आत्ता तर म्हणे एकाच डोसमध्ये काम भागवण्यासाठी संशोधन सुरूय…!

देशात सध्या सगळ्यात चर्चेतील आणि टीकेचं लक्ष ठरलेला कोणता टॉपिक असेल तर तो म्हणजे लसीकरण. यात मग अगदी कॉविन ऍपचा घोळ, लसीकरणाचे टप्पे, लसीकरणातील सातत्यानं बदलेल अंतर आणि या सगळ्यानंतर देखील न मिळणारी लस असा सगळा वाद सुरु आहे.

अशातच आता या वादात आणखी भर पडणार आहे,

कारण सध्या लसीचा एकचं पुरेसा होऊ शकतो का? या बाबत संशोधन सुरु आहे.

१६ जानेवारी २०२१ पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता देण्यात आली. मात्र त्यानंतर आज पर्यंत अगदी ९० टक्के लोकांना कोविशील्ड हीच लस देण्यात आली आहे.

पण यात देखील एक मेख आहे, ती म्हणजे कोव्हिशील्ड लसीचाचं दुसरा डोस घेण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्यानं अंतरात करण्यात आलेली वाढ.

आणि आता तर या लसीचा एकच डोस पुरेसा होऊ शकतो का? या दिशेनं संशोधन केलं जातं आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी २ ते ४ आठवड्याचे अंतर निश्चित करण्यात आले. मात्र त्यानंतर केंद्र सरकारकडून या अंतरात वाढ करण्यात आली. 

११ मार्च रोजी केंद्रानं पहिल्यांदा लसीच्या दुसऱ्या डोसच्या अंतरात वाढ करून ते ४ ते ६ आठवडे करण्यात आलं.

याला कारण सांगितलं गेलं ते म्हणजे,

६ मार्च रोजीच्या मेडिकल जर्नल लान्सेन्टमध्ये प्रसिद्ध झालेला अहवाल. या अहवालाप्रमाणे ६ आठवड्यांच्या अंतरात दुसरा डोस घेतल्यास ९० टक्क्यांपर्यंत प्रतिकार शक्ती वाढलेली असते. इंग्लंड आणि कॅनडामध्ये देखील याच अंतराने दुसरा डोस दिला जात असल्याचं देखील सांगण्यात आलं.

त्यानंतर पुढच्याच आठवड्यात म्हणजे २३ मार्चरोजी या अंतरात पुन्हा वाढ करण्यात आली आणि हे अंतर ४ ते ८ आठवड्यांवर जाणून पोहोचलं. 

यावेळी सरकारकडून सांगण्यात आलं की,

लसीकरणासंदर्भातील जागतिक पुरावे समोर आले आहेत. यानुसार ४ ते ८ आठवड्यांमध्ये दुसरा डोस घेतल्यास ते आणखी परिणामकारक राहत आहे. पण त्या सोबतच हा डोस ८ आठवड्यांपेक्षा जास्त अंतराने नसावा असं देखील सांगण्यात आलं.

या नंतर मात्र दुसऱ्या बाजूला केंद्राच्या या धोरणावर टीका व्हायला लागली. कारण याच काळात देशात लसींचा तुटवडा जाणवत होता, जो आजही जाणवत आहे. हा तुटवडा जाणवू नये म्हणून सरकार सातत्यानं अंतरात वाढ करत आहे, अशा चर्चा सुरु झाल्या, आणि लसी उपलब्ध होत नसल्याची टीका देखील केली जाऊ लागली.

अशातच केंद्राकडून हे अंतर पुन्हा वाढवण्यात आलं, आणि ते देखील १२ ते १६ आठवड्यांसाठी.

कोरोना लसीकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) ने केंद्राला शिफारस केली कि, कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर आवश्यक आहे. 

यामागे कारणही देण्यात आलं कि,

कोव्हिशील्डच्या पहिल्या डोसनंतर शरीराची प्रतिरोधक क्षमता बरीच वाढते आणि ही अँटीबॉडी जवळपास १२ आठवडे राहते. हे लक्षात घेऊन दुसऱ्या डोसपर्यंतची वेळ वाढवण्यात आली.

आता या लसीचा एकचं डोस देण्यात येणार ?

नुकताच एका रिसर्चमध्ये केलेल्या दाव्यानुसार जर एखाद्याला कोरोना होऊन गेला असेल, तर त्याला पुरेशा अँटीबॉडीजसाठी लसीचा एक डोस पुरेसा आहे.

त्यात आता केंद्र सरकाही लसीकरणाशी संबंधित डेटा गोळा करतं आहे, ज्यात कोरोना लसीचा एक डोस देशातील प्रत्येकासाठी प्रभावी होऊ शकतो का नाही? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात असा युक्तिवाद केला जातोय की,

इतर व्हायरल वेक्टर लस एकाच डोसमध्ये उपलब्ध आहेत. हे कोविशिल्ड सोबतही असू शकत का याची चाचपणी केली जात आहे.

सध्या तरी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे कि, लस ही दोनचं डोसमध्ये उपलब्ध असणार आहे, मात्र संशोधन आणि डाटा याच्या आधारावर भविष्यात असा काही निर्णय झाल्यास त्याबाबत आश्चर्य वाटायला नको.

सध्या परदेशी लसींमध्ये जॉन्सन आणि जॉन्सनची लस देखील सिंगल डोसवर आहे तर स्फुटनिक देखील सिंगल डोसमध्ये दिली जात आहे. फायजर आणि मॉडर्ना या दोन लसी डबल डोसमध्ये देण्यात येत आहेत.

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.