सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणजे लाईफ सेट असं वाटत असेल, तर आधी नवीन नियम वाचा…

आधी प्रश्न पडायचा हे सोशल मीडियावर रील बनवून फेमस होणाऱ्यांचा त्यात काय फायदा असतो? हळू हळू मग लक्षात आलं की, हे लोक एखाद्या कंपनीचं प्रमोशन करून त्यातून पैसे कमवतात. सुरूवातीला हे काम काही फार भारी नाहीये असं लोक म्हणायचे. हळू हळू मग या कामातले फायदे लक्षात आले आणि आता प्रत्येक गल्ली बोळात एक तरी इन्फ्ल्यूएन्सर दिसतो.

अगदी आकडेवारीनुसार सांगायचं झालं तर, सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरचं मार्केट हे २०२५ सालापर्यंत तब्बल २,८०० कोटींचं होणार आहे असं एक सर्व्हे सांगतो.

हे सोशल मीडिआ इन्फ्ल्यूएन्सिंगचं मार्केट इतकं मोठं कसं झालं तर, आताच्या घडीला फिल्म्स असो किंवा मग एखादा ब्रँड अगदी प्रत्येक गोष्टीचं या माध्यमातून प्रमोशन होताना आपल्याला दिसतंय. अगदी आयपीएल सारख्या मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंटचं प्रमोशनसुद्धा यामार्फत झालेलं आपण बघितलंय.

बरं हे सोशल मीडिया आणि त्यातले इन्फ्ल्यूएन्सर्स हे तर आपण सगळे रोजच आपल्या फोनवर बघतो. मग, आज हे असं त्यांचा विषय चर्चेत का आलाय तर, त्यांच्यासाठी आता सरकारने नवीन नियम बनवलेत. हे नियम पारदर्शकता आणून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी बनवण्यात आले आहेत.

हे नियम पाळण्यात आले नाही तर, ५० लाखांपर्यंतचा दंड, ६ वर्षांपर्यंत ब्रँड प्रमोट करण्यापासून बंदी अशा प्रकारच्या शिक्षा करण्यात येतील.

हे सर्व नवे नियम त्या प्रत्येक व्यक्तीसाठी बंधनकारक असतील ज्या व्यक्तिकडे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची ताकद असेल आणि ग्राहकांच्या मनावर प्रभाव टाकू शकत असेल आणि त्यामुळे ग्राहकांची खरेदी करण्याची मानसिकता बदलु शकत असेल.

आता हे नियम नेमके काय आहेत ते बघुया.

तर, पारदर्शकता हा या नव्या नियमांमधला एक महत्त्वाचा भाग आहे. एखादा ब्रँड आणि सेलिब्रिटी किंवा इन्फ्ल्यूएन्सर यांच्यात जो व्यवहार होईल त्याबाबत पारदर्शकता असणं गरजेचं आहे. या संदर्भातली घोषणा सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथोरिटीने केली आहे.

पारदर्शकता कशाप्रकारे आणायची आहे?

तर ज्याप्रकारे एखाद्या टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये खालच्या बाजुला एका ओळीत त्या जाहिरातीसंदर्भात, ‘अटी व शर्ती लागू’ असं लिहीलेलं असतं किंवा मग, एखाद्या सिनेमात हिरो दारू पिताना दिसत असेल तर, त्या सीनच्या वेळेस स्क्रीनखाली मद्यपान आरोग्यास हानीकारक आहे असं  लिहीलेलं असतं. तश्याच ओळी आता सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्सला वापरणं गरजेचं असणार आहे.

या ओळी फक्त पोस्टच्या कॅप्शनमध्येच नाही तर, स्क्रीनवर सुद्धा दिसणं गरजेचं आहे.

म्हणजेच, जर एखादा फोटो पोस्ट करून हे प्रमोशन केलं जात असेल तर, त्या फोटोमध्ये या प्रोडक्टबद्दलची ओळ असली पाहिजे. व्हिडीओ असेल तर, त्यासाठीही सारखाच नियम आहे. शिवाय, लाईव्ह स्ट्रीमिंग असेल तर, पूर्ण वेळ टीकरच्या  माध्यमातून ही ओळ दिसत राहिली पाहिजे. असं हे नवे नियम सांगतात.

कंझ्युमर अफेर्सचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी म्हटलंय,

“सोशल मीडियावरून ग्राहकांना ज्या गोष्टी दाखवल्या जातायत किंवा चांगल्या असल्याचं दर्शवलं जातंय, ते दाखवणाऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने पैसे घेतले आहेत किंवा ब्रँडशी त्यांचं कोणतंही कनेक्शन आहे का ? हे ग्राहकांना कळलं पाहिजे.”

बरं या सगळ्यात फक्त पैसे घेणं किंवा न घेणं हा एकच मुद्दा नसून, कोणत्याही प्रकारचा फायदा म्हणजे मोफत प्रॉडक्ट्स मिळणं, प्रॉडक्ट्स वर डिस्काऊंट मिळणं, मीडिया कव्हरेज अगदी परिवारातील कुणाला काही मिळणार असेल तरीही या बाबतीतली पारदर्शकता बाळगणं आवश्यक असणार आहे.

या सगळ्या नियमांचं पालन झालं नाही किंवा ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचं जाणवलं तर, संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार हा ग्राहकांकडे असणार आहे.

आता सोशल मीडियावरून कोणत्याही स्वरुपात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.

अनुचित व्यापार पद्धती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी २०१९ मध्ये बनवण्यात आलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याने सेट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे नवीन नियम आहेत.

आता सोशल मीडियाचा वापर हा मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं लक्षात घेत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी उचलेलं हे एक मोठं पाऊल असल्याचं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.