क्युबा देशात टॅक्सी ड्रायव्हर दिवसाला जेवढं कमवतो तेवढं कमवायला डॉक्टरला महिना लागतो

तुम्ही एक लग्नाळू मुलगी आहात अस समजा. समजायला काय जात. आपण गणित सोडवताना कशाला पण X समजायचो कनाय. मग स्वत:ला लग्नाळू मुलगी समजायला काय जातय. तर तुम्ही एक लग्नाळू मुलगी आहात अस समजा. आत्ता तुम्हाला पहायला दोन स्थळ येणार आहेत. पहिलं स्थळ आहे एका टॅक्सी ड्रायव्हरचं. आणि दूसरं स्थळ आहे एका डॉक्टरचं. साहजिक तुम्ही डॉक्टर मुलाला पसंत कराल.

आत्ता तुम्ही क्युबा या देशात राहणारी लग्नाळु मुलगी आहात असं समजा.

समजा वो, लोड घेवू नका. तर तुम्ही क्युबात राहताय आणि तुम्हाला बघायला डॉक्टर आणि टॅक्सी ड्रायव्हर अशी दोन स्थळ आलेत तेव्हा तुम्ही डॉक्टरला दारावरून हाकलून लावाल आणि टॅक्सी ड्रायव्हर साठी रेड कार्पेट टाकाल. पोह्यात जास्तीचे शेंगदाणे टाकाला.

अस का…?

कारण क्युबा देशात एक टॅक्सी ड्रायव्हर दिवसाला किमान ६० डॉलर तरी मिळवतो. म्हणजे दिवसाला किंमान साडे तीन ते चार हजार रुपये मिळवतो. आणि डॉक्टर महिन्याला ४५ ते ५० डॉलर म्हणजे ३ ते साडे तीन हजार मिळवतो.

थोडक्यात काय क्युबात दिवसाला जितकं टॅक्सी ड्रायव्हर कमवतो तितका पैसा कमवायला डॉक्टरला अख्खा महिना खर्च करायला लागतो.  

उडल्या का फ्यूजा. उडायलाच पायजेत. आत्ता यासाठी आपल्याला क्युबन इकॉनॉमी समजून घ्यायला पाहीजे…

सो वेलकम टू द क्युबन इकॉनॉमी

एका ड्रायव्हरच्या दिवसभराच्या कमाईत आणि उच्चशिक्षित असलेल्या डॉक्टरच्या महिनाभराच्या कमाईत एवढी तफावत का आढळते?

त्याच कारण क्युबाच्या अर्थव्यवस्थेत दडलंय. १९५० च्या दशकात अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाला आव्हान देणारा गट सोव्हिएत महासंघाने उभा केला. १९५९ मध्ये लष्करशहा फुलगेन्सियो बाटिस्टा यांची लष्करशाही उलथवून फिडेल कॅस्ट्रो सत्तेवर आले. त्यावेळेपासून ते कॅस्ट्रोंचा अंत होईपर्यंत क्युबन सरकारने नावाला सुद्धा खाजगी उद्योग ठेवला नाही. सर्व खाजगी उद्योग, जमिनी सरकारने हस्तगत केल्या.

त्या देशात असणारी सर्व हॉटेल्स, फॅक्टऱ्या, दवाखाने, हॉस्पिटल्स किंबहुना लोकांची घर सुद्धा सरकारी मालकीची झाली. कोणत्या वस्तूला किती भाव द्यायचा यापासून ते कोणाला किती पगार द्यायचा हे सर्व सरकार ठरवू लागल.

एका रात्रीत प्रायव्हेट सेक्टरचा बोजाबिस्तरा गुंडाळण्यात आला.

कसा..

ते जर तुम्हाला बघायचच असेल तर तुम्ही क्युबातल्या हवाना शहराला भेट द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुंबईत चौपाटीच्या बाजूने कसे पाणीपुरी, भेळपुरी, रगडा आणि बऱ्याच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात, तसलं तिथं काही नसत. तिथं असतात सरकारी स्टॉल्स. तिथल्या प्रत्येक स्टॉलवर मिळत ओन्ली ‘हॅम चीज बर्गर’. अशी अवस्था आहे क्युबन इटरींची. (खानावळी)

प्रत्येक एका खानावळीत २ माणसं जी सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या अन्नाची वाट बघत असतात, मोकळं दुकान, मोकळी फडताळ असलं भकास चित्र दिसत. त्यांनी ४ हॅम बर्गर विको किंवा मग १५. त्या कामगारांचा आहे तोच पगार त्यांना मिळणार. क्युबन सरकारच हे मॉडेल खरच डब्यात गेलं.

सोव्हिएत रशियाच वैचारिक, सामरिक आणि आर्थिक अघोषित मांडलिकत्व कॅस्ट्रोंच्या क्युबाने स्वीकारले होत. सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टींसाठी क्युबा सोव्हिएत रशियावर अवलंबून होता. पण सोव्हिएत महासंघाच्या विघटनानंतर क्युबाची आर्थिक स्थिती ढासळत गेली आणि ती अजूनही ढासळतेच आहे.

भारतात जस रेशन कार्ड आहे तसा प्रकार क्युबात पण आहे. फक्त प्रकार थोडा वेगळा. म्हणजे कस.. तर तिथं खाजगी दुकानच नसल्याने तिथले नागरिक दर महिन्याला रेशनींगच म्हणजेच सरकार पुरवत असलेलं खातात.

समाजवादी मूल्यांच्या प्रामाणिक अंगीकारामुळे अंमलात आलेली परवडण्याजोगी आरोग्य आणि शिक्षणव्यवस्था या जमेच्या बाजू वगळल्यास क्युबामध्ये सरकार आणि नागरिक यांच्यासमोर अनंत आर्थिक विवंचना होत्या.

त्यामुळे १९९० च्या दरम्यान काही प्रमाणात अर्थव्यवस्था खुली करण्याचा सरकारनं प्रयत्न केला. यात सरकारने छोटेखानी उद्योगांना परवानगी देण्यास सुरवात केली. हेच तुम्ही आता हवानाच्या एखाद्या साध्या रेस्तरॉंट मध्ये गेलात तर क्युबन फूड तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण आपापला व्यवसाय पुढे नेण्यासाठी तिथं स्पर्धा सुरु झाली आहे.

अर्थव्यवस्था पाहिली पण टॅक्सी ड्रायव्हरचा विषय डोक्यात गेला नसणार..

क्युबाने आरोग्य आणि शिक्षणव्यवस्थेत प्रगती केली आहे. पण रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं क्युबन सरकारला जमलं नाही. तिथला एक डॉक्टरच जर महिन्याला ३००० रुपये कमावत असेल तर बाकीच्यांचा चारितार्थ कसा चालणार.

यामुळे प्रत्येक क्युबन नागरिक हा जास्तीचे पैसे कमावण्यासाठी प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतो. पर्यटन हा प्रायव्हेट सेक्टर मध्ये येणारा व्यवसाय आहे. प्रायव्हेट सेक्टरवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे परदेशातून पर्यटकांकडून हे टॅक्सीचालक जादाचे पैसे घेतात. (क्युबन लोकांच्या दृष्टीने ते जास्त आहेत.)

शिक्षण व्यवस्थेतल्या प्रगतीमुळे तिथले टॅक्सी ड्रायव्हर पण उच्चं शिक्षित आहेत. तिथं इंजिनियर, सी. ए असलेले लोक हमखास टॅक्सी चालवताना दिसतील. त्यांचं एकच म्हणणं आहे की, महिन्याभराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना ही वरची काम करावीच लागतात.

फक्त टॅक्सीचालकच नाही तर प्रायव्हेट सेक्टर मध्ये येणारे व्यवसाय जसे की, रेस्टोरंट, पार्लर्स अशा ठिकाणी नर्सेस, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, अकाउंटंट्स असे उच्चशिक्षित लोक ही काम करतात.

थोडक्यात काय जिथं स्पर्धा तिथे पैसे जास्त त्यामुळे क्युबन टॅक्सी ड्रायव्हर हा चांगले पैसे कमवतो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.