राज्यातील सरकार पाडण्यासाठी राजीव गांधी आपल्या या गृहमंत्र्यांकडे कामगिरी सोपवायचे…

१९८४ च्या लोकसभा निवडणूका. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर होणारी पहिलीच निवडणूक. ऑपरेशन ब्लु स्टारमुळे पंजाबचं वातावरण ढवळून निघालं होतं, अशा परिस्थितीमध्ये तिथं निवडणूका घेणं शक्य त्यावेळी शक्य नव्हतं. पण राजीव गांधी मात्र पक्षातील एक बडी व्यक्ती निवडून यावी यासाठी प्रचंड आग्रही होते. त्यासाठी राजीव यांनी त्या नेत्याचा मतदारसंघ देखील बदलला होता.

एवढ्यावरच न थांबता मतदारसंघ बदलून राजस्थानमधील जालौर या नवीन ठिकाणाहून निवडून आणतं राजीव गांधींनी त्यांना आपल्या सरकारमध्ये आधी कृषी-ग्रामविकास आणि पुढे वर्षभरातच गृहमंत्री बनवलं होतं. त्यांच्या या वाढलेल्या वजनानंतर त्याकाळी सरकार आणि पक्षात दोन्हीकडे ही राजीव गांधी यांच्यानंतर याच नेत्याचा शब्द अंतिम मानला जावू लागला होता.

देशातील दोन नंबरच्या स्थानावर पोहोचलेल्या नेत्याचं नाव म्हणजे,

बुटा सिंग.

राजीव गांधी यांच्या काळात बुटासिंग यांची दुसरी ओळख म्हणजे राजकीय चाणक्य. एखाद्या राज्यातील मुख्यमंत्री बदलायचा असेल किंवा सरकार घालवायचं असले तर ती जबाबदारी राजीव गांधी बुटा सिंग यांच्यावर सोपवून निर्धास्त व्हायचे, पुढची कामगिरी बुटाच पार पडायचे. असं म्हंटलं जायचं की त्यांच्या कमरेला लावलेल्या कृपणानं त्यांना समोरच्याचे पंख छाटायला वेळ लागायचा नाही.

आणि ते खरं देखील होतं. कारण १९८८ च्या जानेवारी-फेब्रुवारी या एका महिन्यामध्ये बुटासिंग यांनी तीन राज्यात आपलं काम केलं होतं.

राजस्थान. २० जानेवारी १९८८. 

१९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता. २०० पैकी ११३ जागा जिंकत राजीव गांधी यांनी हरिदेव जोशी यांना मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.

पण दुसऱ्या बाजूला यावर सगळ्यात जास्त चिडून होते गृहमंत्री बुटा सिंग. खरंतर ते पंजाबचे होते, पण जेव्हा लोकसभेवेळी बुटा जालोरमधून निवडणुक लढवू इच्छित होते, तेव्हा जोशी यांनी बाहेरच्या उमेदवारांचा तीव्र विरोध केला, पण राजीव गांधीमुळे बुटा यांना जालौरच तिकीट मिळालं आणि निवडणूक जिंकत केंद्रात मंत्री झाले.

त्यानंतर त्यांनी जोशींवर टीका करण्याची एक ही संधी सोडली नव्हती.

मात्र त्यानंतर झालेल्या सिरस्काच्या मुद्द्यांवरून राजीव गांधी बरेच नाराज झाले होते. त्यावेळी राजीव गांधी सिरस्कामध्ये एका अनौपचारिक भेटीवर येणार होते. त्यामुळे कोणताही सरकारी बडेजाव नको म्हणून जोशी यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. राजीव गांधी स्वतः ड्रायव्हिंग करत सिरस्काला पोहचले.

तिथं एका हवालदारानं त्यांना उजव्या बाजूला वळण्याचा इशारा केला. पण तिथं झालेलं उलटं. सगळी जय्यत तयारी झाली होती.

ते सगळं बघून राजीव गांधी बरेच नाराज झाले, जोशी यांनी आणलेला हार देखील त्यांनी स्वीकारला नाही. मिटिंग संपेपर्यन्त स्पष्ट झालं होतं की, जोशी यांची खुर्ची जास्त दिवसांची राहिलेली नाही. या सगळ्याचे साक्षीदार होते अशोक गेहलोत.

दिल्लीत जाऊन राजीव गांधी यांनी बुटा सिंग यांना जबाबदारी दिली. ते देखील जोशी यांची खुर्ची खेचण्याची संधी शोधत होते. 

बुटा सिंग यांनी आपलं काम केलं. जोशी यांना दिल्लीत बोलवून घेत, चर्चा झाली, आणि दुसऱ्याच दिवशी बातमी आली,

राजस्थानचे मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांचा राजीनामा. शिवचरण माथूर होणार नवीन मुख्यमंत्री.

तामिळनाडू. ३० जानेवारी १९८८

जवळपास ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९८७ मध्ये तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांचं निधन झालं, त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून राजकारण सुरु झालं. एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांनी मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगितला. आपल्याकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी ७ जानेवरी १९८८ ला शपथ देखील घेतली.

तर दुसऱ्या बाजूला जयललिता यांनी आपला गट तयार केला होता.

त्यावेळी जानकी यांचे समर्थक आरएम वीरप्पन यांनी ९५ आमदारांना हॉटेल मध्ये ठेवलं होतं. तर दुसऱ्या बाजूला जयललिता आपल्या समर्थक ३५ आमदारांसह लोकांमध्ये जाऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. या सगळ्यवर केंद्रातून राजीव गांधी लक्ष ठेऊन होते. त्यांनी बुटा सिंग यांना राज्यपालांच्या सतत संपर्कात राहण्यास सांगितलं.

अखेरीस विश्वास दर्शक ठरवादिवशी जयललिता आणि त्यांच्या समर्थकांनी सभागृहात गोंधळ घातला, अध्यक्षांनी मार्शलांकरवी जयललिता समर्थकांना बाहेर काढलं. डीएमकेच्या विरोधानंतर पोलिस बोलवून लाठीचार्ज केला गेला. यात अध्यक्ष सुद्धा जखमी झाले, पण त्यानंतर देखील त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं. 

त्यात जानकी यांचा विजय झाला, पण राज्यपालांनी हे हास्यास्पद बहुमत असल्याचं सांगत नाकारलं आणि ३५६ कलमांतर्गत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. सोबतच विधानसभा बरखास्त करत नवीन निवडणूक घेण्याची देखील शिफारस केली.

बुटा सिंग यांच्या कडील गृहमंत्रालयानं अजिबातच वेळ न घालवता, या शिफारशी मंजूर केल्या आणि २४ दिवसातच जानकी रामचंद्रन यांचं सरकार बरखास्त केलं. 

मध्यप्रदेश. १३ फेब्रुवारी १९८८

१९८५ रोजी मध्यप्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर राजीव गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांना हटवत विमानतळावरच मोतीलाल वोरा यांना मुख्यमंत्री बनवलं. तर अर्जुनसिंह यांना पंजाबचे राज्यपाल म्हणून पाठवलं.

३ वर्ष व्यवस्थित गेल्यानंतर राजीव गांधी यांना आगमी लोकसभा निवडणुका समोर ठेऊन वोरा यांचा राजीनामा घ्यायचा होता. त्यांनी बुटा सिंग यांच्यावर जबाबदारी सोपवली.

त्यावेळी अवघे ६ महिने राज्यपाल म्हणून काम केल्यानंतर अर्जुन सिंग दिल्लीत तळ ठोकून होते. बुटा सिंग यांनी अर्जुनसिंग यांनाच मुख्यमंत्री म्हणून राज्यात परत पाठवलं. त्यावरून बुटा सिंग यांनी एका दगडात दोन निशाण टिपल्याची चर्चा त्यावेळी मध्यप्रदेश आणि दिल्लीत पसरली होती. 

एक तर अर्जुनसिंग दिल्लीत राहून आपलं स्थान पक्षात मजबूत करत होते, त्यामुळे त्यांना तिथून काढणं बुटा सिंग यांच्यासाठी गरजेचं बनलं होतं. तर दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेश मधील गटबाजी आणि आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन वोरा यांना हटवायचा होतं. बुटा सिंग यांनी दोन्ही काम केली.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.