पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या मातंगिनी हजारा यांना ‘बुढी गांधी’ म्हणून ओळखलं जातं…

आज ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात स्वतंत्रलढ्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येकाला आदरांजली वाहिली. पंतप्रधान म्हणाले की, देश आज त्या सर्व शूर वीरांची आठवण करत आहे. या दरम्यान, त्यांनी महात्मा गांधींपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या महिलांचीही आठवण काढली. यात विविध राज्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांबरोबरच पश्चिम बंगालच्या एका विरांगनेचेही नाव होते. ही  महिला म्हणजे बंगालच्या पूर्व मेदिनीपूरच्या तामलुकच्या मातंगिनी हजारा.

 पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या वेळी चुकून त्यांना बंगालची स्वातंत्र्य सेनानी म्हणण्याऐवजी आसामची स्वातंत्र्य सेनानी म्हंटले.

मात्र स्वातंत्र्यलढ्यात सामील झालेल्या या नायिकेची पंतप्रधानांना आठवण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील पंतप्रधान मोदींनी एक व्हर्च्युअल दुर्गा पूजा पंडालच्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला होता, सोबतचं आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातही मोदींनी मातंगिनी हजारा यांची आठवण काढली होती.

आता मातंगिनी हजारा यांच्या कर्तृत्वाबद्दल फार कमी लोकांना माहित असेल, पण या अशिक्षित, गरीब, वृद्ध महिलेची  लोकं गांधीजींसोबत तुलना करायचे. ज्यांना आदराने ‘वृद्ध गांधी’ म्हंटल जात.

तर मातंगिनी हाजरा या एका गरीब शेतकऱ्याची मुलगी. वडिलांनी त्यांचं लग्न एका साठ वर्षांच्या माणसाशी करून दिलं. ज्याची आधीच एक बायको होती, जिचा मृत्यू झाला होता. पुढे मातंगिनी  १८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला.

१८ वर्षाची ती विधवा मुलं- बाळ तर नव्हतेच, वडिलांच्या घरीही तिला थारा मिळाला नाही आणि सावत्र मुलांकडून नीट वागण्याची कोणती अपेक्षाच नव्हती. म्हणून त्यांनी तामलुक मध्ये एक झोपडीत राहायला सुरुवात केली, छोटं- मोठं काम करून आपलं पोट भरायच्या.

१९३२ मध्ये एक दिवस गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीची मिरवणूक त्यांच्या झोपडीच्या बाहेरून निघाल्या. मग बंगाली प्रथेनुसार मातंगिनी यांनी देखील शंख वाजवून त्या मिरवणुकीचे स्वागत केले. त्या बऱ्याच काळापासून गांधींचे नाव ऐकायच्या, मिरवणुकीत एकही महिला नव्हती.

कुटुंबाच्या अभावामुळे तिच्या मनात गुलामगिरीची भावना आणखी खोल होती. ती स्वतः त्या मिरवणुकीत सामील झाली.

ऐकून आश्चर्य वाटेल पण  त्यावेळी त्यांचे वय ६२ वर्षे होते. त्यानंतर त्यांनी मीठ बनवून मीठविरोधी कायदाही मोडला. यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना शिक्षा मिळाली कित्येक किलोमीटर कडक उन्हात चालण्याची आणि तेही अनवाणी पायाने.

गांधीजी त्या काळात देशभरात वेगवेगळ्या टॅक्सच्या विरोधात चळवळ चालवायचे. तिथे चौकीदार कराला विरोध करण्याची हाक दिली होती. मातंगिनी हाजरा यांनी आपले एकमेव उद्दिष्ट ठेवले होते, गांधीजींच्या सर्व आवाहनांचे पालन करायच. त्यांनीही ‘चौकीदारी कर रोको’ प्रदर्शनात भाग घेतला. काळा झेंडा हातात घेऊन सगळ्यात पुढे चालायला सुरुवात केली. त्यानं अटक करण्यात आले आणि ६ महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगात ती आणखी गांधीवाद्यांच्या संपर्कात आली.

आपले स्वतःचे कुटुंब नसल्याने त्या प्रत्येक स्त्रीला दुःखात मदत करायच्या. त्यांनी महिलांना देखील आपल्या चळवळीशी जोडण्याचे काम सुरू केले, आता हळूहळू इतर महिलाही त्यांच्या चळवळीत सहभागी होऊ लागल्या.

‘बूढ़ी गांधी’ म्हणून लोकप्रिय

मातंगिनी आता पूर्णपणे गांधीवादी झाल्या होत्या. एक चरखा हातात घेत, त्यांनी खादी घालायला सुरुवात केली आणि काँग्रेसच्या कार्यक्रमातही भाग घ्यायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात लाठीचार्ज झाला त्यावेळी मातंगिनीही त्या प्रकाराला बळी पडल्या. यामुळे परिसरातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढला. पण प्रशासनाच्या डोळ्यांत त्या खटकायला लागल्या.

या दरम्यान चेचक, कॉलरा सारखे आजार पसरले. यावेळी बिना लेकराची मातंगिनी प्रत्येकासाठी आई बनल्या आणि रात्रंदिवस त्यांच्या सेवेत लागल्या. परिसरातील लोक आता त्यांना आदराने ‘बूढ़ी गांधी’ म्हणून हाक मारू लागले, त्यांच्यासाठी त्या ‘लेडी गांधी’ होत्या.

१९४२ मध्ये गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा करत ‘करो किंवा मरो’ असा नारा दिला. मातंगिनी हाजरा यांनी स्वीकारले होते की, आता स्वातंत्र्याची वेळ आली आहे. यांनी पश्चिम बंगालच्या तामलुकमधल्या चळवळीची कमान सांभाळली.

वयाची ७२ वी ओलांडली, पण उत्साह इतका होता की रात्रीच्या वेळीही त्या गावोगावी फिरून लोकांना या चळवळीत सामील होण्याचे आवाहन करायच्या. मातंगिनी हजाराच्या आवाहनावर हजारो महिलांनी घरातून बाहेर पडत मोर्चात सामील झाल्या.

२९ सप्टेंबर १९४२ चा तो दिवस होता, ६००० लोकांनी चळवळ हाती घेतली. यात बहुतेक महिला होत्या. चळवळ तामलुक पोलीस ठाण्याच्या दिशेने जाऊ लागली, प्रशासनाने संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू केला, पण अश्या परिस्थितीतही चळवळ सुरूच होती.

मिरवणुक पोलिस स्टेशनपासून आधीच थांबवण्यात आली. पोलिसांनी इशारा दिला, लोक मागे हटू लागले. पण मातंगिनी यांना लोकांचा उत्साह कमी होताना पाहायचा नव्हता. त्या मधूनच बाहेर पडत सगळ्यांसमोर आल्या. हातात तिरंगा घेऊन म्हणाल्या, ‘मी तिरंगा फडकवणारचं, आज मला कोणीही अडवू शकत नाही. ‘वंदे मातरम्…’ असं म्हणत त्या पुढे सरसावल्या.

पोलिसांच्या इशाऱ्यावरही त्या थांबल्या नाही, तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर गोळी झाडण्यात आली. त्या जखमी झाल्या, पण तिरंगा काय पडू दिला नाही. पुन्हा ‘वंदे मातरम, भारत माता कि जय’ अश्या घोषणा देऊ लागल्या आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने जात राहिल्या.

त्यांना सलग दोन गोळ्या लागल्या पण तरीही त्यांनी हार मानली नाही. ७२ वर्षाच्या मातंगिनी हाजरा यांचा हा जोश पाहून एका पोलीस अधिकाऱ्याने तिसरी गोळी थेट कपाळावर झाडली आणि ‘बूढ़ी गांधी खाली कोसळल्या. पण झेंडा जमिनीवर पडू दिला नाही. तो छातीवर ठेवला आणि पुन्हा मोठ्याने म्हणालया, ‘वंदे मातरम, भारत माता की जय.’

त्यांच्या या देशभक्तीपुढे गांधीजी देखील नतमस्तक झाले होते.

दक्षिण कोलकातामधील एका रस्त्याला मातंगिनीच्या नावावर हाजरा रोड असे नाव देण्यात आले. त्यांच्या नावावर अनेक शाळा उघडल्या गेल्या, तिकिटे काढण्यात आली. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रत्येक मूर्तीत हातात एक ध्वज असतोच असतो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.