ती बातमी पाहून आझादांसारख्या कठोर सेनापतीच्या देखील डोळ्यात अश्रु जमा झाले होते…

स्थळ- झाशीमधली क्रांतीकारकांची खोली..

ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंम्बलीमध्ये बॉम्ब फेकला होता. खरेतर, या मोहिमेसाठी भगतसिंहांना पाठवणे आझादांना मुळीच पटले नव्हते. त्यांच्या मते भगतसिंह संघटनेसाठी तसेच भारतात घडत असणाऱ्या सशस्त्र क्रांतीसाठी अतिशय महत्वाचे क्रांतिकारी होते. त्यात, सँडर्स मर्डर केस अद्याप बंद झालेली नव्हती. जर भगतसिंह स्वतःहून पोलिसांकडे स्वाधीन झाले, तर सँडर्स केस मध्ये ते अगदी सहजपणे अडकले जातील. पण भगतसिंहांनी आझादांना ‘आपणच कसे या कामगिरीसाठी योग्य आहोत’ हे पटवून दिल्यामुळे आझादांचा नाईलाज झाला.

पुढे चालून आझादांनी दाखवलेली भीती खरी ठरली. सँडर्स मर्डर केसची पाने पुन्हा पलटली जाऊ लागली. आता भगतसिंहांना सोडवणे गरजेचे झाले. 

यासंबंधीत योजना बनवण्यासाठी झांशीच्या गुप्त ठिकान्यावर सर्व क्रांतिकारक जमले. तेव्हा आझादांचा मुक्काम झांशी परिसरात होता. सर्वजण बोलत बसले होते. दोन योजनांवर शिक्कामोर्तब झाले. पहिली, ‘डेहराडून येथे व्हाइसरॉयचा मुक्काम होता. व्हाइसरॉय शिकारीला जाताच त्याच्यावर बॉम्ब फेकून त्याचा खात्मा करायचा..’

आणि दुसरी म्हणजे ‘भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना दिल्लीवरून लाहोर येथील जेलमध्ये नेत असताना रस्त्यातच हल्ला चढवून या दोन क्रांतीकारकांना सोडवून आणायचे. या दोन योजना कशाप्रकारे घडवून आणण्याच्या याविषयी चर्चा सुरू होती, तेवढ्यात शिव वर्मा काही वृत्तपत्रे घेऊन खोलीत घुसले.

आझाद यांच्यासोबत राजगुरू, भगवानदास माहौर, सदाशिव मलकापूरकर, कुंदनलाल, विश्वनाथ वैंशमपायन यांसारखे अनेक क्रांतिकारी उपस्थित होते. 

शिव वर्मा यांना आलेले पाहताच सर्वांनी त्यांना घोळका घातला. त्यांनी आणलेल्या वृत्तपत्रांमध्ये भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांची माहिती होती. दिल्ली येथे कैदेत असणाऱ्या या दोन तरुण क्रांतिकारकांची आत्तापर्यंत घडलेली सर्व माहिती फोटोसह वृत्तपत्रात छापून आली होती. दोघांचे फोटो आणि बातमी पाहुन इतर क्रांतीकारकांच्या डोळ्यात अश्रु दाटले होते.

त्याही परिस्थितीत आझाद स्वतःला सावरून होते, कारण ते होते संघटनेचे सेनापती.. जर त्यांनीच डोळ्यात पाणी आणले तर खोलीत अश्रुंचा महापुर येईल, याची त्यांना पुरेपूर जाणिव होती. तसेच, सेनापतीने धीर सोडणे त्यांना उचित वाटले नाही. 

सर्व क्रांतिकारक दोघांबद्दल गप्पा गोष्टी करत होते. त्यांच्या आठवणीत रमले होते.. तेवढ्यात एक सहकारी कामानिमित्त खोलीच्या बाहेर निघाला.. त्यावेळी त्याचा पाय चुकून शिव वर्मांनी आणलेल्या वृत्तपत्रावर,ज्यावर भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांची बातमी आणि फोटो होता, त्यावर पडला.. सगळे क्रांतिकारी दोघांच्या आठवणीत रमले असताना आझादांनी आपल्या सहका-याचा वृत्तपत्रावर पाय पडताना पाहिला आणि ते त्याच्यावर जोरात ओरडले..

त्या भयाण शांत वातावरणात अचानक आझादांचे रागावून ओरडणे इतरांच्या लक्षात न आल्यामुळे सगळे त्यांच्या रागावलेल्या चेहर्‍याकडे बघु लागले.. जो सहकारी बाहेर चालला होता त्याला नेमके काय घडले, हे समजत नव्हते..

आझादांनी आपला राग शांत केला. त्यांच्या डोळ्यात अश्रु जमा झाले होते.. त्याही परिस्थितीत स्वतःला सावरून खोलीतुन बाहेर चाललेल्या साथीदाराला आपल्या शेजारी बसवले आणि समजावणीच्या सुरात त्याला सांगु लागले,

“ही दोघं आता राष्ट्राची संपत्ती आहे.. देश यांची आता पुजा करतोय.. यांचा दर्जा आता आपल्यापेक्षा खुप मोठा आहे.. यांच्या चित्रावर पाय पडणे म्हणजे देशाची आत्मा चिरडुन टाकण्यासारखे होईल….”

पुढे बोलता बोलता आझादांचा कंठ दाठुन आला आणि साथीदारांसह तेही अश्रूंच्या महापुरात डुबले गेले.

वीस-बावीस वर्षांच्या या क्रांतिकारकांची समज वाखाणण्याजोगी होती. आपल्या मित्रांविषयी वाढलेला त्यांचा सन्मान, आदर आणि त्यांनी केलेल्या त्यागाची असलेली जाणीव या क्रांतीकारकांना ‘जबाबदार नागरिक’ बनण्यास कारणीभूत ठरली.

या दोस्तीला, या मैत्रीच्या प्रेमाला सलाम….

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.