राऊत प्रत्येकासाठी भांडले पण आज राऊतांसाठी कोण लढतंय?

पत्रा चाळ भूखंड घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं असून त्यांना ४ ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

जसं महाविकास आघाडीची स्थापना झाली तसं संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं बोलायचे. जेंव्हा जेंव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजप हल्ला करत तेंव्हा संजय राऊत ढाल बनून समोर येत असायचे तसे आत्ताही येत असतात.

पण आजच्या घडीला जेंव्हा संजय राऊत यांना ईडी अटक करतेय तेंव्हा मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, महाविकास आघाडीची ढाल बनून समोर असणाऱ्या संजय राऊत यांच्या बाजूने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना आहे का ?  की हा लढा शिवसेनेला आणि त्यातल्या त्यात संजय राऊतांना एकट्याने लढावा लागणारे का ? 

हे आम्ही कोणत्या आधारे बोलतोय तर संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..

त्या आधी बघूया शिवसेनेने संजय राऊत यांच्या अटकेबद्दलची काय भूमिका मांडली ?

शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या संजय राऊतांच्या अटकेवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतील यावर सर्वांचंच लक्ष लागून होतं. 

उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया अशी दिली कि, “लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाने हे कारस्थान सुरु आहे. हिंदुत्व बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस होत नव्हते. तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष हिंदुत्वावर बोलत होता. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा हे सगळे कोठे होते,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला केला…

त्यानंतर ठाकरेंनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला आहे.

“संजय राऊत यांच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. कारण आजच्या राजकारणात बळाचा वापर सुरु आहे. बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सारखे नसतात. दिवस हे फिरतात. तुमचं काय होईल याचा विचार सुद्धा करणे भाजप आणि नड्डा यांनी करण्याची आवश्यकता आहे,” असे उद्धव ठाकरे म्हंटलं असलं तरीही याव्यतिरिक्त ते फार काही बोललेच नाही.

तर आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेदरम्यान “संजय राऊत यांना अटक हे कटकारस्थान आहे. हा महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे”, अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी “संजय राऊत यांना खोटे पुरावे जमा करून बोगस केसमध्ये अटक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं आणि शिवसेना संपवण्याचा हे प्लॅनिंग आहे. भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचं म्हंटलय.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली की, ईडी केंद्र सरकारची गुलाम आहे. त्यातून एकएकेला ठरवून टार्गेट केले जात आहे.

खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून संजय राऊतांवरील ईडी कारवाईचा मुद्दा शिवसेनेचे खासदार आज राज्यसभेत मांडला गेला त्यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. 

हे झालं शिवसेनेचं आता राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया विशेषकरून महत्वाच्या आहेत.

मात्र या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेच्या वेळेस संजय राऊतांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरते.

जेंव्हा १ नोव्हेंबर २०२१ च्या रात्री अचानक ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होतीच. याचदरम्यान, अजित पवारांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं कारवाई केली होती तेंव्हा राऊत यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम ठरवून त्रास दिला जात आहे. आम्ही २०२४ नंतर बघून घेऊ, बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तुमच्याही फाईली तयार आहेत, अशा शब्दात भाजपला इशारा दिला होता.

२३ फेब्रुवारी २०२२ रोजी जेंव्हा ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिकांना अटक केली होती तेंव्हा संजय राऊतांनी लागलीच प्रतिक्रिया देत आरपारच्या लढाईचाच इशारा दिला होता, आणि नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये अशी ठाम भूमिका मंडळी होती.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संजय राऊतांच्या बाबत घेतलेली भूमिका बघुयात. 

महाविकास आघाडीच्या शिल्पकार म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत. राऊत यांच्या अटकेबाबत शरद पवारांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली की, ” मी काय सांगायचंय ते सांगितलंय….”

बस्स…तर या विधानाची पार्श्वभूमी म्हणजे,  ईडीने संजय राऊत यांच्या मालमत्तांवर छापे टाकून त्या जप्त केल्या होत्या, तेव्हा शरद पवार यांनी आपल्याच पक्षातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात असतांना पंतप्रधान मोदींकडे केवळ संजय राऊत यांचाच मुद्दा मांडला होता. 

त्याच अनुषंगाने शरद पवार यांनी आता, मी काय सांगायचंय ते सांगितलंय, असं आटोपशीर वक्तव्य केलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

छगन भुजबळ-  काल राऊत यांच्या घरावर पडलेल्या धाडीनंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली की, “संजय राऊत यांच्यावर ही कारवाई अपेक्षित होतीच. एकदा ईडीचा तपास सुरू झाला की त्यांचे ऑफिस, घर चेक करतात अशी प्रतिक्रिया देत त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला.

 दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया की, 

“या यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे. संजय राऊतांच्या प्रकरणात नेमकं काय झालं आहे, त्यांच्याकडे सारखंसारखं का येत आहेत याविषयी जास्त अधिकारवाणीने संजय राऊतच बोलू शकतील,” असं म्हणत अजित पवारांनी या प्रकरणावर जास्त बोलणंच टाळलं. 

पण २०२१ मध्ये जेंव्हा आयकर विभागानं अजित पवारांच्या मालमत्तांवर कारवाई केली होती तेंव्हा राऊत यांनी भाजपला थेट शिंगावर घेतलं होतं मात्र आता वेळ संजय राऊतांवर आली तेंव्हा अजित पवारांची “देशात कुठल्याही यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे असं म्हणत घेतलेली सावध भूमिका म्हणजे राष्ट्रवादीचे नेते राऊत यांच्यापाठीमागे ठाम नसावेत का असा प्रश्न निर्माण होतो.

मात्र सोबतच शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील सख्य पाहता शरद पवार संजय राऊत यांच्यामागे आपली ताकद उभी करतील काय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

आता काँग्रेसबाबत बोलायचं तर,

संजय राऊत यांच्या अटकेवर बोलताना महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रतिक्रिया दिली की, “राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी संजय राऊत यांच्यावर भाजपाने ईडी कारवाई केली आहे”.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी संजय राऊत यांच्या अटकेचा निषेध करत, “ईडीची कारवाई म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न आहे आणि काँग्रेस संजय राऊतांच्या पाठीशी आहे असं स्पष्ट केलंय.

तर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी, “देशामध्ये आता लोकशाही राहिली की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय हेतूने विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा” आरोप त्यांनी केला.

अलीकडेच चर्चेत आलेले काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी ट्विट करत राऊत यांना पाठिंबा दर्शवला आहे , भाजपच्या दबावाच्या राजकारणापुढे न झुकल्याची शिक्षा राऊतांना मिळतेय” असं त्यांनी या ट्विट मध्ये लिहिलंय. 

तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संजय राऊत यांना पाठिंबा देण्याचं काम करतायेत. काल ईडीचे पथक राऊतांच्या घरी पोहचले तेंव्हा सावंत यांनी केलेलं ट्विट –

आणि आज देखील त्यांनी ट्विट करत, संजय राऊत यांच्या पाठीशी उभे असल्याचं जाहीर केलं आहे.

आधीच अनिल देशमुख, नवाब मलिक यांना जामीन मिळणंही मुश्किल असतांना संजय राऊत यांची अटक शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार हे मात्र नक्की.

मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वरील सर्व प्रतिक्रिया पाहिल्यास प्रत्येक वेळी भाजपशी झालेल्या राजकीय संघर्षात राऊत हे बिनीचे शिलेदार बनून आघाडीवर राहिलेले संजय राऊत प्रत्येकासाठी भांडले पण आज राऊतांसाठी कोण लढतंय? 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.