ओबामांचा सुद्धा पराभव झालेला. बायकोने राजकारण सोडायचा सल्ला दिला होता.
बराक हुसेन ओबामा. अमेरिकेच्या इतिहासातील पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष. जवळपास आठ वर्षे ते या पदावर राहिले. दोन वेळा निवडणुका जिंकल्या. अमेरिकेच्या आजवरच्या सर्वात लोकप्रिय राष्ट्राध्यक्षांपैकी एक त्यांचं नाव घेतलं जात.
प्रचंड मेहनतीने अनेक अडथळे पार करून ते या सर्वोच्च पदाला पोहचले. यात त्यांच्या पत्नीने मिशेल ओबामाने देखील समर्थपणे साथ दिली.
पण एक काळ असा होता की बराक ओबामा यांना मिशेलनी राजकारण सोडायचा सल्ला दिला होता.
अगदी लहानपणापासून बराक ओबामा यांना राजकारणात रस होता. त्यांचे वडील कृष्णवर्णीय तर आई श्वेत वर्णीय. दोघांचा घटस्फोट झालेला. त्यामुळे बराक ओबामा आपल्या आईकडे आजी आजोबांसोबत वाढले.
हार्वर्ड सारख्या जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या विद्यापीठात लॉचं शिक्षण घेतलं. तिथे एक स्कॉलर स्टुडंट म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. हार्वर्ड रिव्हू या प्रसिद्ध कायदेविषयक पेपरमध्ये लेखन संपादन केलं. त्याची निवडणूक जिंकून अध्यक्षपद मिळवल. ही त्यांची पहिली निवडणूक व पहिला विजय होता.
कॉलेजमध्ये असतानाच इंटरनशिपच्या निमित्ताने मिशेलशी त्यांची ओळख झाली.
दोघे प्रेमात पडले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. तेव्हा मिशेलचा भाऊ त्यांना भेटायला आला होता. त्याने बराक यांना पुढे काय करायचं आहे हा प्रश्न विचारला तेव्हा ओबामा म्हणाले,
“युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा प्रेसिडेंट बनायचा आहे.”
हे ऐकून ओबामा यांचा मेहुणा हसला. मिशेल यांनी पण त्याकडे दुर्लक्ष केलं. एखादद काळा माणूस प्रेसिडेंट पदावर कसा जाईल. त्याकाळी तर ते दिवास्वप्नच होतं. हार्वर्ड मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर बराक ओबामा यांनी मिशेलशी लग्न केलं. दोघे शिकागो येथे चांगली नोकरी करू लागले.
याच काळात बराक ओबामा यांना इलिनॉइस प्रोजेक्ट व्होट हे काम मिळालं.
इलिनॉइस हे अमेरिकेतील मोठ्या राज्यांपैकी एक. पण येथे अनेक नागरिक असे होते ज्यांची नावे मतदार यादीत नव्हती. ते मुख्यतः कृष्णवर्णीय होते. बराक ओबामा यांनी त्यांची जनजागृती करून जवळपास दीड लाख नवीन मतदार यादीत जोडले. त्यांच्या मुळेच इलिनॉइसमध्ये पहिली कृष्णवर्गीय महिला निवडून आली.
बराक ओबामा यांना पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचा विश्वास त्यामुळे आला होता.
त्याकाळी वयाच्या फक्त तेहतिसाव्या वर्षी ते स्वतःच आत्मचरित्र लिहित होते,
“ड्रीम्स फ्रॉम माय फादर”
घर फक्त मिशेल ओबामा यांच्या पगारावर चालत होतं. घरात लहान बाळाच आगमन झालेलं. सगळा ताण मिशेल यांच्यावरच पडला होता. पण आपल्या नवऱ्यावर तिचा पूर्ण विश्वास होता.
१९९५ साली बराक ओबामा यांनी पहिली निवडणूक लढवली.
स्टेट सिनेट म्हणजे आपल्या कडील विधानसभेसारखा प्रकार. डेमोक्रॅटिक पक्षाकडे त्यांनी तिकीट मागितले. तिकीट देताना तिथे पक्षांतर्गत निवडणुका होतात. बराक ओबामा यांनी आश्चर्यकारकरित्या एलीस पाल्मर या जुन्या अनुभवी सिनेटरला पाडले व पक्षाचं तिकीट मिळवलं.
या भागात रिपब्लिक पक्षाचे विशेष वजन नसल्यामुळे ओबामा यांचा सहज विजय झाला. त्यांनी आपल्या स्वप्नाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी पार केली होती.
मतदार नाव नोंदणीच्या कामातून बराक ओबामा यांची ओळख इलिनॉइस राज्याला झाली होती. उच्चशिक्षित तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांते फेमस झाले होते. त्यांच्या यशाची नोंद राष्ट्रीय मिडीयाने देखील घेतली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी भरीव कामगिरी केली होती.
पण खरी लढाई पुढे होती.
सिनेटर म्हणून काम करताना बराक ओबामा यांना अनेक अडथळे आले. कौतुक करणारी मंडळी प्रत्यक काम करायच्या वेळी साथ द्यायला पुढे येत नव्हती. त्यांनी आणलेली अनेक विधेयके त्यांच्याच पक्षातील काही नेते हाणून पाडत होते.
ओबामा यांना खरे तर शिकागोचा मेयर व्हायचे होते पण तिथल्या माजी मेयरचा मुलगा रिचर्ड एम डली हा मेयरपदी आला. तो श्वेतवर्णीय असूनही त्याने कृष्णवर्णीय समाजाशी व्यवस्थित जुळवून घेतले व भक्कम फळी निर्माण केली. ओबामा यांच्या लक्षात आले की इथे आपला टिकाव लागणार नाही.
मग त्यांनी यु.एस. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सिनेट निवडणुकीकडे लक्ष वळवले.
तिथे पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी त्यांचा सामना बॉबी रश यांच्याशी होता.
बॉबी रश हे जुने जाणते नेते होते. इलिनॉइस ब्लॅक पँथर या संघटनेच्या वतीने त्यांनी तळागाळात जाऊन काम केले होते. या पूर्वी देखील दोन वेळा त्यांनी निवडणूक जिंकली होती.
या मानाने बराक ओबामा हे अगदीच अननुभवी होते. त्यांनी गरीब वस्तीत काम केलेलं पण त्यांचा जन्म बॉबी रश यांच्या प्रमाणे तिथला नव्हता. बराक ओबामा यांना त्यांच्या श्वेत वर्णीय उच्च मध्यमवर्गीय आजी आजोबांनी वाढवलेलं. यामुळे कृष्णवर्णीय समाजातील नेते त्यांना आपलं मानत नव्हते.
हा तर काळ्या माणसाचा मुखवटा घातलेला गोरा माणूसच आहे.
अस त्यांच्या बद्दल बोलल जात होतं. बराक ओबामा उच्चशिक्षित आहेत, त्यांचा मिडियामध्ये गौरव होतो या गोष्टी त्यांच्या विरुद्ध जात होत्या. यातच बॉबी रश यांच्या मुलाचा हल्लेखोराने गोळ्या घालून खून केला. त्यामुळे सहानुभूती रश यांच्या कडे वळली.
मतदान केंद्रावर लोक मत टाकायला येत होते तेव्हाच ओबामा यांना कळून चुकलेल की ही निवडणूक आपल्या हातातून निसटलेली आहे.
गोऱ्या माफियांचे पाठीराखे उमेदवार अशी ओबामा यांची प्रतिमा निर्माण केली गेली व त्यांचा मोठा पराभव झाला.
त्यांना आपल्या पराभवाने बरच काय काय शिकवलं. यातील सर्वात महत्वाची गोष्ट संयम आणि समतोल ही होती. फक्त मोठमोठ्या गप्पा मारण्यापेक्षा तळागाळात जाऊन काम करावे लागणार व आपल काम लोकांना समजेल अशा भाषेत पोहचवाव लागणार हे त्यांनी मनाशी बांधून घेतलं.
ओबामा परतले तसा त्यांच्यात खूप मोठा बसल झाला होता. लोकांशी, मीडियाशी संपर्क त्यांनी वाढवला. आपल कुठ चुकतंय याच आत्मपरिक्षण रोज चाललं होतं.
या निवडणुकीत त्यांचा बराचसा पैसा खर्च झाला होता.
चांगली चाललेली नोकरी त्यांनी कधीच सोडून दिलेली. घरात दोन लहान मुली होत्या. मिशेल यांना आता आर्थिक स्थैर्य हवे होते. पण ओबामा नव्याने पुढच्या निवडणुकीची तयारी करू लागले होते. घरात दोघांच्यात ताणतणाव वाढत चालला होता. कधीही तुटू शकेल एवढे संबंध विकोपाला जाऊ लागले होते.
ओबामा यांचे मित्र व परिवार देखील आता हा निवडणुकीचा जुगार नको असं सांगत होते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर अनेक गोष्टी होत्या. निवडणूक जिंकूनही आर्थिक स्थितीत फरक काही पडणार नव्हता. राजकारण हा म्हाताऱ्यांचा खेळ यात ओबामाने आपली उमेदीची वर्षे घालवू नये अस मिशेल यांचं म्हणण होत.
बराक यांनी तिला सांगितल,
“राजकारण हा तुझ्यातही ताण आहे खरं पण ही शर्यत मी जिंकेन ही शक्यता जास्त आहे, मी आयुष्यातला बराच काळ समाजसेवेसाठी दिला आहे. मी जिंकलो तर त्यात खूप फरक पडेल, मी अधिक कार्य करू शकेन..तू जर परवानगी दिलीस तर अर्थात. हरलो तर मी राजकारणातून कायमचा बाहेर जाईन.”
मिशेल यांना बराक यांच्या शब्दातला खरेपणा जाणवला. आपण सोड म्हणालो तर हा राजकारण सोडेल हा विश्वास वाटला, त्या पेक्षाही यावेळी जिंकेन हा विश्वास जास्त जाणवला. मिशेल नी यावेळी संधी देऊ अस ठरवलं.
पुढच्या दोनच वर्षात ओबामा यांनी अमेरिकन सिनेटची निवडणूक लढवण्यासाठी उतरले.
त्यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाचे पितर फिट्सगेराल्ड हे मोठे उमेदवार होते. त्यांच्याकडे पैशाचे मोठे पाठबळ होते. शिवाय ओबामांची मते खाण्यासाठी आणखी एक कृष्णवर्णीय उमेदवार उभा करण्यात आला होता.
यावेळी मात्र ओबामा यांनी कोणतीही चूक केली नाही. कंप्युटरच्या सहायाने स्मार्ट प्रचार तर केलाच पण शिकागोच्या प्रत्येक वार्डात ते गेले. स्वतःची भाषणे ठोकण्यापेक्षा त्यांची प्रश्ने समजावून घेतली.फक्त कृष्णवर्णीयच नाही तर श्वेत वर्णीय मतदारांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांचे प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी आपली ब्लूप्रिंट तयर केली.
या निवडणुकीच्या प्रचारात त्यांची घोषणा होती,
“यस, वुई कॅन !!”
प्रत्येकजण आपला रंग, वंश, धर्मभेद सोडून जर देशासाठी काम करू लागला तर बदल घडणे शक्य आहे हे त्यांचं ब्रीद होतं. आपल्या मुलाखतीमध्ये ओबामा हे मार्टिन ल्युथर किंग, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन यांची उदाहरणे देत. त्यांनी जर करून दाखवल तर आपल्याला का शक्य नाही.
त्यांच्या ऑफिस मध्ये बॉक्सर मोहम्मद अलीचा फोटो लावला होता. शत्रूला हरवन्यासाठी मुठ्या आवळलेल्या अलीच चित्र विजयासाठी मोठी लढाई लढण्याच प्रतिक होतं.
ओबामा यांच्या काळ्यांनी, गोऱ्यांनी, तरुण,वयस्कर, महिला, पुरुष,शहर, खेडे सगळ्या मतदारांनी भरघोस मते दिली. अशक्यप्राय वाटणारा विजय ओबामा यांनी जिंकून दाखवला. त्यांचं विजयाच्या सभेला लाखोंची गर्दी झाली होती. मागे यस, वुई कॅन !!चे पोस्टर लागले होते.
ओबामा यांनी करून दाखवल होतं. या विजयानंतर फक्त सहाच वर्षात त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. तिथे देखील प्रचारात यस, वुई कॅन हीच घोषणा होती. २००८ साली ओबामा यांनी मिशेलच्या भावाला दिलेलं वचन पूर्ण केलं. ते राष्ट्राध्यक्ष बनले.
संदर्भ- ‘बराक ओबामा’ मेधा ना.मराठे
हे ही वाच भिडू.
- मिशेल आणि बराक ओबामाची साधीशी लव्हस्टोरी एका आश्चर्यापेक्षा कमी नाही.
- आज अहमदाबादला आलेले ट्रम्प तात्या एकेकाळी भारतात आले की पुण्याला उतरायचे !
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा माझे सहकारी मला सर म्हणतात.
- वर्णभेद-विरोधातील सहा आंदोलन, ज्यांचा इतिहास आपणांस माहितच हवा.