२०१४ पुर्वी रामदेवबाबा महागाईवर लय बोलायचे, आत्ता सपशेल यु टर्न मारलाय..!

योगगुरु रामदेव बाबांनी आपल्याला एक स्वप्न दाखवलेलं….

‘भारतात काळा पैसा आला तर, पेट्रोल ३० रूपये, एलपीजी सिलेंडर ३०० रुपये होणार.’ आता लग्गेच रामदेवबाबांचं जुनं ट्विट हुडकायला जाऊ नका, बाबांनी ते ट्विट कधीच डिलीट केलंय.

पण पत्रकार मंडळी लय डोकं लावतात. त्यांना चांगलाच लक्षात राहतं, इतिहासात कोण काय बोललंय. अशाच एका पत्रकाराने बाबांना जुन्या ट्विटची आठवण करून दिली. तसेच यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि एलपीजीच्या दरवाढीच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यांची आठवण करून दिली.

यावर रामदेव यांनी रिपोर्टरला इग्नोर मारायचा प्रयत्न केला. पण पत्रकार काय माघार घेणारा नव्हता तो हात धुवून मागे लागला अन विचारायला लागला. या प्रश्नाने चिडलेल्या रामदेव बाबांनी उत्तर दिले कि,

“हां मैंने बोला था. अब नहीं बोलुंगा. मैं तेरे प्रश्न के उत्तर नहीं दूंगा तो क्या करेगा? पुछ पाडेगा मेरी ? तेरे हर प्रश्न के उत्तर देने के लिए मैं क्या ठेकेदार हूं ? चुप हो जा, आगे से पूछेगा तो ठीक नहीं होगा”अशा आवेशात त्यांनी त्या पत्रकाराला उत्तरं दिलीत. 

२०१४ पासून रामदेव बाबा बरेच ऍक्टिव्ह झालेत हे सर्वच जण जाणून आहेत. त्याही आधी ते ज्याप्रकारे सक्रिय होते ते विशेष आहे.

विषय आहे हिप्पोक्रसीचा. आम्ही काय बोलत नाहीये. तुम्ही रामदेव बाबांचे जुने ट्विट किंव्हा बातम्या सर्च करून बघाल तर तुमचा हाच डायलॉग असणारे “भाई हिप्पोक्रसी की सीमा होती है”.

म्हणजे जसं की, ज्या प्रकारे ते युपीए सरकारच्या काळात महागाई असेल, भ्रष्टाचार असेल वा इतर काही गोष्टी असतील अशा अनेक कारणांवरून ते सरकारवर तुटून पडायचे. तेच आत्ता पेट्रोल,डिझेल, सिलेंडरच्या किंमतीने सगळ्यांना हैराण केलं तेंव्हा लोकांना रामदेव बाबा आठवत आहेत. त्याचं कारण म्हणजे वरचं ट्विट…!

याबाबत काय आम्ही शोधनिबंध नाही लिहणार थोडक्यात सांगणार रामदेव बाबा आधी काय म्हणायचे अन आता काय म्हणतात.

२०१४ मध्ये रामदेव बाबा आप कि अदालत या शो मध्ये प्रेक्षकांना म्हणालेले, तुम्हाला ७५-८० रु चे पेट्रोल पाहिजे कि ३५ रुपयांचं ? गॅस सिलेंडर विना सबसिडी ४२५ चं देणारं सरकार हवंय की १२०० रुपयांना देणारं सरकार हवंय ? लोकं साहजिकच  ३५ रुपयांचं पेट्रोल आणि ४२५ रुपयांचं गॅस सिलेंडर देणारं सरकार हवंय असच उत्तर दिलं होतं.

आता त्याच बाबतीत २०२१ मध्ये रामदेव बाबांनी डायरेक्ट पलटी खाल्ली..

म्हणतात कि, मध्यम वर्गीय लोकांना गॅस सिलेंडर,पेट्रोल डिझेल चे दर महाग वाटत असतील, महागाई वाढली असेल पण लोकांच्या खिश्यातुन जास्त पैसा निघत असेल पण हे लक्षात घ्या कि, देश तर आपलाच आहे ना. नेशन बिल्डिंग साठी एवढं करणं भाग आहे. याचा आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे…

तेच ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांनी रामलीला मैदानावर जाहीर भाषणात सांगितलं कि, आमच्या या मागण्यांना पूर्ण करेल त्यांनाच आम्ही दिल्लीच्या सिंहासनावर बसवू. महागाई, गरिबी, बेरोजगारी हे सगळे मुद्दे मिटतील. जे सरकार काळ्या धनाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करेल त्यांनाच आम्ही जिंकून आणू. 

पण आता बेरोजगारीचा स्कोर पाहता २०२१ पर्यंतचा आकडेवारी पहिली तर लक्षात येतं कि,भारतात बेरोजगारांची संख्या ५३ दशलक्ष आहे. ज्यामध्ये महिलांचे प्रमाण मोठे होते. आणि राहिला मुद्दा महागाईचा आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराचा त्यात रोजच ८०/८५ पैशानी वाढ होतांना दिसतेय. आज मुंबईत ११५ रु. पेट्रोल चा दर आहे. पण या सगळ्या मुद्द्यांवर बाबा रामदेव चाकर शब्द काढत नाहीत.

आता मुद्दा केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर होण्याच्या आरोपाचा…

त्याही आधी म्हणजेच २०११ सालात अण्णा हजारेंचं जनलोकपाल बिलासंबंधी आंदोलन चालू होतं. त्यात काळा पैसा भारतात आणावा या मोहिमेत रामदेव बाबा सक्रिय होते. याच दरम्यान रामदेव बाबांच्या ट्रस्टवर आयकर विभाग छापा मारण्याच्या तयारीत होते.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या मते, रामदेव बाबाचं, पतंजलि योगपीठ हे ट्रस्टच्या नावाखाली आपला व्यवसाय वाढवत आहे,  चॅरिटीच्या नावावर सूट घेऊन कमाई करतेय. पण या आरोपांवर तेव्हा ट्रस्टने आपली कमाई शून्याच्या घरात असल्याचं सांगितलं. पण तपासात ट्रस्टच्या अनोफिशियल खात्यांचा ऑडिट रिपोर्ट मध्ये ७२.३७ करोडच्या नोंदी सापडल्या होत्या. त्यांच्या आयुर्वेदिक औषधांच्या कारखान्यांवर छापेमारी झाली होती.

खरं तर, त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात वातावरण खूपच तापलं होत. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप  लावले जात होते. यात बाबा रामदेव अगदी पुढं पुढं होते. आणि म्हणूनच त्यांच्या मागं काँग्रेसनं ईडी, इन्कम टॅक्स लावत आहे असा त्यांचा आरोप होता.

खुद्द रामदेव बाबांनी त्यांच्या मागं लावलेल्या ईडी, इन्कम टॅक्स विषयी बोलताना म्हंटल होत, ‘‘हमारी सीधी लड़ाई व्यवस्था से है और व्यवस्था जिनके हाथ है वो ताकतवर हैं, क्योंकि वो अपने अधिकार का दुरुपयोग कर रहे हैं।’’

२०१७ ला रामदेव बाबा यातून सुखरूप बाहेर पडले. पुढे त्यांनी पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली अन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे २०१७ मध्ये त्याचे उद्घाटन केलं.  आणि २०१४ च्या आधी त्यांच्या ट्रस्टवर ईडी इन्कमटॅक्स मागे लागली होती, आता त्याच संस्थेला टॅक्समध्ये सूट मिळालीय…किती हा विरोधाभास…

आता आणखी एक मुद्दा म्हणजे, जमिनीचा…

२०१४ च्या आधी रामदेव बाबांनी असं वक्तव्य केलेलं, “हे उद्योगपती जे आहेत ते काय समाजसेवा करायला आलेले नसतात. ट्रस्ट च्या नावाखाली कित्येक उद्योगपती धंदा करायला येतात. ते कवडीमोल भावाने जमिनी विकत घेतात. त्यांना शेकडो, १०० वर्षांच्या बॉण्डवर, भाड्याने हजारो एकर जमिनी दिल्या जातात.  त्यांना इतक्या कवडीमोल भावाने जमिनी दिल्याच नाही पाहिजे. देशाची जमीन अशा उद्योगपतींच्या घश्यात घालण्याचा कुणालाही अधिकार नाही”

आता फॅक्ट बघा….

२०१० मध्ये उत्तराखंड मध्ये भाजप सरकार होतं. त्या दरम्यान बाबा रामदेव यांच्या पतंजलीला सरकारने ५२१ एकर जमीन कवडीमोल भावाने भाड्याने दिली होती. तेच २०१६ मध्ये महाराष्ट्रात भाजप सरकार होतं त्या दरम्यान पतंजलीला नागपूर मध्ये ६५० एकर जमीन भाड्याने मिळाली. याचदरम्यान २०१६ मध्ये उत्तर प्रदेश मध्ये देखील ४५५ एकर जमीन मिळाली होती. तर मध्य प्रदेश मध्ये ४० एकर, आसाम मध्ये १५० एकर, २०१७ मध्ये आंध्र प्रदेश मध्ये १७३ एकर जमीन

आणि पुन्हा २०१९ मध्ये महाराष्ट्रातल्या लातूरच्या औसा येथील ४०० एकर जमीन तत्कालीन फडणवीस सरकारने भाड्याने देण्यात आली. या सगळ्या जमिनी पतंजली ला ५० टक्के डिस्काऊंटमध्ये भाड्याने देण्यात आलेल्या आहेत.

आता वळूया जीन्स च्या मुद्द्यावर…

२०१८ च्या आधीची गोष्ट. आपल्या बऱ्याच योग शिबिरात बाबा रामदेव सांगायचे कि, लोकं जो जीन्स नावाचा प्रकार वापरतात तो मुळातच किती चुकीचा पोशाख आहे. टाईट जीन्स घालून घाम येणार, त्वचेचे आजार होतात.

आता गेम म्हणजे २०१८ मध्ये रामदेव बाबांनी पतंजली जीन्स लॉन्च करत आपल्या जीन्सच्या बाबतीच्या मतावर पलटी खाल्ली.

मजेशीर म्हणजे बाबा रामदेव पतंजली जीन्स लॉन्च करतांना म्हणाले कि, आम्ही इतर महागड्या ब्रॅण्ड प्रमाणे जीन्स देणार नाहीत तर झारा सारखा ब्रॅण्ड एक जीन्स ४ हजार ला विकते, तर आम्ही त्याच क्वालिटीची जीन्स ५०० मध्ये विकतो.  पण तिथे आलेल्या ग्राहकांनी जेंव्हा मीडियाला बाइट्स देतांना सांगितलं कि, ५०० रुपयांची नसून इथे २००० हजार पासून जीन्स मिळतात. 

इतकंच नाही तर त्यांनी असंही वक्तव्य केलेली कि, तुम्ही लोकांनी फाटक्या जीन्स ला सन्मानाची आणि फॅशनची गोष्ट मानता. फाटक्या जीन्स म्हणजेच रिप्प्ड जीन्स घालणाऱ्या लोकांना संस्कार नसतात वेगैरे. पण त्यांच्या पतंजली परिधान स्टोर मध्ये तर फाटक्या जीन्स देखील उपलब्ध आहेत. याचा पुरावा तुम्ही बघू शकता

तर हे आहेत सगळी थोडक्यात उदाहरणं…खोलात जाऊन पाहिली तर तुम्हालाही दिसून येईलच की, २०१४ पुर्वी रामदेवबाबा महागाईवर लय बोलायचे, आत्ता सपशेल यु टर्न मारलाय..!

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.