घाबरलेल्या वेंकैय्या नायडूंना आश्वासन दिलेलं, “जिथं इंदिराजी सभा घेतील तिथं मी सुद्धा घेईन “

सध्याचे उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू म्हणजे भारतीय जनता पक्षातील जेष्ठ व्यक्तिमत्व. पक्षाच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते तळागाळापासून वर आले त्यात त्यांचा समावेश होतो. दक्षिण भारतात भाजपला रुजवण्यात नायडू यांचा सिंहाचा वाटा आहे. वेंकैय्या नायडू यांचा भाजप मध्ये आदर्श होते अटलबिहारी वाजपेयी.

अटलजींशी त्यांची पहिली भेट १९६६ साली झाली. ते जनसंघाचे दिवस होते. वाजपेयी तेव्हा आंध्र प्रदेशातील नेल्लोरला जनसंघाच्या प्रचारसभेसाठी आले होते. वेंकैय्या नायडू त्याकाळात ‘अभाविप’चे तरुण कार्यकर्ते होते. जनसंघाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना अटलजींच्या सभेची घोषणा टांग्यातून फिरून करण्याची सूचना केली. वेंकैय्या नायडू यांनी सभेआधी दोन दिवसांत मेहनतीने काम केले.

नायडू आपल्या आठवणींमध्ये सांगतात,

 त्या दिवशीच्या सभेतले ‘तरुणहृदयसम्राट अटलविहारी वाजपेयी गारू’ हे शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत. नेल्लोरच्या त्या सभेत त्यांचे भाषण ऐकले त्या क्षणापासून मी अटलजींचाच होऊन गेलो.

तेव्हापासून अटलजी दक्षिण भारतात कोठेही येणार असे समजले, की वेंकैय्या नायडू व त्यांचे मित्र काही महिने पैसे वाचवून त्या सभेला हजेरी लावायचे. 

वाजपेयींचा आदर्श घेऊन ते जनसंघात सक्रिय झाले. आणीबाणीमधील हुकूमशाही विरुद्ध त्यांनी आंध्रप्रदेशात मोठी आंदोलने केली. तेव्हा मिळालेल्या लोकप्रियतेमुळे १९७८ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. मोठ्या बहुमताने निवडून देखील आले. काँग्रेस विरोधी लाटेचा देखील फायदा झाला.

पण पुढच्या पाच वर्षात परिस्थिती बदलली. इंदिरा गांधींनी जोरदार पुनरागमन केलं. जनता पक्षाचा  प्रयोग फसला. जनसंघाचे नेते बाहेर पडले आणि भाजपची स्थापना झाली. पण म्हणावं तस यश मिळत नव्हतं.

१९८३ साली आंध्रप्रदेशच्या विधानसभा निवडणुका आल्या. वेंकैय्या नायडू उदयगिरीतून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत होते. भाजपची नुकतीच स्थापना झालेली होती व दक्षिणेत तर पक्षाचा फारसा प्रभावही नव्हता. आंध्रमध्ये त्यांची अवस्था अगदीच बिकट झाली होती. त्यातल्या त्यात नायडू यांचा मतदारसंघ जिंकता येईल अशी अवस्था होती.

 पण त्यांच्या विरोधातल्या काँग्रेसच्या उमेदवाराने उदयगिरीमध्ये इंदिरा गांधींची सभा घेण्यात यश मिळविले. इंदिराजी येणार म्हटल्यावर भाजपची सारी टीम काहीशी चिंताक्रांत झाली. स्वतः वेंकैया नायडू यांना टेन्शन आलं. इंदिरा गांधींची सभा म्हणजे पराभव निश्चित असंच तेव्हाच वातावरण होतं. 

नायडू सांगतात, एकीकडे एन. टी. रामाराव यांची क्रेझ व दुसरीकडे काँग्रेसच्या या संभाव्य झंझावाताला आमच्या पक्षातील एक आणि एकमात्र खणखणीत उत्तर म्हणजे अटलजीच असू शकतात यावर आमचे एकमत झालं.

पण आपल्या सारख्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी अटलजी एवढ्या दूरवरून येतील का, ही धाकधूक नायडूंना होती. मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी नायडू यांना न सांगताच अटलजीशी संपर्क साधला व आंध्रातील एकमेव आशा असलेल्या या जागेवरील परिस्थिती सांगितली. 

अटलजींनी तेव्हा फक्त, देखेंगे, कुछ तो भी करेंगे’ एवढेच सांगितले.

ते येणार नाहीत असंच वाटत होतं. पण अचानक मतदानास जेमतेम आठ दिवस बाकी असताना चेन्नईतील सभा संपवून २६८ किलोमीटरचा प्रवास करून एका सकाळी वाजपेयी उदयगिरीमध्ये दाखलही झाले. 

अटलजींचा आत्मविश्वास इतका होता की ते म्हणाले, 

“वेंकैय्या, जहाँ इंदिराजी की रॅली होगी वही हम भी रॅली करेंगे.”

त्यांचे भाषण नेहमीसारखेच प्रभावी झाले. त्यासभेनंतर त्यांच्या गावचे सरपंच मजीदभाई हे अटलजींना आपल्या घरी जेवणासाठी येण्याचा आग्रह करू लागले. वेळेमुळे ते शक्य नव्हते; पण अटलजींनी त्यांना, क्या पका है वो यही लेके आओ, असे सांगितले. त्यांनी ‘डबल का मीठा’ म्हणजे एका प्रकारचा गोड ब्रेड आणला. 

तेव्हा अटलजी कार्यकर्त्यांना म्हणाले, 

“ये मै जरूर खाऊंगा, लेकिन आप वादा करो, की हमारा उम्मीदवार भी डबल मेजॉरिटी से जीतेगा.”

निवडणूक जिंकल्यावर जेव्हा नायडूंनी अटलजींना फोन केला तेव्हा त्यांनी विचारले,

“आपका अभिनंदन, लेकिन वो डबल मेजारिटी का क्या हुआ ?”

असे होते अटलजी. एकदा कार्यकर्त्याला आपलं मानलं तर त्याच्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असायची.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.