टू व्हीलरला बनवलंय ऑक्सिजन अँब्युलन्स, गरजवंताला फ्री मध्ये देत आहेत सेवा

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मात्र, सध्या साथीच्या या दूसऱ्या लाटेत भीषण परिस्थिती निर्माण झालीये. रूग्णांच्या उपचारासाठी देशाला ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरं जावं लागतय. ऑक्सिजन अभावी मृतांचा आकडा वाढते चाललाय. मात्र, अशा परिस्थितीतही अनेक मदतीचे हात समोर येत आहेत. जे रूग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवत आहेत.

त्यातील एक नाव म्हणजे अजीज खान. जे आपल्या ऑक्सिजन बाईकच्या माध्यमातून गरजूंची मदत करतायेत.

46 वर्षीय अजीज खान मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते मेकॅनिकल इंजीनियर असून त्यांंनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षक म्हणूनही काम केले आहे. सध्या त्यांचा स्वत: चा कारखाना आहे, जेथे ते शेतकर्‍यांसाठी शेती अवजारे बनवितात.

अझीझ खान यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,

“मला माझे ज्ञान आणि माहिती लोकांना मदत करण्यासाठी वापरायची होती. म्हणूनच शिक्षकाची नोकरी सोडली आणि एक कारखाना सुरू केला, जेणेकरून शेतकर्‍यांसाठी उपकरणं बनवता येतील. मी वेगवेगळ्या कृषी उपकरणांवर काम करतो, परंतु कोरोना साथीच्या वेळी, मी कोविड – 19 सह झुंजणार्‍या सामान्य लोक आणि रूग्णांसाठी माझे कौशल्य वापरण्याचा विचार केला.”

जुन्या गोष्टी वापरुन बनविली बाईक ॲम्बुलन्स :

अझीझ खान यांनी सगळ्यात आधी अ‍ॅम्ब्युलन्सविषयी काही माहिती गोळा केली. जसे की एक ॲम्बुलन्समध्ये बेसिक गोष्टी काय आहेत आणि त्यानंतर त्यांनी शोध घेतला की एका बाईकने चालणारी ॲम्बुलन्स कशी बनवता येईल.

त्यांनी सगळ्यात आधी ॲम्ब्युलन्सचे एक डिझाईन तयार केले. यानंतर, मोटार वाहन कायदा समजून घेतला. ॲम्बुलन्स बनविण्याबरोबर ते लोकांच्या मदतीसाठी पोहोचविणे देखील महत्त्वाचे होते. त्यामुळं सर्व कायदे लक्षात ठेवूनच त्यांनी काम केले.

त्यांनी ही बाईक ॲम्ब्युलन्स तयार करण्यासाठी जुन्या सायकलीची चाकं, रूग्णालयात वापरलेले जुने बेड, स्प्रिंगअप्स आणि शॉकअप्स यासारख्या इतर जून्या भागांचा देखील उपयोग केला. त्यांनी या जून्या गोष्टींचा वापर करून असे स्ट्रचर तयार केले, जे कोणत्याही बाईकला लावून वापरता येईल. त्यांच्या या ॲम्ब्युलन्समध्ये एका वेळी एक रुग्ण सहज झोपून रुग्णालयात पोहोचू शकतो. यात काही मूलभूत औषधे, आयव्ही ड्रिप आणि ऑक्सिजन सिलिंडर देखील आहेत.

बाईक ॲम्ब्युलन्स मधले ऑक्सिजन सिलिंडर तीन तास काम करते.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाईक ॲम्ब्युलन्स तयार करण्यासाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च झाला. दरम्यान, जर या रुग्णवाहिका मोठ्या संख्येने बांधल्या गेल्या तर ही किंमत कमी करता येऊ शकते. अजीझने आतापर्यंत पाच रुग्णवाहिका तयार केल्या आहेत, ज्या कोणत्याही दुचाकीच्या मागील बाजूस वापरल्या जाऊ शकतात आणि जो कोणीही विनामूल्य वापरु शकतात.

अजीझने त्यांच्या कारखान्याबाहेर एक मोठा बोर्ड लावलाय आणि सर्व ॲम्ब्युलन्स तिथचं पार्क केल्यात. ज्याला याची आवश्यकता असेल, तो दुचाकी घेऊन ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊ शकतो. त्यांना फक्त डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दाखवावी लागेल. यासाठी कोणतेही भाडे नाही.

अजीज म्हणतात,

जर एखाद्याने वापरल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर पुन्हा भरला तर ते चांगलेच आहे. परंतु एखाद्याला नाही शक्य झाले नाही, तरीही काही हरकत नाही. कारण असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे ॲम्ब्युलन्सच्या भाडे किंवा ऑक्सिजन भरण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. 

जिल्हा प्रशासनाकडून कौतुक :

कोविड – 19 रुग्णांव्यतिरिक्त ही ॲम्ब्युलन्स इतर लोकांच्याही वापरात येऊ शकते. 32 वर्षीय सतीश पाल या ॲम्बुलन्स वापरकर्त्याने सांगितले,

“काही दिवसांपूर्वी त्याची आई घरात घसरून पडली होती आणि तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. खूप प्रयत्न केले पण अॅम्ब्युलन्स सापडली नाही. त्यांच्याकडे दुचाकी आहे आणि त्यांची आई अशा स्थितीत नव्हती की तिला दुचाकीवरून नेले जाईल. म्हणून त्याने अजीज यांच्याशी संपर्क साधला. “

सतीशने बाइक ॲम्ब्युलन्सचा दोनदा वापर केला. तो म्हणाला की,

“मी त्यांच्याकडून पहिल्यांदा जेव्हा ॲम्ब्युलन्स घेतली तेव्हा ती कशी वापरायची याबद्दल मला थोडासा संकोच वाटला, परंतु ते फार फायद्याचं ठरलं. अजीज जी यांनी खूप चांगले काम केले आहे कारण कठीण काळात त्यांची बाईक ॲम्ब्युलन्स खूप प्रभावी आहे. ”

अझीझच्या या शोधाचे सामान्य नागरिकांकडूनच नव्हे तर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून देखील कौतुक होत आहे.

त्यांनी जेव्हा पहिली ॲम्ब्युलन्स बनवली, तेव्हा जवळच्या खेड्यातील कुणीतरी रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी ती घेऊन गेले. त्यावेळी, वाटेत कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनविला आणि हळूहळू लोक सोशल मीडियावर याबद्दल लिहू लागले. बर्‍याच लोकांनी त्यांना बोलावून मदत मागितली. सामान्य नागरिकांव्यतिरिक्त जिल्हाधिकारी आय.ए.एस. आलोक कुमार यांनीही फोन करुन याबाबत चौकशी केली. ”

त्यांनी केवळ त्यांच्या कार्याचे कौतुकच केले नाही तर अजीझ यांना जिल्ह्यासाठी बाइक ॲम्बुलन्स बनविण्याचे आदेशही दिले. त्यांच्यामते, अशा सुविधा विशेषतः ग्रामीण भागासाठी आवश्यक आहेत. धार जिल्ह्यात बरीच गावे आहेत, ज्यासाठी ही बाइक रुग्णवाहिका अधिक प्रभावी सिद्ध होऊ शकते. चार चाकी रुग्णवाहिकेतून तुम्ही दोन-तीन रुग्णांना एकत्र आणू शकता, परंतु बाइक ॲम्बुलन्सने प्रवास करणे खूप सोपे आहे.

प्रशासनाने दिलेल्या आदेशावर अजीझ यांनी काम सुरू केले आहे. लॉकडाऊनमुळे काही वस्तू मिळण्यात त्रास होतोय, परंतु लवकरच ते सर्व ॲम्बुलन्स जिल्हा प्रशासनाकडे देतील. तसेच, ती थोडी अधिक प्रगत बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अजीज यांच्या म्हणण्यानुसार,

“जिल्हा प्रशासन अधिकाधिक लोकांना मदत करण्यात व्यस्त आहे. जेव्हा अधिकारी रात्रंदिवस काम करत असतात, तेव्हा लोकांचे देखील काहीतरी कर्तव्य असते. मी जे केले ते एक मोठे काम नाही, कारण कोणीही ते करू शकते. म्हणून मला फक्त लोकांना सांगण्याची इच्छा आहे की शक्य तितक्या कठीण परिस्थितीत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. ”

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.