विमानातून फोन लावतो येतो का ? तर हो लावता येतो पण…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावमधल्या सभेत एक वक्तव्य केलं, एका रुग्णाच्या रिपोर्ट्स संदर्भात ते म्हणाले, “मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात असलेल्या अधिकाऱ्याला फोन लागत नव्हता, फोन बिझी येत होता. मी पायलटला सांगितलं पाच मिनिटं थांब मला एक महत्त्वाचा फोन लावायचाय. मी फोन लावला, त्यानी १० मिनिटं विमान थांबवलं. माझी चर्चा झाली आणि लगेच त्यांचा रिपोर्ट आला.”

त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच राडा सुरुये. अनेक जण त्यांना ट्रोल करतायत, तर अनेक जण विचारतायत मुख्यमंत्र्यांनी फ्लाईटमधून कसा काय फोन केला ?

आता मुख्यमंत्र्यांनी विमान हवेत असल्याचा उल्लेख कुठेही केला नाही. जर विमानानं टेकऑफ केलं नसेल, तर मुख्यमंत्री पायलटला ५-१० मिनिटं थांबण्याच्या सूचना देऊच शकतात आणि टेकऑफ झालेलं नसताना फोनवर आरामात बोलता येतंय. त्यामुळं विमान उडायच्या आधी विमानतळावर असताना हा फोन झाल्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, पायलटनं १० मिनिटं विमान थांबवलं, आता उडतं विमान थांबवणं काय शक्य नाही. पण मग चालू फ्लाईटमधून फोनवर बोलता येऊ शकतंय का ? तर याचं उत्तर आहे हो. हे कसं शक्य आहे तेच बघुयात.

फ्लाईटमध्ये असताना आपल्याला फोन का करता येत नाही, याचं बेसिक कारण म्हणजे नेटवर्कच्या मर्यादा.

मोबाईल टॉवरपासून आपण जवळपास हजारो फूट उंचीवर असतो, त्यात विमानाचा स्पीड पण एकदम खुंखार असतो. त्यामुळं फोन लावताना आपण एका टॉवरजवळ असू आणि बोलणं सुरू करेपर्यंत भलत्याच. त्यामुळं सिग्नल चेंज होत राहतात, ज्याचा परिणाम फोन कनेक्ट होण्यावर होतो आणि सोबतच फोनचे सिग्नल्स विमानाच्या सिग्नल्सला अडथळा ठरुन सुरक्षेला धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला फ्लाईट सुरू असताना फोनवर बोलता येत नाही.

माणूस दुसरी आकाशगंगा हुडकू शकतोय म्हणल्यावर या प्रॉब्लेमवर पर्याय शोधणं काय अवघड नाही.

पाहिला पर्याय आहे तो म्हणजे वायफाय कॉलिंग सर्व्हिस. २०१८ मध्ये ट्रायनं भारतातल्या फ्लाईट्स वायफाय सर्व्हिस आणि फोन कॉल्ससाठी सुविधा देऊ शकतील असा निर्णय घेतला होता. आता वायफाय कॉलिंग काय असतंय, तर मोबाईलच्या नेटवर्कचा वापर न करता वायफायच्या आधारे इंटरनेटचा वापर करुन थेट कॉल करायचा, ज्यात मोबाईलची रेंज जाण्याचा प्रश्नच नसतो. पण भारतातल्या बहुतांश कंपन्यांनी यासाठी फार उत्साह दाखवला नाही, कारण त्यासाठी येणारा खर्च भरपूर होता.

मात्र एमिरेट्स, व्हर्जिन अटलांटिक या परदेशी विमान कंपन्यांनी परदेशात हे मॉडेल यशस्वीपणे राबवलं. भारतातही काही परदेशी एअरलाईन्स या सुविधा देतात. त्यामुळं जर विमानात सुसज्ज यंत्रणा असेल तर वायफाय कॉलिंग वापरुन उडत्या विमानात बसून फोन लावता येऊ शकतो.

दुसरा पर्याय आपल्याला सापडतो जिओचा.

जिओनं २०२० मध्ये फ्लाईटमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी विशेष प्लॅन्स आणले होते. जिओच्या वेबसाईटवर गेल्यावर या प्लॅन्सची माहिती मिळते. हा इनफ्लाईट कनेक्टिव्हीटी प्लॅन घेतला असेल, तर इंटरनेट, एसएमएस आणि फोन कॉलची सुविधा फ्लाईटमध्ये असताना मिळू शकते.

याचे दर ४९९, ६९९ आणि ९९९ असे आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुविधा जिओची पार्टनरशिप असलेल्या २२ एअरलाईन्सच्या विमानातच मिळू शकते. त्यातही त्या त्या एअरलाईन्सचे विशिष्ट नियम असतात, विमान २० हजार फूट पेक्षा जास्त उंचीवर गेल्यावरच ही सुविधा वापरता येते आणि त्यातही आपल्याला फक्त कॉल करता येतात, इनकमिंग कॉलची सोय नाही.

उडत्या विमानातून फोन करण्यासाठी आणखी एका पर्यायाची शक्यता वर्तवली जाते ते म्हणजे सॅटेलाईट फोन्स.

आपण नॉर्मल मोबाईल वापरतो ते आजूबाजूच्या मोबाईल कंपनीच्या टॉवरशी कनेक्ट होतात आणि आपल्याला फोनवर बोलता येतं. सॅटेलाईट फोन्सचं कनेक्शन थेट अवकाशातल्या सॅटेलाईट्सशी असतं. सॅटेलाईट फोनवरुन कुणाला कॉल केला, तर अवकाशातला सॅटेलाईट जमिनीवर असलेल्या रिसिव्हरला रेडिओ सिग्नल्स पाठवतो. त्यानंतर हा रिसिव्हर सेंटर सॅटेलाईट फोनला सिग्नल ट्रान्स्मिट करतो आणि फोनवर बोलणं शक्य होतं. सॅटेलाईट फोनचा वापर करुन जगाच्या पाठीवर कुठंही फोन फिरवता येतो.

भारताबद्दल बोलायचं झालं,तर भारतात सुरक्षेच्या मुद्द्यामुळं सामान्य माणसांना सॅटेलाईट फोन वापरण्यावर बंदी आहे. फक्त अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सॅटेलाईट फोन वापरु शकतात. त्यांनाही सॅटेलाईट फोन वापरण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाची परवानगी असणं गरजेचं आहे. 

सॅटेलाईट फोनच्या सुविधेसाठी बीएसएनला लायसन्स देण्यात आलेलं आहे, त्यांनी मे २०१७ मध्ये सॅटेलाईट फोन सर्व्हिस सुरू केली होती. त्याआधी हे लायसन्स टाटा कम्युनिकेशनकडे होतं. 

सॅटेलाईट फोनच्या फक्त हँडसेटची किंमत ९० हजार असते, लायसन्स, कार्ड, रिचार्ज वैगरे धरुन दीड लाखाला पडतं, कॉलिंग रेट पण मिनिटाला १८ रुपये आहे. 

महत्त्वाचे सरकारी आणि लष्कर अधिकारी आणि महत्त्वाचे नेते हा फोन वापरु शकतात, यासाठी त्यांना सबसिडीही मिळते. त्यामुळं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे सॅटेलाईट फोन असणं सहज शक्य आहे. फक्त जर विमानात सॅटेलाईट फोन वापरण्यासाठी लागणारे अँटिना आणि इतर यंत्रणा असतील, तर ते उडत्या विमानात सॅटेलाईट फोन वापरु शकतात.

त्यामुळं पॉवर आणि सोया असेल, तर विमानातून फोन लावता येतोय, समोरच्यानं तेवढा उचलला पाहिजे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.