योगी आणि महाराजांना पहिल्यांदा संसदेत कोणी एंट्री दिली असेल तर ती काँग्रेसनेच

‘योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला मान आहे. परंतु, त्यांचे स्थान मंदिर आणि मठात आहे. राजकारणात नाही. ज्या ज्या वेळेस योगी आणि महाराज राजकारणात आले, तेव्हा देशाचे वाटोळे सुरू होते,’

अशी खोचक टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर  प्रणिती शिंदे यांची ही टीका होती.

तसं योगी आल्यानंतर आणि ते येणाच्या आधी बरेच साधू संत राजकरणात दिसले होते. संसदेत भाजपच्या बाकांवर आपल्याला आज काल जास्त साधू – साध्वी दिसतात.पण भाजपा तसा आलीकडला पक्ष.  त्यामुळे साधुसंतांची भूमी असलेल्या भारतात साधूंना आश्रमातून संसदेत कोणी आणला हा प्रश्न आम्हाला पण पाडला. मग आमचा पण शोध चालू झाला नक्की ही ‘परंपरा’ कोणी चालू केला त्याचा.

तर याचं पण मूळ पोहचतं योगींच्या गोरक्षनाथ  मठापर्यंत.

१९६७ मध्ये गोरक्षनाथ मठाचे महंत  दिग्विजय नाथ हे मठातून थेट संसदेत पोहचले होते. 

पण महंतांनी अपक्ष लढत मठ ते संसद ही यात्रा पूर्ण केली होती. 

मात्र पक्षाची अधिकृत उमेदवारी देत साधू संसदेत आणले ते म्हणजे काँग्रेसने.

काँग्रेसने १९७१ मध्ये साधू-संतांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची सुरुवात केली.

त्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात जन्मलेले स्वामी रामानंद शास्त्री यांना उत्तरप्रदेशमधल्या बिजनौरमधून आणि स्वामी ब्रह्मानंद यांना हमीरपूरमधून उमेदवारी दिली होती. दोन्ही स्वामींनी आपापल्या जागेवरून निवडणूक जिंकली. 

स्वामी ब्रह्मानंद संसदेतील पहिले भगवे कपडे घालणारे खासदार देखील होते असं सांगण्यात येतं.

स्वामी ब्रह्मानंद यांनी १९७७ मध्येदेखील  काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, परंतु १९७७ मध्ये बीकेडीच्या तेज प्रताप सिंग यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. बदललेल्या राजकीय परिस्तिथीत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी धार्मिक संस्था, साधू यांना जवळ करण्यास सुरवात केली होती त्याचाच हा भाग असल्याचं सांगितलं जातं.

मग काँग्रेसनं नारळ फोडल्यानंतर बाकीच्या पक्षांनी मग लाइनच लावली. 

१९९१ मध्ये भाजपने पहिल्यांदा चिन्मयानंद यांना निवडणुकीत उतरवलं –

भाजपनेही म्हणताना त्यांच्या मठातून बाहेर काढून निवडणुकीत उतरवण्यास सुरुवात केली होती. गोंडा येथे जन्मलेल्या स्वामी चिन्मयानंद यांनी १९९१ मध्ये भाजपकडून उत्तरप्रदेशच्या बदाऊनमधून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी भाजपकडून पूर्वांचलच्या मच्छलीशहर मतदारसंघातून आणि त्यानंतर १९९९ मध्ये जौनपूरमधून निवडणूक जिंकली. स्वामी चिन्मयानंद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या केंद्र सरकारमध्ये अंतर्गत सुरक्षा राज्यमंत्रीही होते.

हे महाराज पण बाकीच्या राजकारण्यांसारखे पक्ष बदलत असतात. त्यातले एक महत्वाचे नाव म्हणजे

सतपाल महाराज –

सतपाल महाराज यांचे खरे नाव सतपाल सिंह रावत आहे. त्यांचे वडील अध्यात्मिक गुरु योगीराज परमसंत श्री हंसजी महाराज आणि आई जगत जननी राजेश्वरी देवी. सतपाल महाराज सध्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित असून ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत. मागच्या उत्तराखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले सतपाल महाराज आता विधानसभेच्या  निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग करत आहेत.

आता पक्ष बदलणाऱ्या बाबांची नावं आलीच आहेत तर त्यातले अजून एक नाव म्हणजे

साक्षी महाराज 

त्यांनी १९९० मध्ये भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९१ मध्ये ते मथुरा लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते . यानंतर १९९६ ते १९९८ या काळात ते फारुखाबादमधून खासदार म्हणून निवडून आले.

आपल्या राजकीय कारकिर्दीत साक्षी महाराजांनी कधी समाजवादी पार्टी तर कधी भाजपमध्ये उडी घेतली होती. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत साक्षी महाराजांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि समाजवादी पक्षाच्या तिकीटावर फारुखाबादमधून निवडणुकीला उभे राहिले. पुढे  २०१२ मध्ये साक्षी महाराज पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. २०१९ मध्ये रेकॉर्डब्रेकिंग मताधिक्य घेतलेले साक्षी महाराज सध्या त्यांच्या अध्यात्मापेक्षा त्यांच्या विवादामुळेच चर्चेत राहतात.

पण य सगळ्यात साधू आणि राजकरण हे इक्वेशन घट्ट केलंय ते म्हणजे गोरखपूरच्या मठानं. 

१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत गोरखनाथ माठाने निवडणुकीचे दार ठोठावले. गोरक्षपीठाचे महंत दिग्विजय नाथ हिंदू महासभेच्या तिकिटावर रिंगणात उतरले.  पहिल्या निवडणुकीत हरले मात्र १९६७ मध्ये दिग्विजय नाथ अपक्ष म्हणून संसदेत पोहचले.  १९६९ मध्ये दिग्विजय नाथ यांचे निधन झाले त्यानंतर १९७० मध्ये पोटनिवडणूक झाली.

दिग्विजय नाथ यांचे उत्तराधिकारी आणि गोरक्षपीठाचे महंत अवैद्यनाथ यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि खासदार झाले. पुढे बरेच दिवस मठाच्या हातातून सीट निसटली होती. पण १९८९ मध्ये राम मंदिर आंदोलनादरम्यान, गोरखनाथ मंदिराचे प्रमुख, अवैद्यनाथ पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि अवैद्यनाथ हिंदू महासभेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा खासदार झाले. १९९१ मध्ये रामलहरमध्ये, अवैद्यनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि नंतर ते खासदार झाले.  

त्यांच्यानंतर १९९८ मध्ये, मंदिराचे योगी आणि अवैद्यनाथ यांचे उत्तराधिकारी  योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच खासदार झाले. त्यावेळी योगी हे सर्वात तरुण खासदार होते. योगी भाजपच्या तिकिटावर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये गोरखपूरमधून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

आज काल काँग्रेस कडून एक साधू टीव्हीवर दिसतात ते म्हणजे आचार्य प्रमोद कृष्णम

संभल येथे जन्मलेले आचार्य प्रमोद कृष्णम हे सध्या कल्की पीठाधीश्‍वर म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर संभळमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये पण लखनौ मधून त्यांचा पराभव झाला होता.

साधूं एवढंच राजकरणात येणाऱ्या साध्वी पण चर्चेत राहिल्या आहेत.

त्यातला सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत मजला मारणाऱ्या

उमा भरती –

मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात जन्मलेल्या उमा भारती बालपणातच धार्मिक बालक म्हणून प्रसिद्ध झाल्या. राजमाता विजयराजे सिंधिया यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी १९८४ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवायला लावली. मात्र या निवडणुकीत उमा भारती यांचा पराभव झाला. यानंतर त्या १९८९ मध्ये खजुराहो लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. १९९१,१९९६ आणि १९९८ मध्येही त्या संसदेत पोहचल्या होत्या. पक्षानं याच कामगिरीच्या जीवावर त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारीही टाकली होती. 

त्यांनतर मग साध्वी ऋतंभर, साध्वी निरंजन ज्योती, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची संसदेत पोहचल्या आहेत.

आता भारताच्या संविधानाने जे सेक्युलॅरिज्म स्वीकारलं आहे त्यामध्ये धर्म आणि राजकरण यांच्यात युरोपातल्या देशांसारखी पूर्णपणे वेगळं करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे आपली धार्मिक प्रतीक दाखवत लोक सार्वजनिक जीवनात सहभागी होऊ शकतात.

आता प्रश्न उरतो अध्यात्म आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असण्याचा. आज ज्याप्रकरचं राजकारण खेळलं जातं त्यामध्ये कोणी साधू संत बनून राहिल हे अवघडच. 

अशावेळी साधू संतांचे आणि राजसत्तेचे संबंध कसे असावेत हे तुकोबांच्या एका किस्स्यातून कळून येते. 

संत तुकाराम यांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकांच्या हाती संत तुकाराम यांच्यासाठी मशाल, छत्र, घोडे आणि रत्ने पाठवली. यावर संत तुकारामांनी विनंतीपूर्वक म्हटले की आपल्या महाराजांना सांगावे की आपल्यावर सदा कृपा राहील परंतू मला माझ्या विठ्ठलापासून विमुख करु नका.

मी जिथे आहे, ज्या अवस्थेत आहे, खुश आहे. माझी झोपडीच माजा राजमहाल आहे. आणि माझ्या विठ्ठलाचं मंदिरच माझं राज दरबार आहे.

संत तुकारामांचे हे निर्लोभ रुप बघून महाराज देखील हैराण झाले होते. ते स्वतं अलंकार, वस्त्र, धन-दागिने घेऊन सेवकांसह तुकारामांना भेट द्यायला देहू गावी आले. हे सर्व वैभव बघून तुकाराम म्हणाले-

 

‘दिवटया छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥

आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया॥

मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव॥

गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा॥

सोने आणि माती। आम्हा समान हे चित्ती॥

तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे॥’

मुंगी आणि राव, सोने आणि माती  समान असून आम्हाला प्रभुचिंतन करण्यातच  खरे सुख आहे ही भूमिका तुकोबांनी मांडली. बहुमोल रत्नांचा नजराणा आमच्यासाठी कामाचा नव्हे. यात आमचं संतोष होणार नाही केवळ प्रभू भक्ती हेच श्रेष्ठ आहे.

आणि शिवरायांनीही तुकाबांचा हे म्हणणं मान्य केलं होतं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.