तिने त्याच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले अन त्याचं आयुष्यच बरबाद झालं !

२३ ऑगस्ट २०१५.

जवळपास ५ वर्षांपूर्वीची घटना.

राजधानी दिल्लीतील एका तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एका तरुणाचा फोटो पोस्ट केला होता. या तरुणाने ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला अश्लील शिवीगाळ केली, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

ट्रॅफिक सिग्नल सारख्या स्थळावर असं काही होत असताना आणि तिथे बरेच लोक असताना देखील कुणीच आपल्याला मदत केली नाही. कुणीही आपल्या बाजूने उभं राहिलं नाही. त्यामुळे आपण स्वतःचं स्वतःसाठी लढायचं असं ठरवलं आणि  त्या तरुणाविरोधात टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शिवाय फेसबुकवरील सर्वांना त्या तरुणाचा फोटो आणि गाडीचा नंबर व्हायरल करण्याचं आवाहन देखील तिने केलं.

“तरुणाने आपल्याला जी शिवीगाळ केली, ते ही मी इथे लिहू शकले असते. परंतु फेसबुकने आपली पोस्ट डिलीट करू नये, यासाठी ते टाळतेय” असंही तिने आपल्या पोस्टच्या शेवटी म्हंटलं होतं.

पोलीस तक्रार करून झाल्यानंतर ती सोशल मिडीयाच्या ‘न्याय दरबारा’त स्वतःसाठी न्याय मागत होती. जसलीन कौर असं त्या तरुणीचं नाव आणि तिने ज्याच्या विरोधात दुर्व्यवहाराचे आरोप केले होते तो तरुण म्हणजे सर्वजित सिंग.

जसलीनने फेसबुक पोस्ट टाकली आणि सर्वांनी तिच्या धैर्याची दाद द्यायला सुरुवात केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील तिने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करणारं ट्वीट केलं.

त्यानंतर मात्र व्हायरलचा रोग लागलेल्या अनेकांनी गोष्टीची कुठलीही खातरजमा न करता ती पोस्ट शेअर करायला सुरुवात केली. अवघ्या काही तासात तिची पोस्ट व्हायरल झाली आणि सर्वजित सिंगवर ‘विकृत’ असल्याचा ठप्पा लागला.

दरम्यानच्या काळात सर्वजितने देखील एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. “महिलांविरोधात छेडछाडीचे अनेक प्रकार होत असतात हे जरी खरं असलं तरी आपण मात्र जसलीनशी कुठलंही गैरवर्तन केलं नाही. उलट जसलीनने ‘आता मी काय करते बघ’ असं म्हणत पोलीस कारवाईसाठी तयार राहण्याची धमकी दिली.

मी जर तिच्याशी काही गैरवर्तन केलं असेल तर कुणीतरी साक्षीदार असेन ना..? मी  एक सामान्य माणूस काही कुणी गुंडा नाही की ज्यामुळे लोक मला घाबरून या प्रकाराविरोधात बोलणार नाहीत” असं त्याने लिहिलं. पण तिकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता.

जसलीनने दिलेली तक्रार आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या तिच्या पोस्टमुळे पोलिसांनी सर्वजितला अटक केलं. प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात केस उभी राहिली आणि आजपर्यंत गेल्या ३ वर्षात या केसची १३ वेळा सुनावणी झाली पण एकाही सुनावणीसाठी  जसलीन न्यायालयात हजर राहिली नाही.

सर्वजित विरोधात पोलीस केस दाखल झाल्याने त्याचं करिअर मात्र जवळपास संपलं. तो ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीने या प्रकरणानंतर त्याला कामावरून काढून टाकलं. आपल्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांवर या प्रकरणाचा वाईट परिणाम होतोय, असं त्याला सांगण्यात आलं.

त्यानंतर त्याने एका ‘मॅरीज ब्युरो’सोबत काम करायला सुरुवात केली. तिथे त्याला काम तर मिळालं, पण पहिल्या कंपनीतल्या पगारापेक्षा जवळपास अर्ध्या पगारावर. पण काही काळातच या नोकरीवरूनही त्याला काढून टाकण्यात आलं.

नवी नोकरी शोधणं आणि कोर्टाच्या खेट्या मारणं यात गेल्या ३ वर्षांच्या काळात सर्वजितला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आणि जो मानसिक त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.

कोर्टाच्या आतापर्यंत झालेल्या १३ सुनावणीपैकी फक्त २ वेळा जसलीनच्या बाजूने तिचे वडील कोर्टासमोर हजर राहिले. आपली मुलगी नोकरीच्या निमित्ताने कॅनडामध्ये असल्याने ती सुनावणीस हजर राहू शकत नाही, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं.

जसलीनच्या वडिलांच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना सर्वजितने ‘द प्रिंट’शी बोलताना आपली बाजू मांडली. सर्वजित  म्हणतो,

“प्रत्येकवेळी जेव्हा जसलीन कोर्टात अनुपस्थित असते, त्यावेळी तिच्या नोकरीचं कारण तिच्या वडिलांकडून दिलं जातं. म्हणजे तिला तिचं करिअर बनवण्याचा अधिकार आहे आणि मला नाही का..?”

जसलीनला पुन्हा पुन्हा समन्स पाठवून देखील न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने आपल्या २९ ऑगस्ट रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने तिच्याविरोधात वॉरंट पाठवलं आहे. जसलीनने आपल्याविरोधात अशाप्रकारचं वॉरंट निघाल्याचं मान्य करण्यास नकार दिला परंतु तिच्या वकिलांनी मात्र वॉरंट निघाल्याचं मान्य केलं आहे.

दरम्यान “मी एका खास उद्देशाने ही लढाई सुरु केली असून ती शेवटपर्यंत लढण्यास मी  प्रतिबद्ध आहे. मी कोर्टासमोर येईल आणि माझी साक्ष नोंदवेल. या प्रकरणाला एवढं महत्व देण्याची गरज नाही” अशी प्रतिक्रिया जसलीनने ‘दि प्रिंट’शी बोलताना दिली आहे.

खरं तर हे प्रकरण कोर्टात आहे. कोर्ट या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईलच. कदाचित सर्वजित दोषी ठरवला जाईल, कदाचित तो निर्दोषही सुटेल. पण त्या आधी ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून त्याचं जे मिडिया ट्रायल केलं गेलं, त्याचा मात्र स्वीकार केला जाऊ शकत नाही. या प्रकरणी जर न्यायालयाने सर्वजितला निर्दोष ठरवलं तर त्याच्या एकूणच सामाजिक प्रतिमेचं आणि करिअरमधील जे नुकसान झालंय ते भरून निघेल काय..?

याप्रकरणी फक्त पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजितची  ‘विकृत तरुण’ अशी प्रतिमा निर्माण करून जसलीनला न्याय मिळाला का..? पोलीस स्टेशनला तक्रार देऊन कायद्याच्या माध्यमातून सुरु केलेली लढाई लवकरात लवकर निर्णयापर्यंत घेऊन जाण्यास न्यायव्यवस्थेस मदत करण्याची जसलीनची जबाबदारी नाही का..?

याप्रकरणी न्यायालयाची पुढची सुनावणी १ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी कदाचित हे प्रकरण निर्णायक वळणावर पोहोचेल. आतापर्यंतच्या घडामोडीत एका खासगी वृत्तवाहिनीच्या ज्या पत्रकाराने हे प्रकरण मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आणलं होतं, त्या पत्रकाराने तर सर्वजितची माफी मागून झालीये. बाकी आपण सर्वांनी आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघणंच अधिक सयुक्तिक.

जाता जाता एक गोष्ट अशी की या प्रकरणाच्या आधारे अनेक जणांनी सध्या देशभरात सुरु असलेलं #MeToo आंदोलन आणि स्त्रीवादावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केलीये, हे सर्वात वाईट आहे. एक तर या प्रकरणात न्यायालायचा निर्णय अजून यायचाय आणि न्यायालयाने जरी सर्वजितला निर्दोष मानलं तरी एका ‘सोशल मिडीया ट्रायल’साठी आणि एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीसाठी संपूर्ण आंदोलनाला आणि स्त्रीवादाला दोषी कसं धरता येईल..?

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.