस आणि केन बॅरिंगटन. बॉलिंगला आले बापू नाडकर्णी. बापू नाडकर्णीना बघूनच दोन्ही इंग्लिश फलंदाजांना घाम फुटला. कारण ही तसच होत,

बापू नाडकर्णी यांची ओळखच लाईन आणि लेंथचा बादशाह अशी होती.

लहानपणी गोट्याच्या गेम मध्ये हुशार असलेल्या बापू नाडकर्णीना पुण्याच्या एसपी महाविद्यालयात प्रोफेसर देवधर यांनी क्रिकेटचे डाव शिकवले. गोट्या खेळण्याचा फायदा की काय कुणास ठावूक पण बापू नाडकर्णी यांचा नेम अचूक होता. असं म्हणतात ते नेटप्रॅक्टिसवेळी खेळपट्टीवर एखाद नाण ठेवीत आणि गोलंदाजीवेळी पैज लावून ते नाणं उडवून लावत. एकदा तर त्यांनी असे सलग ५० कॉईन गोळा केले होते.

या डावखुर्या स्पिनरने बिनचूक लाईन वर टाकलेल्या बॉल मुळे फलंदाजांना धावा काढणेच अशक्य व्हायचे. बापू नाडकर्णीना भारतीय कॅप्टनने बॉलिंग दिल्यावरच इंग्लिश फलंदाजांनी ठरवलं की आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही . कारण विकेट पडली तर पुढे खेळायला कोण खेळाडूच नव्हते.

बापूच्या बॉलिंगचं इंग्लिश फलंदाजाकडे उत्तरच नव्हत. येणारा बॉल अडवणे एवढच. एका पाठोपाठ एक ओव्हर मेडन जाऊ लागल्या. बापूनी त्यांना अनेकदा मोहात पडेल असे बॉल टाकले पण ब्रायन बोलस आणि केन बॅरिंगटननी जवळपास ११४ मिनिट बॉल प्लेड करण्याशिवाय काहीच केले नाही.

तब्बल १३१ सलग बॉल बिनाधावा तशाच निघून गेल्या. बापू नाडकर्णीनी सलग २१ ओव्हर मेडन टाकल्या होत्या. हा एकप्रकारचा विक्रमच होता. १३२ व्या चेंडूवर केन बरिंगटनने एक रन काढली. ती पण विजय मांजरेकर यांनी केलेल्या मिसफिल्डिंगमुळे.

३१७ धावावर इंग्लिश टीम पूर्णपणे कोसळली. बापू नाडकर्णीना त्या इनिंग मध्ये एकही विकेट मिळाली नाही पण त्यांनी टाकलेल्या २९ ओव्हरमध्ये फक्त ३ धावा दिल्या होत्या आणि त्यापैकी २६ ओव्हर निर्धाव होत्या.

स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनी एका नव्या बापूने इंग्रजांना आपल्या अहिंसक बॉलिंगनी छळले.

जगातला रन देण्यास सर्वात कंजूष बॉलर म्हणून बापू नाडकर्णीची ओळख निर्माण झाली. त्यांनी कसोटी सामन्यात केवळ १.६७ धावा षटक दिल्या तर प्रथम श्रेणीत १.६४ धावा षटक आपल्या गोलंदाजीत मोजल्या हा सुद्धा एक जागतिक विक्रमच आहे. फर्स्टक्लास मध्ये त्यांनी ५०० विकेट घेतल्या. बापू नाडकर्णी कामचलाऊ बॅटिंगही करायचे. त्यांनी कसोटीत एक शतकही ठोकले आहे.

काल बापू नाडकर्णींंचे वृद्धापकाळाने निधन झाले, ते ८७ वर्षाचे होते.

त्याच्यानंतर कित्येक बॉलर आले आणि गेले. यानंतरही ही येतील पण त्यांच्यासारखी शिस्तबद्ध गोलंदाजी, त्यांचे विक्रम यांना स्पर्श करण्याच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.