कधी काळी रेल्वे स्टेशनच्या बाहेर संत्री विकत होता, आज नागपूरमध्ये ४०० टन ऑक्सिजन पुरवला आहे

राज्यात सध्याच्या ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी जिथून शक्य असेल तिथून मदत मागितली जात आहे. अगदी ओडिसातुन देखील ऑक्सिजन एक्सप्रेसमधून ऑक्सिजन आणून तो रुग्णांपर्यंत पोहचवला जात आहे. समाजातून देखील आर्थिक आणि विविध स्वरूपात मदतीचा ओघ पुढे येऊ लागला आहे.

त्यापैकीच एक आहेत नागपूरचे प्यारे खान.

प्यारे खान म्हणजे अगदी रिक्षा चालवून उभे राहिलेले नागपुरातील आघाडीचे ट्रान्सपोर्ट उद्योजक. तब्बल ३०० ट्रेलर्सचे मालक आणि ४०० कोटींचे व्यावसायिक म्हणून त्यांना आणि त्यांच्या कंपनीला ओळखलं जात. पण हेच प्यारे खान आज कोणताही हिशोब न करता कोरोनाग्रस्तांच्या आणि नागपूरकरांच्या मदतीला धावून आले आहेत.

अवघ्या आठवडाभरात प्यारे खान यांच्या कंपनीनं कोरोना रुग्णांना तब्बल ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी प्रशासनाकडून एक रुपया हि न घेता स्वत:च्या खिशातून ८५ लाख रुपये खर्च केले आहेत.

मदतीसाठी त्यांनी बेंगलोरमधून २ क्रायोजेनिक गॅस टँकर भाड्यानं घेऊन हे टँकर रायपूर, रुरकेला व भिलई या ठिकाणी पाठवून, तिथून ऑक्सिजन भरून घेऊन तो नागपूर व आसपासच्या परिसरात पुरवण्याचं काम ते करत आहेत. या एका ट्रिपसाठी १४ लाख रुपये मोजत आहेत.  

सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या ३६० सिलिंडरसह एकूण ८६० सिलिंडर त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांना दान केले आहेत.

प्रशासनानं त्यांना पैशाविषयी विचारलं असता  म्हणाले,

रमझानच्या पवित्र महिन्यातील ही ‘जकात’ आहे. 

जकात म्हणजे इस्लाम धर्मियांच्या पाच स्तंभांपैकी एक. रमजानच्या पवित्र महिन्यात याच महत्व आणखी वाढत. हे एक प्रकारचं दान-धर्म करण्यासारखं असतं. कुराणमध्ये सांगितल्या नुसार ज्या मुस्लिम नागरिकांकडे आपला खर्च भागून शिल्लक राहणार पैसा असेल तो गरजवंतांना दान म्हणून द्यावा. प्यारे खान सध्या हीच जकात अदा करत आहेत.

लिक्विड ऑक्सिजन दान देण्यासोबतच प्यारे खान यांनी एम्स, इंदिरा गांधी गव्हर्मेंट हॉस्पिटल याठिकाणी ११६ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्याचं नियोजन केलं आहे. ज्याची किंमत जवळपास ५० लाख रुपये आहे.

इतकच नाही तर गरज भासल्यास ब्रुसेल्समधून काही टँकर एअरलिफ्ट करण्याची तयारी असल्याचं देखील प्यारे खान यांनी म्हटलं आहे.

अशी झाली होती प्यारे खान यांच्या आयुष्याची सुरुवात…. 

प्यारे खान नव्वदच्या दशकात नागपूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर संत्री विकत होते. त्यानंतर पुढे १९९४ ते २००१ अशी सात वर्षे त्यांनी नागपुरात रिक्षा चालवली. वडिलांचे छोटे किराणा दुकान. आई गृहिणी. मात्र रिक्षा चालवत असताना प्यारे यांच्या मनात काही तरी वेगळच सुरू होतं. त्यांना मालवाहतूक व्यवसायात रुची होती.

पण त्यासाठी लागणार पैसा मात्र त्यांच्याकडे नव्हता. कर्जासाठी अनेक बँकांचे उंबरठे झिजवले. पण कमाई तेवढी नसल्यामुळे कोणी दारात पण उभं करत नव्हतं. अखेर आयएनजी वैश्य बँकेचे मॅनेजर भूषण बस यांनी प्यारे खान यांना २००४ साली ट्रक घ्यायला ११ लाखांचं कर्ज मंजूर केलं.

यातून खान यांनी ‘आश्मी रोड कॅरिअर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने कंपनी उभारून एक चालक नेमला आणि शहरातील पारडी नाक्यापासून व्यवसायाला सुरुवात झाली. यानंतर त्यांनी मागं वळून बघितलंच नाही. २००७ पर्यंत त्यांनी आणखी जवळपास ३ ट्रक होते. त्यावर्षी त्यांना कापसाच्या बियांच्या एक्स्पोर्टच मोठं काम मिळाल्यामुळे आणखी ट्रक घेतले. 

मोठं-मोठ्या कंपन्यांची काम मिळत गेली तशी दारातल्या ट्रकांची संख्या पण वाढत गेली. पाहता पाहता खान ३०० मोठ्या ट्रेलर्सचे मालक झाले. त्यांच्या कंपनीचे आजचे बाजारमूल्य ४०० कोटी इतके आहे. दोन पेट्रोल पंपही आहेत. सध्या जेएसडब्ल्यू स्टीलचे दोन वर्षांसाठी पाचशे कोटींचे काम त्यांच्या हातात आहे. तसचं टाटा स्टीलचेही २०० कोटींचे काम, केएसई, रिलायन्स, एल अ‍ॅण्ड टी, सेल अश्या मोठ्या कंपन्यांची काम सुरू आहेत.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.