अखेरच्या काळात दि.बा.पाटील शिवसेनेत गेले होते, निवडणूक देखील लढवली होती..

गेले काही दिवस दि.बा.पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. कारण ठरलं आहे नवी मुंबई येथील विमानतळ. उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकारने या विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा घाट घातला आहे तर रायगड जिल्हयातील जनतेची मागणी आहे कि या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दिले पाहिजे.

 पण शेतकऱ्यांचे नेते एवढीच दि. बा. पाटील यांची मर्यादित ओळख होती का? केवळ याच कारणातून त्यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी होत आहे का? तर नक्कीच नाही. दि. बा. पाटील यांचं काम याहून कैक मोठं होतं.

तसं तर पनवेल, कुलाबा (सध्याचा रायगड जिल्हा) हा भाग म्हणजे दि. बा. पाटील यांचं जन्मस्थानचं. उरण तालुक्यातील जासईमध्ये १३ जानेवारी १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. हा सगळा पट्टा म्हणजे पहिल्या पासूनच शेतकरी कामगार पक्षाचा हक्काचा गड. त्यामुळे त्यांची पावलं देखील आपोआप शेतकरी प्रश्नाकडे आणि शेतकरी कामगार पक्षाकडे वळली.

दि. बा. यांचे वडिल देखील स्वतः शेतकरी होते, मात्र शिकलेले आणि पेशाने शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी आपल्याला मुलाला देखील शिक्षण दिलं, आणि दि. बा. पेशानं वकिल बनले. पण त्यांचं मन तिकडच्या पेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नात जास्त रमत असायचे. यातूनच त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढला आणि वयाच्या जेमतेम पंचवीस-सव्वीसीत ते पनवेलचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.

१९५२ साली दि. बा. पाटील आमदार नव्हते, मात्र तरी देखील त्यांचा लढा सुरू झाला तो हक्क्याच्या कुळकायद्यासाठी. खोती नष्ट करून कसणाऱ्या शेतकऱ्याच्या हक्काची जमीन त्याच्या नावावर व्हायला पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी होती. त्यामुळे कष्ट न करता ऐतखाऊपणा करणाऱ्या कुळांच्या विरुद्ध त्या वेळच्या कुलाबा जिल्ह्यात त्यांनी पहिला लढा उभा केला.

यानंतर आपली नगराध्यक्ष पदाची कारकीर्द गाजत असतानाचं लोकांनी त्यांना आमदार केलं. आमदार झाल्यानंतर तर त्यांच्या लढ्याची धार आणखी तीव्र झाली. कुळकायदा विधानसभेत मंजूर होताना, दि.बां.नी त्या कुळकायद्यातील पळवाटांवर विधानसभेत तब्बल साडेचार तास अखंडपणे मुद्देसूद भाषण करून सरकारला त्या दुरुस्त्या करण्यास भाग पाडले.

आजच्या महाराष्ट्रामधील महसूल कायदा, कुळकायदा, सातबाराच्या उताऱ्यात तलाठ्याचे अधिकार काढून घेण्याचा कायदा, गर्भजल परीक्षेला विरोध करणारा कायदा, सिडकोसाठी शेतकऱ्याच्या जमिनी घेण्याचा कायदा, एमआयडीसीसाठी शेतकऱ्याच्या जमिनी वर्ग करण्याचा कायदा या आणि अशा बहुसंख्य पुरोगामी कायद्यांमधील बदल घडू शकला तो ‘दि. बा.’ यांच्या अनेक उपसूचनांमुळेचं.

दि. बा. यांनी काही काळ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले. त्यावेळी सरकारशी कोणत्याही विषयात गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी तडजोड करण्याची भूमिका ‘दि. बा.’ यांनी कधीच स्वीकारली नाही. याचा एक ढळढळीत पुरावा म्हणजे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाचं एक वाक्य.

एकदा कोणत्या तरी विधेयकावर सभागृहात चर्चा होणार होती. तेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. तेव्हा ते अगदी सहज बोलता बोलता म्हणून गेले

‘अरे त्या डी.बी.ला आधी पटवून द्या; नाही तर विधानसभेत अवघड होईल.’

दि.बा पाटलांवर तिथल्या जनतेचं इतकं प्रेम होत की १९८४ साली जेव्हा संपूर्ण भारतात इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेसला सहानुभूतीची लाट पसरली होती तेव्हा दि.बा.पाटलांनी कुलाबा मतदारसंघातून काँग्रेसचा सपशेल पराभव केला होता. या निवडणुकीत अंतुलेंसारखा रायगडचा सुपुत्र देखील अपक्ष उभा राहिला होता पण जनतेने दि.बांच्या नावावरच शिक्का मारला.

आपल्या एकूण राजकीय कारकिर्दीमध्ये एकदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक, पाच वेळा विधानसभा, एकदा विधान परिषद, तर दोन वेळा लोकसभेची निवडणूक यामाध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अभ्यासूपणाने मांडले. त्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावरची आंदोलनेही केली. म्हणूनच ते खर्‍या अर्थाने लोकनेते झाले.

मात्र या सर्व राजकीय वाटचालीत यशाबरोबर त्यांना अनेकदा अपयशाचं तोंड देखील पहावं लागलं.

१९८९ साली काँग्रेस मध्ये परतलेल्या अंतुलेंनी त्यांचा लोकसभेला पराभव केला. तिथून पुढे अंतुलेंनी सलग तीन वेळा कुलाबा मतदारसंघात विजय मिळवला. शेकापने दि.बा पाटलांच्या ऐवजी दत्ता पाटलांना संधी देऊन पाहिली पण अंतुलेंचा पराभव करणे त्यांना देखील शक्य झाले नाही.

अखेर १९९८ साली अंतुलेंचा करिष्मा मोडून काढण्यासाठी शेकापने एका राजकारणा बाहेरचा उमेदवाराला तिकीट दिलं.

ते होते रामशेठ ठाकूर.

रामशेठ ठाकूर हे पनवेलचे मोठे बांधकाम व्यावसायिक. त्यांनी या पूर्वी कधी ग्रामपंचायतीची देखील निवडणूक लढवली नव्हती. पण अंतुलेंना हरवण्यासाठी असणारी सगळी रसद त्यांच्या पाठीशी होती. त्यामुळे दि.बा.पाटील, दत्ता पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेतेमंडळींना सोडून शेकापने कोरीपाटी असलेल्या रामशेठ ठाकूर यांना तिकीट दिल.

शेकापचा अंदाज खरा ठरला. ठाकूर यांनी अंतुलेंना ९ हजार मतांनी आस्मान दाखवलं. अंतुलेंना हरवणारा नेता म्हणून त्यांची दिल्लीपर्यंत हवा झाली. पुढे जेव्हा वाजपेयींवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला तेव्हा वाजपेयींना त्यांनी मत दिल नाही आणि ते अवघ्या १ मतांनी वाजपेयी पंतप्रधानपदावरून खाली आले.

आपल्या एका मतामुळे हिंदुत्ववादी सरकार पडलं याबद्दल रामशेठ ठाकूर अभिमानाने सांगायचे.

पुढे १९९९ साली जेव्हा लोकसभा निवडणुका आल्या तेव्हा शेकापने पुन्हा ठाकूर यांनाच तिकीट दिलं. रामशेठ ठाकूर यांच्याकडून पराभव होईल या भीतीने अंतुले औरंगाबाद मतदारसंघात निघून गेले. रामशेठ ठाकूर यांचा विजय एकतर्फी मानला जाऊ लागला.

मात्र पक्षाच्या या निर्णयामुळे शेकाप मधील काही जेष्ठ कार्यकर्ते नाराज होते. त्यांच्या आग्रहामुळे दि.बा.पाटलांनी शेकाप सोडली.

१९९९ साली त्यांनी आश्चर्यकारकरित्या शिवसेनेत प्रवेश केला. आयुष्यभर ज्यांच्याशी लढले त्या हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश केल्या मुळे दि.बा.पाटलांना त्यावेळी जहरी टीका सहन करावी लागली, पण हा निर्णय त्यांना तत्कालीन परिस्थितीनुसार नाईलाजाने आणि भविष्यकालीन विचार करून त्यांनी घेतला असल्याचं नेहमी सांगितलं.

पण त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढताना त्यांचा पराभव झाला.

यानंतरच्या काळात त्यांनी १ ते २ वर्षचं सक्रिय राजकारण केले, आणि तब्येतीच्या कारणास्तव निवृत्ती घेण्याचं धोरण स्वीकारलं. मात्र जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत उभे राहिले. अशा या उभं आयुष्य संघर्षात घालवलेल्या नेत्याचं २०१३ मध्ये निधन झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.