‘ईडी’चा वापर राजकारणासाठी होतो या आरोपात कितपत तथ्य आहे?

आज सकाळी – सकाळी शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने छापे टाकले. यानंतर ईडीचा वापर राजकीय फायद्यासाठी होत असल्याच्या आरोपांना सुरुवात झाली आहे. कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात प्रताप सरनाईक यांची आक्रमक भूमिका होती. यामुळेच हे छापे पडले असल्याचे संशय व्यक्त होत आहे. 

पण सरनाईक यांच्यापूर्वी मागील वर्ष- दीड वर्षात विरोधी पक्षातील जवळपास ९-१० नेत्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे किंवा नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले घेतले आहे. त्यामुळे ईडीचा वापर खरंच राजकीय फायद्यासाठी होतो का? आणि जर होत असेल तर ईडीच्या रडारवर आलेल्या नेत्यांना कोणत्या आरोपाखाली अटक किंवा चौकशी केली गेली याचा बोल भिडू ने घेतलेला आढावा…

१) पी. चिदंबरम –

मागील वर्षी ऑगस्ट २०१९ मध्ये पी. चिदंबरम यांना इडीने अटक केली होती. आयएनएक्स मीडियाच्या प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचा नवरा पीटर मुखर्जी यांची अमंलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्यानंतर चिदंबरम तपास यंत्रणांच्या रडारवर आले.

पी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये ३०५ कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचे हे प्रकरण आहे. मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक स्वीकारण्यासाठी आयएनएक्स मीडियाला Foreign Investment Promotion Board (FIPB) कडून देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप आहे.

सोबतच यावर्षी जानेवारीमध्ये एअर इंडियाच्या ४३ विमान खरेदी व्यवहार प्रकरणात ईडीने चिदंबरम यांची तब्बल सहा तास चौकशी केली होती. हा करार २००९ मध्ये चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या पॅनलने निश्चित केला होता.

ईडीच्या माहितीनुसार, एअरबसकडून ४३ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी (सीसीएस)ला पाठवण्यात आला होता, त्यावेळी एक अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार, विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीला प्रशिक्षण सुविधा आणि एमआरओ (देखभाल, दुरुस्ती) केंद्रांची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी १७५ दशलक्ष डॉलर खर्च अपेक्षित होता. मात्र, त्यानंतर विमान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले, त्यावेळी सर्व अटी-शर्ती रद्द करण्यात आल्या.

याच व्यवहाराशी संबंधित प्रकरणात ईडीने माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची तीन वेळा चौकशी केली आहे.

२) मायावती –

लोकसभा निवडणुकीच्या ४ महिन्यांपूर्वी जानेवारी २०१९ मध्ये बसपा अध्यक्ष मायावती या ईडीच्या रडारवर आल्या होत्या. मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी १ हजार ४०० कोटी रुपयांची स्मारके उभी केली होती. याच कामात ११४ कोटींच्या स्मारक घोटाळ्याच्या आरोपावरून ईडीने यूपीमधील सात कार्यालयांवर छापे टाकले होते.

३) अखिलेश यादव –

अगदी त्याचवेळी १७ जानेवारी २०१९ ला ईडीने अवैध खाण प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी चालू केली आहे. एका दिवसात १३ खाणींना परवानगी देण्याच्या या प्रकरणात आधी सीबीआयने गुन्हा दाखल आणि या गुन्ह्याचा आधार घेत ईडीने गुन्हा केला.

४) रतुल पुरी –

३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यासंबंधी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना २० ऑगस्ट २०१९ ला ईडीने अटक केली होती. पुरी हे मोझर बेअर कंपनीचे माजी कार्यकारी संचालक आहेत.

पुरी वगळता कंपनीच्या चार अन्य संचालकांवरही सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. तत्पूर्वी सीबीआयने कंपनीची कार्यालये आणि आरोपी संचालकांची निवासस्थाने अशा सहा ठिकाणी छापेमारी केली होती.

सोबतच ३ हजार ६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड घोटाळयाप्रकरणीदेखील पुरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात आता कमलनाथ यांचा मुलगा वकुल्नाथ याचं नाव जोडले गेल आहे. ईडी सध्या या प्रकारणाचा तपास करत आहेत.

५) राज ठाकरे – 

ईडीने गतवर्षी २२ ऑगस्ट२०१९ ला कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरेंना चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती. राज ठाकरेंच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चरचा जमीन खरेदीत सहभाग असल्याने या व्यवहाराशी राज ठाकरेंचा संबंध येतो. असे ईडीने म्हंटले होते. 

राज ठाकरेंनी या प्रकल्पातील आपले शेअर्स २००८ मध्ये विकले. हे शेअर्स विकल्यानंतर IL & FS ने पुन्हा या प्रकल्पात गुंतवणूक केली. राज ठाकरेंनी प्रकल्पात केलेली गुंतवणूक, शेअर्स विकल्यानंतर त्यांना मिळालेला फायदा, त्यानंतर IL & FS ने केलेली गुंतवणूक या मुद्यांच्या तपासासाठी ईडीने त्यांना चौकशीसाठी  बोलावले होते. 

६) डी. के. शिवकुमार –

३ सप्टेंबर २०१९ ला काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती.  ८.३३ कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी ३० ऑगस्ट पासून सलग चार दिवसांपासून ईडीचे अधिकारी डी. के. शिवकुमार यांची चौकशी करत होते. तत्कालीन एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्री होते.

२०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकानंतर आमदारांना त्यांच्या रिसॉर्टवर थांबवण्याल्या प्रकरणी या रिसॉर्टवर आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हा तिथे काही मिळाले नव्हते पण शिवकुमार यांच्या दिल्लीच्या घरातून ७.५ कोटी रुपये सापडले होते.

याच वर्षी ऑक्टोबर २०२० मध्ये देखील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्या १४ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले होते. त्यात विविध ठिकाणांवरून ५० लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

७) शरद पवार –

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सप्टेंबर २०१९मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि  उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. सोबतच माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे दिलीप देशमुख, मधुकर चव्हाण आदी ७६ नेत्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.

याबाबत ईडीने अधिकृत नोटीस देखील काढली.

मात्र त्यानंतर शरद पवारांनी स्वतःहून चौकशीला येण्याची तयारी विधानसभा निवडणुकीच्या आधी दाखवली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे कारणामुळे ते रद्द झाले.

ईडीने पवार यांना एक ईमेल पाठवला. या ईमेलमध्ये म्हटले होते की, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी तुमच्या चौकशीची गरज नाही, कदाचित भविष्यातही या चौकशीची गरज पडणार नाही. मात्र त्यानंतरही बरेच दिवस हे प्रकरण बातम्यांमध्ये होते.

८) भूपिंदर हुडा –

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीच्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला २००५ मध्ये पंचकुला येथील जमीन वाटपात गैरप्रकार झाल्याच्या आरोप आहे. याच प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भूपिंदरसिंग हूडा आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांच्या भूमिकेबाबत ईडी चौकशी करीत आहे.

यात ही जमिन असोसिएटेड जर्नल्स विकल्याचा आरोप हुडा आणि वोरा यांच्यावर आहे. पंचकुलाच्या  सेक्टर-६ मध्ये असलेल्या प्लॉट सी-१७ शी संबंधीत हे प्रकरण गेल्या वर्षी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबर-ऑक्टोंबर २०१९ मध्ये दाखल केले होते.

९) अहमद पटेल –

२७ जून २०२० रोजी कॉंग्रेसचे दिग्गज नेते खा. अहमद पटेल यांच्या दिल्ली निवासस्थानी ईडीने छापे टाकले होते. स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हे छापे असल्याचे सांगितले गेले.

स्टर्लिंग बायोटेकने आंध्र बँकेच्या नेतृत्त्वात असलेल्या कन्सोर्टियमकडून नियमांना डावलून ५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे. पण आता कर्ज परतफेड करताना एकूण कर्ज चुकल्याची एकूण रक्कम अंदाजे ८ हजार १०० कोटी रुपये आहे. असे आरोप ईडीने पटेल यांच्यावर ठेवले आहेत. 

१०) प्रताप सरनाईक –

ईडीने आज, मंगळवारी सकाळी प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील जवळपास १० ठिकाणांवर छापे मारले. ईडीच्या पथकात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांची झाडाझडती घेतली. ‘टॉप्स सेक्युरिटी ग्रुप’शी संबंधित ही कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. यूकेहून आलेल्या रकमेचा हवालासारखा वापर झाल्याचा संशय आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबईला घेऊन जाण्याची शक्यता होती. पण ईडीचे अधिकारी वसंत लॉन्स येथील सरनाईक यांच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेल्याचे कळते.

याशिवाय सध्या सुरू असलेले ईडीचे महत्त्वाचे खटले

  • रॉबर्ट वाड्रा बेहिशोबी मालमत्ता प्रकरण
  • विजय माल्ल्या कर्ज प्रकरण
  • नीरव मोदी कर्ज प्रकरण

वरील सगळी प्रकरण आपण नीट वाचली तर यातील एकही नाव सत्ताधारी पक्षातील दिसून येत नाही. उदाहरण द्यायचं झाले तर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरोप्पा याच्यावर देखील खाण घोटाळ्याचे आरोप आहेत. पण त्यांच्या चौकशी झाल्याची बातमी या ६-७ आली नाही. त्यामुळे खरंच ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय तपास संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी होतो असं म्हणायला वाव आहे.

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Vinayak Balbhim More says

    bhidu माझा प्रश्न हा आहे. की इडी चौकशी करुन सोडुनच देत की कोणावर‌कारवाई पण झाली आहे का की सगळेच निर्दोष सुटलेत

Leave A Reply

Your email address will not be published.