म्हणून सोनिया गांधी अध्यक्षपदाच्या नावासाठी कमलनाथ यांचा विचार करत असाव्यात…

आज सकाळी जेष्ठ काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ दिल्लीत पोहोचले. तिथं त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. आता ही भेट कोणत्या कारणांसाठी होती हे सध्या तरी स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र याच भेटीनंतर सर्व माध्यमांमध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये चर्चा चालू झाली आहे ती ‘कमलनाथ’ काँग्रेसच्या अध्यक्षपदावर येऊ शकतात.

आता या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलचं, पण आता प्रश्न राहतो तो,

कोणत्या आधारावर सोनिया गांधी कमलनाथ यांचा विचार करू शकतात?

कमलनाथ यांचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून कोणत्या आधारावर चर्चा होतं आहेत याच सगळ्यात पहिलं उत्तर म्हणजे,

त्यांची काँग्रेस पक्षासोबतची एकनिष्ठता.

अनेकदा काँग्रेस पक्षामध्ये गांधी घराण्याशी लॉयल्टी या गोष्टीला अत्यंत महत्व दिले जात असल्याची टिका केली जाते. यात मग काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना पद दिली जातात, मंत्रिपद दिली जातात अशी देखील टीका होतं असते.

याच मुद्द्यावर जर कमलनाथ यांचा विचार केला तर ते अगदी इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत. १९८० च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. सोबतच त्यांना आपला तिसरा मुलगा मानत असल्याचं देखील त्या म्हणाल्या होत्या. 

त्यानंतर आज ४० वर्षानंतर देखील कमलनाथ हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांच्या अगदी जवळच्या गोटातील मानले जातात. २०१८ साली याचा प्रत्यय आला होता. अनेक नेत्यांचा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना पसंती असताना देखील राहुल आणि सोनिया गांधींनी कमलनाथ यांना झुकत माप दिले होते.

गांधी घराण्याच्या विरोधाला उत्तर : 

मागच्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी काही ठोस बदल व्हावेत अशी मागणी होतं आहे. यात अगदी अध्यक्षपदी गांधी घराण्या बाहेरची व्यक्ती असावी अशी मागणी देखील होतं आहे. याबाबत गतवर्षी काँग्रेसमधील जवळपास दिग्गज २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. यात काँग्रेस पक्षात बदल करून होतं असलेलं नुकसान वाचवण्याची मागणी केली होती.

आता राजकीय जाणकारांच्या मते,

कमलनाथ यांची अध्यक्षपदी निवड करून सोनिया गांधी यांच्याकडून या विरोधाला उत्तर तर दिलं जाईलच, पण इथं मेख अशी की कमलनाथ यांच्या सारख्या निकटवर्ती नेत्याची निवड करून एक प्रकारे आपलं पक्षावरचं नियंत्रण देखील कायम ठेवलं जाऊ शकत.

संकटमोचक म्हणून ओळख : 

कमलनाथ यांची काँग्रेस पक्षात संकटमोचक अशी ओळख आहे. अगदी २००४ साली देखील द्रमुक आणि इतर पक्षांना जवळ आणण्यासाठी कमलनाथ यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २००९ मध्ये परदेशी गुंतवणूकीसंदर्भातील राज्यसभेत एका विधेयकावर मतदान होणार होते. तेव्हा मनमोहनसिंग हे पंतप्रधान आणि राज्यसभेचे नेते दोन्ही होते.

मात्र काँग्रेसकडे राज्यसभेत बहुमत नव्हते असं विरोधकांचं मत होते. या विधेयकावर राज्यसभेत जर बहुमत मिळालं नसतं तर सरकारवर फारसा फरक पडला नसता. पण नैतिकतेचा मुद्दा झाला असता त्यामुळे विधेयक राज्यसभेत संमत होणं गरजेचं होतं. भाजपपासून सगळे विरोधी पक्ष काँग्रेसकडे बहुमत नाही म्हणून उत्साहात होते. पण कमलनाथ यांनी मायावतींना काँग्रेसच्या बाजूने वळवून त्या विधेयकाचा मार्ग मोकळा केला होता.

त्यानंतर अलीकडेच मागच्या महिन्यात राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्यामुळे जे वादळ उठलं होतं ते शांत करण्यासाठी देखील काँग्रेसने कमलनाथ यांच्याकडे जबाबदारी दिली होती. ती कामगिरी कमलनाथ यांनी फत्ते केल्यासारखी होती. कारण त्यानंतर सचिन पायलट यांचं बंड शांत झालं होतं.

आजही राष्ट्रीय राजकारणात कमलनाथ यांचं नाव आदराने घेतलं जातं..

आज जवळपास ४० वर्षांच्या राजकारणानंतर देखील कमलनाथ यांचं राष्ट्रीय पातळीवर आदराने नाव घेतलं जातं. त्यांच्या शब्दाला अगदी त्यांच्या वयाच्या नेत्यांपासून ते सचिन पायलट यांच्या सारख्या तरुण नेत्यांकडून देखील मान दिला जातो.

म्हणजे अलीकडेच पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात जो तणाव चालला होता त्यात अमरिंदरसिंग यांच्याशी बोलण्यासाठीची जबाबदारी कमलनाथ यांना दिली होती. तसं बघितले तर अमरिंदरसिंग यांचं वय कमलनाथ यांच्या समवयस्कच. तरीही त्यांनी कमलनाथ यांच्या शब्दाला मान दिला होता. 

सोबतच ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर ज्या पोटनिवडणुका लागल्या होत्या, तेव्हा प्रचार करण्यासाठी कमलनाथ यांच्या शब्दाला मान देऊन सचिन पायलट आले होते. ज्योतिरादित्य आणि पायलट यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र तरीही सचिन पायलट यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता.

पण वयाच्या मुद्द्यावरून त्यांना तरुणांकडून विरोध होऊ शकतो…

केवळ वय या मुद्द्यावर कमलनाथ यांना काँग्रेसच्या गोटातून अध्यक्षपदासाठी विरोध होऊ शकतो. कारण जे पत्र २३ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलं होतं त्यात तरुण काँग्रेसपासून दुरावला आहे असं मत व्यक्त करण्यात आलं होतं. सोबतच तरुण दुरावने हा अत्यंत गंभीर विषय आहे. आता जर या तरुणांना पुन्हा काँग्रेसकडे वळवायचे असेल तर पक्षाला नव्या आणि तरुण नेतृत्वाची गरज आहे असं मत व्यक्त करण्यात आलं होतं.

आजघडीला कमलनाथ यांचं वय आहे ७४. त्यामुळेच त्यांच्या वयाकडे पाहता तरुणांना नेतृत्व देण्याची मागणी पुन्हा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकूणच कमलनाथ यांना अध्यक्ष म्हणून ज्या चर्चा चालू आहेत, त्या खऱ्या होण्यात प्लस पॉईंट जास्त आहेत. त्यामुळेच आगामी काळात कमलनाथ अध्यक्षपदी दिसल्यास आश्चर्य वाटायला नको इतकंच…!!

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.