5G स्पेक्ट्रमचा रेकॉर्ड ब्रेक लिलाव झालाय, 8 महत्वाच्या गोष्टी समजून घ्या
देशभर सध्या 5G बद्दलच चर्चा सुरु आहे. नवीन मोबाईल लॉन्च झाल्यानंतर त्याचे स्पेसिफिकेशन्स बघताना त्यात 5G आहे का? हे आवर्जून बघितलं जातंय. कारण लवकरच भारतात 5G सुविधा येणार असं केंद्रीय मंत्रालयाने सांगितलं आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, असं केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.
मात्र 5G चा बोलबाला सुरु आहे तो कशाच्या आधारावर? हे अनेकांना कळेना झालंय. तर याचं कारण आहे, नुकताच पार पडलेला ‘5G स्पेक्ट्रमचा लिलाव’. तेव्हा या लिलावाबद्दलच्या गोष्टी सोप्या शब्दांत अगदी 8 पॉईंट्समध्ये जाणून घेऊया…
पहिला मुद्दा – या लिलावाला सगळ्यात मोठा लिलाव म्हटलं जातंय कारण हा लिलाव तब्बल 7 दिवस चालला आहे. 26 जुलैपासून ही लिलावाची प्रक्रिया सुरु झाली होती. लवकर लिलाव संपेल असं वाटलं होतं मात्र बोली वाढतच गेल्या आणि सात दिवस हा लिलाव चालला आणि अखेर काल 1 ऑगस्टला दुपारी ही लिलाव प्रक्रिया संपली.
दुसरा मुद्दा – फक्त जास्त दिवसच हा लिलाव चालला नाही तर विक्रमी किमतीला 5G स्पेक्ट्रमची मालकी विकली गेली आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, तब्बल दीड लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीत या स्पेक्ट्रमची विक्री झाली आहे. नेमका आकडाच सांगायचा तर 1 लाख 50 हजार 173 कोटी.
तिसरा मुद्दा – अल्ट्रा-हाय-स्पीड मोबाइल इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सक्षम असलेले हे 5G स्पेक्ट्रम ज्या किमतीला विकले गेले आहेत ती किंमत 4G च्या जवळपास दुप्पट आहे तर 3G तिप्पट किंमत आहे, असं समजतंय. गेल्या वर्षी 4G स्पेक्ट्रम 77 हजार 815 कोटीला विकले गेले होते तर 2010 मध्ये 3G स्पेक्ट्रमच्या लिलावातून 50 हजार 968.37 कोटी रुपये मिळाले होते.
चौथा मुद्दा – 5G स्पेक्ट्रमच्या या लिलावात टॉप केलेल्या कंपनीचं नाव आहे रिलायन्स जिओ. रिलायन्स जिओने 80 हजार कोटी रुपयांची बोली लगावली आहे तर त्या पाठोपाठ नंबर लावणारी टॉपची कंपनी आहे एअरटेल. एअरटेलने 50 हजार कोटींची बोली लगावली आहे.
वोडाफोन आयडिया आणि अदानी एंटरप्रायजेस देखील मागे नाहीत. वोडाफोन आयडियाने 15 हजार कोटी रुपये तर नव्यानेच टेलिकॉम सेक्टरमध्ये उतरलेल्या अदानी एंटरप्रायजेसने 5 हजार कोटी रुपयांच्या बोली लागवल्या.
पाचवा मुद्दा – यातील एअरटेल आणि जिओ या कंपन्यांची कनेक्टिव्हीटी संपूर्ण भारतभर असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे या दोन कंपन्या पूर्ण भारतात 5G ची सेवा प्रदान करतील. तर वोडाफोन आयडिया निवडक पॉकेट्समध्ये म्हणजेच काही ठराविक ठिकाणी सेवा देईल.
राहिला अदानी समूह तर या समूहाने प्रायव्हेट टेलिकॉम नेटवर्क उभारण्यासाठी 26 मेगाहर्ट्झ खरेदी केल्याची माहिती मिळतेय.
सहावा मुद्दा – सरकारने सुरुवातीला 9 बँडमध्ये स्पेक्ट्रम ऑफर केले होते – 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1,800 MHz, 2,100 MHz, 2,300 MHz, 3,300 MHz, and 26 GHz. मात्र ऐनवेळी लिलावाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 26 जुलैला 72 GHz स्पेक्ट्रम लिलावात सामील करण्यात आला, ज्याची वैधता २० वर्षे आहे. यातील बहुतांश स्पेक्ट्रम विकले गेले परंतु 600 मेगाहर्ट्झ, 800 मेगाहर्ट्झ आणि 2300 मेगाहर्ट्झ या बँडसाठी एकही बोली लागली नाही.
सातवा मुद्दा – लिलावातील सुमारे दोन तृतीयांश बोली 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गिगाहर्ट्झ या 5G बँड्ससाठी लागल्या. तर एक चतुर्थांशपेक्षा जास्त मागणी स्वतःकडे खेचली ती 700 मेगाहर्ट्झ बँडने. यातील महत्वाची बाब म्हणजे मागील दोन लिलावात म्हणजे 2016 आणि 2021 च्या लिलावात या बँडवर बिलकुल बोली लागली नव्हती.
आठवा मुद्दा – यात 2 इंटरेस्टिंग फॅक्टस आहेत…
पहिला फॅक्ट – लिलावाच्या पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली जिने 2015 च्या रेकॉर्डला मागे टाकलं. 26 जुलैला 1 लाख 45 हजार कोटी रुपयांची बोली लागली होती. यालाच जोडून आहे दुसरा फॅक्ट.. एकूण लिलावाची किंमत आहे 1 लाख 50 हजार 173 कोटी. यातील 1 लाख 45 हजार कोटीची बोली पहिल्याच दिवशी लागली. म्हणजे पुढच्या सहा दिवसांत किरकोळ वाढ झाली.
असा हा 5G स्पेक्ट्रमचा लिलाव अखेर पार पडला. याने 5G लॉन्च होण्याचा शेवटचा टप्पा देखील पार झाला असल्याचं बोललं जातंय. म्हणजेच आक्टोबरपर्यंत 5G सेवा भारतात येण्याची शक्यता दाट झाली आहे आणि म्हणूनच सगळीकडे बोलबाला सुरु आहे.
तुम्हाला 5G बद्दल किती उत्सुकता आहे? 3G, 4G च्या अनुभवानंतर तुमच्या 5G कडून काय अपेक्षा आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा…
हे ही वाच भिडू :
- BSNL ला लाखो कोटींचं पॅकेज देऊन मोदी सरकारने नविन स्ट्रॅटजी तयार केलीये
- Jio चे ग्राहक कमी होतायेत तरी कंपनी खुश, मालक खुश कारण कंपनीचा खरा गेम वेगळाच
- चायनीज ॲपच्या माध्यमातून केली जाणारी डेटाचोरी राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे.