फोटो आणि सेल्फी न काढता तो चार जणांचे कर्ज फेडून बॅंकेतून निघून गेला..

काही दिवसांपूर्वी आम्हाला एक मॅसेज आला होता. या पठ्याने आपले फोटो पाठवले होते. सोबत स्वत: स्टोरी लिहली होती. व ही गोष्ट बोलभिडूच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी अशी गळ त्याने घातली होती.

गोष्ट अशी की तो व्यक्ती आत्ता गरिब व मजूर लोकांना मदत करत होता. मदत अन्नधान्याच्या स्वरूपाची होती. वास्तविक ही गोष्ट खूप गरजेची होती पण प्रत्येक फोटोत हा व्यक्ती पांढरा लिननचा शर्ट घालून चमकत होता.

अस म्हणतात की, केलेली मदत या हाताची त्या हाताला कळून द्यायची नसते. पण या भावड्याला प्रसिद्धीचा भारी सोस होता.

प्रसिद्धीसाठी मदत करणाऱ्या, गरिबांचे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या लोकांची बातमी आणि फोटो बोलभिडूच्या माध्यमातून पब्लिश करायचे नाहीत अस आम्ही त्याक्षणी ठरवलं.

अशा माणसांना नेमकं कोणत्या भाषेत उत्तर द्यावं याचा विचार चालूच असताना काही दिवसात ही बातमी मिळाली.

बातमी अशी की एका व्यक्तीने चार कर्जबाजारी लोकांचे कर्ज फेडलं. ज्या चार जणांच त्याने कर्ज फेडले त्यांना तो कधीही भेटलेला नाही. त्यांच नाव, गाव, पत्ता यापैकी त्याला काहीही माहित नाही. त्याने एक फोटो काढला नाही की सेल्फी घेतला नाही. त्याने फक्त मदत केली आणि निघून गेला.

ही घटना घडली आहे मिझोराम राज्यातल्या एझवोल या राजधानीच्या ठिकाणी. याबाबतची बातमी इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू या वर्तमानपत्रात छापून आली आहे.

सविस्तर गोष्ट अशी की, 

एझवोलच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत एक व्यावसायिक आला. तो बॅंक मॅनेंजर असणाऱ्या Sheryl Vanchhog यांच्याकडे गेला. त्यांची भेट घेवून त्यांना म्हणाला की, 

सध्या कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. अशा काळात काही व्यक्तिंना मदत करण्याची माझी इच्छा आहे. ही मदत योग्य हातात पडावी. त्यासाठी तुम्ही माझी मदत करा. तुमच्या बॅंकेमध्ये खाते असणाऱ्या अशा काही व्यक्ती निवडा ज्या मनापासून व्यवसाय करतात. ज्यांचे बॅंक रेकॉर्ड क्लिअऱ आहेत पण या कोरोनाच्या काळातील परिस्थितीमुळे ते अडचणीत गेले आहेत. जे कर्ज फेडू शकत नाहीत.

बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी रितसर माहिती काढून अशा चार लोकांची माहिती त्या व्यावसायिकाला दिली.

या चार लोकांच्या खात्यात त्या व्यक्तींमार्फत एकूण ९ लाख ९ हजार ३६५ रुपये ट्रान्सफर करण्यात आले.

या दरम्यान आपल्याला त्यांचे नावे कळणार नाहीत याची दक्षता कर्ज फेडणाऱ्या व्यावसायिकाने घेतली. तसेच बॅंकेने आपले नाव उघड करु नये याची अट देखील घातली.

यानंतर बॅंकेमार्फत त्या चारही लोकांना फोन करून तुमचे कर्ज एका अज्ञात व्यक्तीने फेडले आहे असे सांगण्यात आले व तारण ठेवण्यात आलेली कागदपत्रे सदरच्या कर्जदारांना परत करण्यात आली.

ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या व्यावसायिकाचा सत्कार करण्यासाठी त्याला समोर आणावे अशी मागणी करण्यात आली. बॅंकेन त्या व्यावसायिकास ही गोष्ट सांगितल्यानंतर आपली ओळख कायमस्वरूपी गुप्तच ठेवावी याची आठवण बॅंकेस करुन दिली.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.