बाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा मोदींनी बाटला हाऊसचा मुद्दा काढला…

२०१९ ची लोकसभा निवडणूक असो की मग पश्चिम बंगाल किंवा गुजरातच्या निवडणुकीचा प्रचार असो, निवडणूक वेगळ्या असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विषय सर्व प्रचारामध्ये चर्चेत आणत असतात.

तो म्हणजे बाटला हाऊस एन्काउंटर…

मोदी हा विषय चर्चेत आणतात आणि काँग्रेस दहशतवादाला खतपाणी घालते असं ठासून सांगतात. सुरत शहरात प्रचार करतांना मोदींनी बाटला हाऊसचा उल्लेख करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

ते म्हणाले की,

 “गुजरातच्या तरुण पिढीने अहमदाबाद आणि सुरातच सिरीयल बॉम्ब ब्लास्ट पाहिलेले नाहीत. मी सुरतच्या लोकांना दहशतवादाच्या शुभचिंतकापासून सावधान करतोय. दिल्लीच्या बाटला हाऊस एन्काउंटर मध्ये एक पोलीस अधिकारी शाहिद झाला होता. परंतु काँग्रेसने त्या एन्काउंटरवरच प्रश्न निर्माण केले होते.” 

परंतु लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मोदी ज्या बाटला हाऊस एन्काउंटरवर टीका करतात तो नेमका काय आहे, ज्यामुळे कायम काँग्रेस अडचणीत येत असते. तर एन्काउंटरमागे असलेली काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांना जबाबदार मानलं जातं. 

काँग्रेसची भूमिका समजून घेण्याआधी बाटला हाऊस प्रकारात नेमकं काय घडलं होतं ते समजून घ्या.   

१४ वर्षांपूर्वी १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीतील करोल बाग, कॅनॉट प्लेस, इंडिया गेट आणि ग्रेटर कैलाश येथे साखळी बॉम्बब्लास्ट झाले होते. तर कॅनॉट प्लेस जवळील रिगल सिनेमा हॉल, इंडिया गेट, संसद मार्ग या हिकांचे बॉम्ब पोलिसांनी डिफ्युज केले होते. या बॉम्ब ब्लास्टमध्ये ३० जणांचा मृत्यू झाला होता तर १०० जण जखमी झाले होते. 

यावेळी केंद्रात काँग्रेसच सरकार होते.

याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १९ सप्टेंबर २००८ रोजी, दिल्ली पोलिसांचं विशेष पथक जामिया नगरमधील बाटला हाऊसमध्ये पोहचलं. आणि त्यानंतर  तिथे चकमक घडली. या चकमकीत जिथे निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्यासह इंडियन मुजाहिद्दीनचे दोन संशयित दहशतवादी मारले गेले.

अनेकांनी चकमकीच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दावा केला की ती चकमक खोटी होती.

पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सने दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चकमकीचा तपास केला आणि अखेरीस दिल्ली पोलिसांना क्लीन चिट दिली. गोळीबारातील मृतांच्या पोस्टमॉर्टम अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. NHRC च्या अहवालात देखील त्याचा समावेश नव्हता. एवढेच नाही तर, उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले त्याच्या दोन दिवस आधी हा अहवाल देण्यात आला होता.

फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली हाय कोर्टाने पोलिसांना अतिरिक्त पुरावे ट्रायल कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी दिली होती. अजूनही या बनावट चकमकीवरचे प्रश्न अनुत्तरितच आहेत. ज्यावर  जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला बाटला हाऊसवर चित्रपटही आला होता.  

या एन्काउंटरला काँग्रेस नेत्यांनी बनावट एन्काउंटर म्हटलं होतं. 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंग या काँग्रेस नेत्यांसोबत, समाजवादी नेते अमर सिंह आणि तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी सुद्धा या एन्काउंटरला बनावट एन्काउंटर म्हटलं होतं.  

या प्रकरणावर सर्वात आधी मत मांडलं होतं ते दिग्विजय सिंह यांनी. 

ते म्हणाले की, एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या मुलांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. मी मागणी करतो की या केसवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी.”

दिग्विजय सिंग यांनी एन्काउंटरमधील एक फोटो सुद्धा दाखवला होता, ज्यात एकाच्या डोक्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तेव्हा दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘जर हा एन्काउंटर होता तर डोक्यावर पाच गोळ्या कशा झाडण्यात आल्या ?’

परंतु दिग्विजय सिंह यांच्या दाव्याला तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी खोडून काढलं होतं. ते म्हणाले होते की, हा एन्काउंटर बनावट नव्हता. परंतु दिग्विजय सिंह हे स्वतःच्या विधानावर ठाम होते. जानेवारी २०१२ मध्ये त्यांनी पुराव्यांच्या आधारावर हा एन्काउंटर बनावट होता असं म्हटलं होतं.   

दिग्विजय सिंह आणि पी. चिदंबरम यांचे मतभेद होतेच, परंतु आणखी एका काँग्रेस नेत्याने दोन विरोधाभासी मतं मांडली होती. 

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी १० फेब्रुवारी २०१२ रोजी आजमगढमध्ये प्रचार करतांना या घटनेवर मत मंडल होतं. ते म्हणाले होते की, ‘बाटला हाऊस प्रकरणाचे फोटो बघून सोनिया गांधी रडल्या होत्या.’ खुर्शीद यांच्या या विधानानंतर चांगलच राजकीय वादळ उठलं होतं. तेव्हा खुर्शीद यांनी स्वतःच्या विधानावर माघार घेतली. सोनिया गांधी रडल्या होत्या असं आपण म्हटलं नव्हतं, असं ते म्हणाले. 

बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरण आजही अनुत्तरीतच आहे. या प्रकरणाचा पूर्णपणे खुलासा अजूनही झालेला नाही. परंतु या प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आजही काँग्रेसवर दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याची टीका केली जाते. काँग्रेस नेत्यांसोबतच ममता बॅनर्जी, अमर सिंग, बसपाचे नेते यांनी सुद्धा या एन्काउंटरला बनावट म्हटलं होतं, त्यामुळे मोदी निवडणुकीच्या प्रचारात बाटला हाऊसचं प्रकरण पुन्हा पुन्हा उकरून काढतात. 

हे ही वाच भिडू  

  

 

Leave A Reply

Your email address will not be published.