भगतसिंहांनी विनवणी करूनही उपोषण सोडले नाही. अखेरीस 63 व्या दिवशी प्राण त्यागले..

तब्बल 2 महिने अन्न नाही, पाणी नाही.. अत्याचार सुरूच होते.. चार-पाच पठाण येणार, हात पाय पकडणार.. एकजण नाकातोंडात रबराची नळी घुसवण्याचा प्रयत्न करणार.. विरोध केला तर मारणार.. कधी पोटात, तर कधी छातीवर, मांड्यावर, हातावर.. कुठेही.. एवढा त्रास सहन करून सुद्धा क्रांतिकारकांनी आपले उपोषण सोडले नाही.

जोपर्यंत एखाद्या माणसाचा जीव जात नाही, तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीचे महत्व समजत नाही. 

मागण्या होत्याच काय? जेलमध्ये चांगले कपडे मिळावे, पेपर वाचायला मिळावे, पुस्तके मिळावीत, चांगले अन्न मिळावे.. कोणत्याही माणसाला जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच मिळाव्या एवढी छोटीशी मागणी.. पण त्यालाही इंग्रजांनी नकार दिला.

20-22 वर्षांचे हे सगळे तरुण.. उपोषणाला बसले. पुढे जे काही या तरुण क्रांतीकारकांना सहन करावे लागले, त्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील.

रोज उठायचं, या सैनिकांकडून मार खायचा.. कधी तोंड फुटायचं, तर कधी हात पाय सुजून जायचे.. गुप्तांगावर सुद्धा मारहाण व्हायची.. अंडकोशावर लाथा मारायचे. रबराची नळी जबरदस्तीने घुसवल्यामुळे नाक, तोंड, घसा यांमध्ये जखम व्हायची. पाण्याच्या जागी दुधाने भरलेले भांडे ठेवले जाई. कोणत्याही प्रकारे उपोषण तोडायचेच, हेच एकमेव ध्येय इंग्रजांसमोर होते. किशोरीलाल यांनी तर रबराची नळी घशातून आत जाऊ नये म्हणून मूठभर तिखट खाल्लं.. 

एकदा तर भगतसिंह, बटुकेश्वर दत्त यांना स्ट्रेचरवरून कोर्टामध्ये आणण्यात आले होते.

आधीच सत्याग्रहामुळे अशक्त झालेलं शरीर.. त्यात कोर्टामध्ये जाण्यासाठी क्रांतिकारक तयार नव्हते. आधीच निकाल ठरवून केवळ सुनावणीचे नाटक करणारी न्यायव्यवस्था आहे, असा क्रांतिकारकांचा आरोप होता आणि तो खरासुद्धा होता. मग त्यांना कोर्टात नेण्यासाठी जबरदस्ती होऊ लागली. तुरुंगाच्या दाराशी भगतसिंह आणि दत्त यांना बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही त्याला नकार दिला.

तेव्हा त्यांच्यावर जबरदस्ती करत दोघांनाही बेड्या ठोकल्या आणि उचलून लॉरीमध्ये फेकले. कोर्टाच्या दाराशी या क्रांतिकारकांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला तर त्यांना फरफटत कोर्टात आणण्यात आले.त्यांचे कपडे धुळीने माखले, फाटले.. तशाच अवस्थेत पोलिसांनी दोघांना उचलले आणि आरोपीच्या पिंजऱ्यात फेकून दिले. त्यांना गंभीर जखम वगैरे होईल, याची साधी तमासुद्धा बाळगली नाही. वेताच्या छडीने केलेली मारहाण स्पष्ट दिसत होती. अंगातून कोणत्या भागातून रक्त येतंय, हेच समजत नव्हते.

जतीनदांवर सुद्धा हेच अत्याचार झाले. जतिनदा म्हणजे जतीनप्रसाद दास. जबरदस्तीने नाकात घुसवलेली रबराची नळी फुफ्फुसात गेले. वरून दुधाचे नरसाळे लावून दूध त्या नळीत ओतले. सगळं दूध फुफ्फुसात जमा झालं. तडफडला राव तो जीव.. फुफ्फुसात संसर्ग झाला. पुरेसे पोषण न झाल्याने त्यांचा एक हात निकामी झाला. दुसरा हात झिजत गेला. दोन्ही पाय निकामी.. दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. 

अक्षरशः इंचाइंचाने मृत्यू त्यांच्या जवळ येत राहीला तरीही अखेरपर्यंत हा योद्धा लढला. 

उपचार घेण्यास जतीनदांनी नकार दिला.. जतीनदांचे लहान भाऊ त्यांना भेटण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची भेट नाकारली.. कोर्टामध्ये बसल्यावर जतीनदांच्या लहान भावाला अक्षरशः लाथाबुक्क्या मारून कोर्टाबाहेर हाकलून लावले. जतीनदा यांचा जो शेवटचा फोटो काढण्यात आला, तो त्यांच्या लहान भावानेच काढला होता.

भगतसिंहांनी विनवणी करूनही उपोषण सोडण्यास ते तयार नव्हते. अखेरीस 63 व्या दिवशी या 24 वर्षाच्या तरुणाने आपले प्राण त्यागले..

त्यांच्या अंतयात्रेला पाच लाखांहून अधिक लोक होती, असा रिपोर्ट व्हाईसरॉयने इंग्लडला पाठवला. जतिनदासांच्या हौतात्म्यानं आख्खा देश ढवळुन निघाला.

देशभरात जतीन दा यांच्या अंतयात्रेची चित्रफित दाखवली गेली. जवळपास महिन्याभरानंतर त्यांच्या मृत्युची चित्रफित राजगुरुंनी पुण्यात पाहिली ते भरपुर रडले होते.

क्रांतिकारक सत्याग्रहसुद्धा करू शकतात, ही गोष्ट यामधून या तरुण क्रांतिकारकांनी ठणकावून सांगितली. केवळ बॉम्ब आणि पिस्तुल म्हणजेच क्रांती नव्हे, तर क्रांती विचारांवरच घडून येऊ शकते हा संदेश या तरुण क्रांतिकारकांनी दिला.

  • केतन पुरी

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.