फक्त आताच्या डॉक्युमेंट्रीचाच विषय नाहीये, बीबीसी भारतात कायम कॉन्ट्रोव्हर्सीतच राहिलीये…

सध्या एक वाद चांगलाच पेटलाय आणि तो म्हणजे बीबीसीने तयार केलेल्या एका डॉक्युमेंट्रीचा. या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’. या डॉक्युमेंट्रीमध्ये काय दाखवलंय? तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आयुष्यातला सुरूवातीचा काळ.

या डॉक्युमेंट्रीमध्ये २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीचाही उल्लेख आहे.

खरंतर ही डॉक्युमेंट्री ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अप्रकाशित अहवालावर आधारित आहे. या अहवालानुसार ही डॉक्युमेंट्री बनवलीये. या अहवालामध्ये गुजरात दंगलीचं कारण सांगितलंय ते म्हणजे,

“आवश्यक कारवाईत दिरंगाई केल्यामुळे हिंसाचाराला सुरुवात झाली. त्याला वरिष्ठ पातळीवरून पाठिंबाही मिळाला”

ही डॉक्युमेंट्री भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केलीये. युट्यूब आणि ट्विटरला भारत सरकार कडून ती डॉक्युमेंट्री ब्लॉक करण्यासाठी निर्देश देण्यात आलेत. या डॉक्युमेंट्रीचा थेट व्हिडीओ किंवा त्याची लिंक ही ट्विटर आणि युट्यूबवरून कायम स्वरुपी डिलीट करण्याचे हे निर्देश देण्यात आलेत.

हे असं सगळं या डॉक्युमेंट्रीबाबतीत झालंय, पण बीबीसी काही पहिल्यांदाच भारतात कॉन्ट्रोव्हर्सीत आलीये असं नाहीये. अगदी भारतात बीबीसी एकदा बॅनसुद्धा झाली होती.

बघुया याआधी नेमकं कधी आणि काय घडलं होतं की, बीबीसी कॉन्ट्रेव्हर्सीमध्ये आली होती.

काश्मीरमधल्या कवरेज वरून झालेला वाद:

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर बीबीसीने केलेल्या कव्हरेजवरून बीबीसी चर्चेत राहिलं होतं.

विषय असा झालेला की, १० ऑगस्ट २०१९ रोजी, बीबीसीने या भागातला एक ‘एक्सक्ल्युझिव्ह व्हिडिओ’ प्रकाशित केला ज्यामध्ये बॅकग्राऊंडला बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज येत होता आणि लोक त्या बंदुकीच्या गोळ्यांपासून वाचण्यासाठी म्हणून सैरावैरा पळत होते असं दिसत होतं.

यावेळी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू केली होती, इंटरनेट आणि लँडलाइन सेवासुद्धा बंद ठेवली होती. निषेधांबद्दलचा अहवालसुद्धा गृह मंत्रालयाने फेटाळला होता. हे कवरेज  ‘पूर्णपणे बनावट’ आणि ‘चुकीचं असल्याचाही दावा करण्यात आला होता.

२०१२ च्या सामुहिक बलात्काराविषयीची बीबीसीची डॉक्युमेंट्री.

२०१५ मध्ये बीबीसीने India’s Daughter म्हणजे भारताची लेक या नावाने एक डॉक्युमेंट्री बनवली होती. ही डॉक्युमेंट्री २०१२ साली नवी दिल्लीतल्या २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराविषयी होती.

या डॉक्युमेंट्रीचं वर्ल्डवाईड टेलिकास्ट हे ८ मे रोजी वूमन्स डे ला होणार होतं, पण दिल्ली पोलिसांनी कोर्टातून हे टेलिकास्ट थांबवण्याचे आदेश आणले आणि हे टेलिकास्ट झालं नाही. आक्षेपार्ह कंटेंट म्हणून ही डॉक्युमेंट्री बॅन करण्यात आली. असं असलं तरी, या डॉक्युमेंट्रीमुळे अनेक जण सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले होते.

प्रचंड गदारोळ झाल्यानंतर बीबीसीने सांगितले की, डॉक्युमेंट्री भारतात प्रसारित करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला ही डॉक्युमेंट्री  जगात कुठेही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितलं होतं.

२००८ मध्ये बँगलोरमधील खोटी बातमी.

२००८ साली बीबीसीने एक बातमी चालवली होती. ही बातमी बँगलोरमधली होती. या बातमीत प्रिमार्क या कपड्यांच्या ब्रँडसाठी बालमजूर काम करतायत असं क्लेम करण्यात आलं होतं. व्हिडीओमध्ये तसं दिसतही होतं. या बातमीनंतर जनमानसात काहीसा आक्रोश निर्माण झाला होता.

तीन वर्षांच्या अंतर्गत चौकशीनंतर बीबीसीने हा व्हिडीओ चुकीचा असण्याची शक्यता आहे असं म्हटलं.

बीबीसी भारतात एकदा बॅनसुद्धा झाली होती.

१९७० मध्ये, बीबीसी टू या बीबीसीद्वारे मीडिया हाऊसद्वारे चालवल्या जाणार्‍या वाहिनीने, फ्रेंच पिक्चर निर्माते लुई माले यांच्या कलकत्ता आणि फॅंटम इंडिया या दोन माहितीपटांचे प्रसारण केले. चित्रपटांनी भारत सरकार आणि ब्रिटनमधील डायस्पोरा यांना संतप्त केले कारण त्यांनी देशाला खराब दाखवलं होतं.

त्यानंतर १९७२ पर्यंत बीबीसीला भारतातून हद्दपार करण्यात आलं आणि डॉक्युमेंट्रीजवर बंदी घालण्यात आली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात बीबीसीचं ब्रॉडकास्टींग पुर्णपणे बंद करण्यात आलं होतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.