महाराष्ट्राच्या बाहेर अशी एक निवडणूक चालू आहे, जिथं मराठी माणूस महत्वाचा ठरतोय…

देशात सध्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. भारतीय सवयीप्रमाणे काश्मीर पासून, कन्याकुमारी पर्यंतच्या सगळ्या राज्यांनी यात इंट्रेस्ट घेतला आहे. जो तो कट्टयावर बसून याबद्दल अंदाज बांधत आहेत. पण शेवटी किती झालं तरी ही निवडणूक या पाच राज्यांपुरतीचं महत्वाची असणार आहे हे तर नक्की.

मात्र महाराष्ट्राच्या बाहेर अशीच अजून एक निवडणूक होतं आहे, जी महाराष्ट्र आणि मराठी या दोघांसाठी देखील महत्वाची असणार आहे. सोबतच या राज्याबाहेरच्या निवडणुकीत एक मराठी माणूस महत्वाचा ठरतं आहे. त्यामुळेच फक्त कट्टयावर बसून अंदाज बांधण्याची निवडणूक नक्कीच नाही.

हि निवडणूक म्हणजे बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक

आजपर्यंत मराठी माणसाणं ज्या भूभागासाठी आणि ज्या अस्मितेसाठी आपल्या मागच्या ३ पिढ्या खर्ची घातल्या असा हा प्रदेश. अखंड महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी भाषिक मागच्या ६० वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र या स्वप्नांसाठी लढत आहेत. तिथं वेगवेगळी आंदोलन उभी करतं आहेत. मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज देत आहेत. अशा भागात सध्या निवडणूक होऊ घातली आहे.

खरंतर २०१९ साली इथून भाजपचे सुरेश अंगडी तब्बल ३ लाख ९१ हजारांच्या मताधिक्यानं निवडून गेले होते. मात्र सप्टेंबर २०२० मध्ये त्यांचं कोरोनाने निधन झालं. त्यानंतर मागच्या महिन्यात इथं पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १७ एप्रिल रोजी इथं मतदान पार पडणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

भाजपकडून सध्या इथं दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पत्नी श्रीमती मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून माजी मंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांना तिकीट दिलं आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना तिकीट दिलं आहे. इतर देखील ६ उमेदवार उभे आहेत.

मात्र मुख्य लढत ही भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांमध्ये होणार असल्याचं चित्र आहे.

त्याला कारण आहे तिथलं तयार झालेलं वातावरण.

भाजपसाठी सध्या तिथं अंगडी यांची सहानुभूतीची लाट असली तरी पुन्हा अंगडी यांच्या घरात उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्याच्यात दुमत होतं. मात्र तिथल्या चर्चांनुसार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यामुळे त्यांचे संबंधित असलेले अंगडी यांनाच तिकीट देण्यात आलं आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्यानं नवनवीन आयडिया करत असते. अशीच आयडिया समिती लोकसभेच्या निवडणुकीत देखील वापरते, ज्यामुळे दिल्लीच लक्ष इथल्या प्रश्नांकडे वेधता येईल.

उदा. घ्यायचं झालं तर २०१४ सालच्या निवडणुकीत समितीनं उमेदवार दिला नव्हता. पण समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट NOTA चा प्रचार सुरु केला होता. त्यासाठी पत्रक देखील काढण्यात आली. त्यावेळी NOTA चा प्रचार केला म्हणून काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी जवळपास १५ हजार मत NOTA ला मिळाली होती. 

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीनं लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ५० उमेदवार उभे केले होते. देशात ज्या काही जास्त उमेदवर उभे राहणारी मतदारसंघाची नाव होती त्यात बेळगाव मतदारसंघ आघाडीवर होता. त्यावेळी देखील या सर्व उमेदवारांना मिळून जवळपास ५५ हजार मत मिळाली होती.

याआधी निवडणुकांमध्ये देखील जेव्हा सीमाभागाच आंदोलन सर्वोच्च बिंदूवर होते त्यावेळी समितीच्या एपी पाटील, आनंद गोगटे यांना १ लाखांहून अधिक मत मिळाली होती. 

त्यानंतर आताच्या निवडणुकीत लक्ष वेधण्यासाठी समितीनं सर्वात तरुण म्हणजे २५ वर्षीय शुभम शेळके याला उमेदवारी दिली आहे.

सध्या तो समितीच्या युवा समितीचा अध्यक्ष म्हणून काम बघतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला शुभम केवळ मराठी भाषेच्या आंदोलनातून समितीच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक झाला आहे.

May be an image of 7 people, people standing and outdoors

शुभम शेळके सांगतो,

मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांकडे आपण लक्ष दिलं तर बेळगाव महानगरपालिकेवर लाल-पिवळा झेंडा फडकवण्याची घटना, मणगुत्ती मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच प्रकरण असेल, किंवा सातत्यानं मराठी भाषिकांवर होणारी मारहाण, गुन्हे दाखल अशा प्रकारांमुळे इथला मराठी भाषिक चांगलाच दुखावला आहे.

या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी एक माध्यम म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. इथं जे प्रकार घडतात त्याची दखल दिल्लीत घेतली जावी हा आमच्या समितीचा निवडणूक लढवण्यासाठीचा मुख्य उद्देश असल्याचं देखील शुभम सांगतो.

सोबतच शुभमला या निवडणुकीत शिवसेनेनं देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे उमेदवार कृष्णाजी पाटील यांनी याआधी अर्ज भरला होता, पण मराठी मतांचं विभाजन टळावं यासाठी शिवसेनेनं अर्ज माघारी घेतल्याचं कारण सांगितलं आहे. 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अमित देसाई ‘बोल भिडू’ शी बोलताना सांगतात,

शुभम निवडून येणार यात शंकाच नाही. कारण सध्या तरुणाईला असणारं शुभमचं आकर्षण आणि जेष्ठ लोकांना सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची चीड यामुळे त्याला विक्रमी मतदान होईल. पण कोणतही आर्थिक पाठबळ नसतात शुभम मराठी भाषेसाठी आणि भाषिकांसाठी ही निवडणूक लढवत आहे.

त्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होत असून कदाचित हा निर्णय आत्मघातकी ठरेल पण तरी देखील त्यानं हे पाऊल उचललं आहे, आणि समितीकडून देखील त्याला संधी दिली आहे.

तर कार्यकर्ते श्रीकांत कदम सांगतात,

बेळगावच्या पोटनिवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी सर्वात कमी उत्त्पन्न असलेला शुभम आहे. सध्या तो प्रचार आणि इतर खर्च देखील केवळ लोकवर्गणीतून करत आहे. जिथं जाईल तिथं लोक त्याला ५०० रुपये १००० रुपये अशी मदत करत आहेत. त्यामुळे भाजपपासून सगळ्या पक्षांना दखल घ्यावी लागतं आहे.

आता पर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार का निवडून येऊ शकलेले नाहीत? 

वर सांगितलं त्या प्रमाण याआधी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. पण ते निवडून येऊ शकले नव्हते. त्या पाठीमागे इतर काही राजकीय कारणांसोबत एक शास्त्रीय कारणं मिळतं ते म्हणजे वेगवेगळ्या मतदारसंघात विखुरलेला मराठी भाषिक प्रदेश.

म्हणजे सध्या निवडणूक असलेल्या बेळगाव लोकसभा या ८ विधानसभा मतदारसंघापैकी केवळ बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण या मतदारसंघांमध्ये मराठी भाषिकांचं जास्त प्राबल्य आहे.

तर इतर ज्या भागात प्राबल्य आहे तो निपाणी हा विधानसभा मतदारसंघ चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात येतो. सोबतच तिकडे खानापूर हा मतदारसंघ हा उत्तर कन्नड मतदारसंघात येतो आणि उर्वरित बिदर – भालकी हा प्रदेश बिदर लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो. त्यामुळे मराठी भाषिक भाग हा कोणत्याही सलग लोकसभेचा मतदारसंघाचा भाग नाही.

मात्र इथल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये समितीचे आमदार यापूर्वी निवडून आले होते. त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र यानिमित्तानं या महाराष्ट्राबाहेरच्या निवडणुकीत मराठी माणूस महत्वाचा ठरतोय हे नक्की.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.