महाराष्ट्रात नाही पण बिहारमध्ये तरी अमित शहा शब्द पाळणार का ?

१८ फेब्रुवारी २०१९. महाराष्ट्रात तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे असे सगळे नेते युतीच्या घोषणेसाठी मंचावर उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी असे जाहीर केले,

“पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे. त्यादृष्टीनं पद आणि जबाबदाऱ्या समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील.”

यानुसार निकाल लागल्यानंतर शिवसनेने २.५ वर्षासाठी मुख्यमंत्री पद मागायला सुरुवात केली. मात्र मुख्यमंत्रीपदासाठीचा असा कोणताच शब्द दिला नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर भाजपने दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत शिवसेनेने युती तोडली आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. 

कट टू बिहार विधानसभा निवडणूक.

६ ऑक्टोंबर २०२०. बिहारची जागा वाटप घोषणेची पत्रकार परिषद. मंचावर मुख्यमंत्री नितीश कुमार, आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी उपस्थित होते. यात त्यांनी सांगितले की आम्ही नितीश यांच्या नेतृत्वातच निवणुका लढवणार आहोत आणि पुढील मुख्यमंत्री देखील तेच असतील.

त्यानंतर १७ ऑक्टोंबर २०२०. आजारपणात सावरत अमित शहा यांनी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. यात त्यांनी स्पष्ट केले कि बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच असतील.

तर ३१ ऑक्टोंबर २०२० ला माध्यमांसोबत बोलताना भाजपाध्यक्ष जे. नद्दा यांनी देखील यावर शिक्कामोर्तब केले. 

यानुसार आता आजच्या अंदाजित निकालामध्ये नितीश यांच्या जनता दलाला ४९ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला ७४. म्हणजे जनतादलापेक्षा तब्बल २५ जागा जास्त.

त्यातच बिहारमध्ये नेमके कोण कोणाशी लढत होते हे कळत नव्हते. वरुन युती एका पक्षाशी आणि जास्त जागा पटकावण्यासाठी आतून दुसऱ्याच पक्षाशी संधान अशी काहीशी स्थिती.

म्हणजे भाजप आणि नितीशकुमार एकत्र लढत होते. पण आत्तापर्यंत त्यांच्यासोबत असलेले चिराग पासवान यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्या. चिराग यांचे बहुतांश उमेदवार हे जेडीयूविरोधातच होते. या मागे देखील भाजपचे चाणक्य अमित शहा आहेत असं म्हटल गेलं.

मागच्या वेळच्या प्रमाणे यंदाही एक्झिट पोल गंडले आणि एनडीए १२४ च्या जादुई आकड्याच्या पुढे जाणार हे सिद्ध आहे. 

ही सगळी रस्सीखेच जर मुख्यमंत्रीपदासाठी गृहीत धरली तर आता बिहारमध्ये नितीशकुमार यांना दिलेला शब्द भाजप पाळणार का? हे पहावे लागेल. कारण महाराष्ट्रात बसलेला फटका अमित शहा विसरणार नाहीत. यावेळी त्यांनी सावध पाउल उचललेले दिसते पण भाजपचे आजवरचे आक्रमक राजकारण पाहता काहीही होणे शक्य आहे यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.