सौदी अरेबिया आणि युएईमधील तेलाची भांडणं सुटल्याचा फायदा थेट भारताला होणार आहे…

अखेर… अखेर भारतामधील मागच्या अनेक दिवसांपासून वाढत असलेल्या तेलाच्या किंमती कमी होण्यासाठी आशेचा एक किरण तयार झाला आहे. यामुळे अगदी आता पुढच्या महिन्यापासूनच म्हणजे ऑगस्ट पासूनचं तेलाच्या किंमती कमी होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

अशी शक्यता निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे सौदी अरेबिया आणि युएईमधील सुटलेली भांडण, आणि त्यातून ओपेकचं तेलाचं उत्पादन वाढवण्यावर झालेलं एकमत.

त्याच झालयं असं कि रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार,

रविवारी ओपेक प्लस देशांच्या मंत्र्यांनी ऑगस्ट महिन्यापासून तेलाचं उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तेलाच्या वाढत्या मागणीचा आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसून तेलाच्या किंमती पुन्हा नियंत्रित येऊ शकतील असा अंदाज अनेक तज्ञानीं व्यक्त केला आहे.

सध्या जरी हा निर्णय आशादायक आणि सकारात्मक वाटत असला तरी हा निर्णय सहज नक्कीच झालेला नाही. यामागे मागच्या अनेक दिवसांपासून दोन मोठ्या देशांची भांडणं सुरु होती, मात्र रविवारी हि भांडण मिटली, दोघांच्यात सहमती झाली आणि त्यानंतरच हा निर्णय होऊ शकला आहे.

नेमकी काय होती भांडण?

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे जगभरात वाहन आणि विमान तेलाच्या मागणीमध्ये कमालीची घट झाली होती. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमती २० डॉलर प्रति बॅरेलपर्यंत खाली आल्या होत्या. या मागच्या १८ वर्षांमधील सगळ्यात कमी किंमत होत्या.

यानंतर या ढासळणाऱ्या किंमती पुन्हा नियंत्रित करण्यासाठी ओपेक आणि त्याच्या सहयोगी देशांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार एका ठरलेल्या मात्रेमध्ये पुढच्या २ वर्षांपर्यंत उत्पादन कमी करण्यावर एकमत झालं होतं.

यानुसार तेलाचं उत्पादन कमी करण्यात आलं.

आता हे उत्पादन किती कमी करण्यात आलं हे बघण्यासाठी आपल्याला काही आकडेवारी बघायला लागते. 

  • जाने-मे २०१७ मधील उत्पादन – २८ हजार ६६४ बॅरल टन
  • जून-डिसेंबर २०१८ मधील उत्पादन –  २८ हजार ८४२ बॅरल टन
  • जाने-मे २०१९ मधील उत्पादन – २५ हजार ४२९ बॅरल टन
  • जून-डिसेंबर २०१९ मधील उत्पादन – २५ हजार ५१८ बॅरल टन
  • जानेवारी-मार्च २०२० मध्ये उत्पादन २५ हजार  बॅरल टन
  • मे-जुलै २०२० मधील उत्पादन – २० हजार ५९९ बॅरल टन 

मात्र कोरोना संकटानंतर आता जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. जगभरातील व्यवहार पुन्हा सुरु झाले आहेत. लसीकरण सुरु झाल्यामुळे हे व्यवहार गती पकडत आहेत. त्यामुळे मागच्या ३ महिन्यांमध्ये तेलाची मागणी पुन्हा वाढली. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनांच्या नियमांमुळे पुरवठा कमी पडू लागला.

एका पातळीपर्यंत या तुटवड्यामुळे तेलाच्या किंमती वाढू लागाल्या. त्या इतक्या वाढल्या कि सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च स्तरावर जाऊन पोहोचली आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाचा क्लोजिंग दर ७३.१४ डॉलर प्रति बॅरल होता. तर जुलै महिन्यात हा दर ७८ डॉलरपर्यंत पोहोचला होता.

त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून तेलाचं उत्पादन वाढवावं अशी मागणी होत होती.

मात्र यात इतर ओपेक सदस्यीय देश एकीकडे आणि सौदी अरेबिया विरुद्ध युएई अर्थात संयुक्त अरब अमिरात एकीकडे असा तणाव निर्माण झाला होता. त्याला कारण होतं संयुक्त अरब अमिरात आपली उत्पादन क्षमता ३८ लाख बॅरेल प्रति दिन पर्यंत वाढवण्याची मागणी करत होता. मात्र सौदी अरेबिया आणि युएईमध्ये याबाबत एकमत होतं नव्हतं.

एका महिन्यात २ वेळा या सगळ्या देशांमधील बैठक या एकाच मुद्द्यावरून यशस्वी होऊ शकली नव्हती. 

मात्र रविवारी झालेली चर्चा अखेरीस यशस्वी झाली. त्यानंतर हे उत्पादन वाढवण्यासाठी युएई आणि सौदी अरेबिया यांच्यात सहमती झाली. यानंतर संयुक्त अरब अमिरातचे ऊर्जामंत्री सुहैल अल मजरूई म्हणाले,

यूएई या समूहासाठी कटिबद्ध आहे, आणि कायमच या संघटनेसोबत काम करेल. आम्ही बाजारातील संतुलन राखण्यास आणि सगळ्यांची मदत करण्यासाठी योग्य प्रयत्न करू.

त्यामुळे आता नव्या सूत्रानुसार यूएई मे २०२२ पासून प्रतिदिन ३५ लाख बॅरेल उत्पादन करू शकणार आहे. म्हणजेच इथे एक प्रकारे यूएई एक पाऊल मागे आल्याचं बघायला मिळात आहे. मात्र त्याच वेळी सौदी अरेबियाने १.१० कोटी वरून आपली रोजची उत्पादन क्षमता १.१५ कोटी बॅरेल इतकी वाढवली आहे. रशियाची देखील उत्पादन क्षमता एवढीच असणार आहे.

यामुळे दर महिन्याला ४ लाख बॅरल्सची वाढ होणार आहे…

ओपेक प्लस देश एकत्रितपणे दर महिन्याला रोजच्या रोज ४ लाख बॅरल उत्पादन वाढवतील. यासाठी ऑगस्ट महिन्यापासून सुरूवात होईल. आजच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दिवसाला ८ लाख बॅरल एवढे उत्पादन वाढेल.

याप्रमाणे, ऑक्टोबर महिन्यात रोज १२ लाख बॅरल, नोव्हेंबर महिन्यात रोज १६ लाख बॅरल तर डिसेंबर महिन्यात रोज २० लाख बॅरलपर्यंत उत्पादन वाढेल. उत्पादन वाढवण्याची संधी सर्वच देशांना देण्यात आली आहे असं देखील सांगण्यात आलं आहे.

नवीन पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील या निर्णयासाठी प्रयत्न केले होते…

तेलाच्या आयातीच्या बाबतीत जगातील तिसरा सगळ्यात मोठा देश असलेल्या भारताने देखील तेलाचं उत्पादन वाढवावं म्हणून मागणी केली होती. यासाठी नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ओपेक देशांना तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामांशी अवगत करून दिलं.

सोबतचं हरदीप सिंह पुरी यांनी ओपेकच्या प्रमुख देशांसोबत फोन करून याबाबत चर्चा केली होती. पुरी यांनी कतार आणि संयुक्त अरब अमीरातच्या आपल्या समकक्षांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या यादीतील प्रमुख देश असलेल्या सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्र्यांशी फोनवर बोलून देखील त्यांनी याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे आता आगामी काही दिवसात तेलाच्या किमती कमी होण्याची चिन्ह आहेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.