म्हणून राजनीकांतला मिळालेला पुरस्कार भाजपला फायद्याचा ठरू शकतो…

आज सकाळी-सकाळी सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबद्दलची घोषणा केली. त्यानंतर सगळ्या सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या थोरपणाबद्दल, त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुक करणाऱ्या पोस्टनी अक्षरशः धुरळा केला.

मात्र या धुरळ्यातच एक चर्चा दबक्या आवाजात लगेच सुरु झाली, आणि काही वेळातच त्या चर्चेने जोर धरला.

ही चर्चा होती रजनीकांत यांना पुरस्कार देताना साधलेल्या राजकीय टायमिंगची.

सध्या तामिळनाडूमध्ये निवडणुकीचं वार वाहत आहे. पुढच्या पाच दिवसांमध्येच म्हणजे ६ एप्रिल रोजी तिथं मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या या पुरस्काराकडे राजकीय अर्थानं पण बघितलं जात आहे. रजनीकांत यांच्या राजकीय ताकदीचा आणि त्यांच्या चाहत्यांमधल्या प्रभावाचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप सध्या भाजपवर सोशल मीडियामधून होऊ लागला आहे. 

त्यावर मंत्री जावडेकर यांनी लगेचच स्पष्टीकरण पण दिलं. ते म्हणाले, चित्रपट आणि राजकारणाला एकत्र जोडून बघायला नको. या पुरस्कारासाठी पाच सदस्यीय टीमने रजनीकांत यांची निवड केली असून यात आशा भोसले, सुभाष घई, मोहनलाल, शंकर महादेवन आणि बिस्वजीत चटर्जी यांचा समावेश होता. कोरोनाच्या महामारीच्या कारणामुळे तो घोषित करण्यासाठी वेळ झाला.

मात्र अजूनही या राजकीय टायमिंगची चर्चा थांबताना दिसतं नाही. त्यामुळे खरचं या पुरस्काराचा भाजपला तामिळनाडूमध्ये काही राजकीय फायदा होऊ शकतो का? हे पाहणं गरजेचं आहे. 

रजनीकांत राजकीय दृष्ट्या सध्या किती सक्रिय आहे? 

२०१७ साली रजनीकांतने आपण राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. पण त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२० मध्ये त्यानं सांगितलं की, डॉक्टरांनी आरोग्याच्या कारणावरून आपल्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे आपण सध्या राजकारणातून बाहेर पडत आहे.

मात्र त्यानंतर १ ते २ दिवसांमध्येच भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी तामिळनाडूमध्ये राजनीकांतची भेट घेतली, तिथून पुढच्या १५ दिवसांमध्येच रजनीकांतने सगळ्यांनाच आश्चर्यचकित करतं डिसेंबर २०२० पर्यंत नवीन राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचं घोषित केलं. 

त्यानंतर या निर्णयावर रजनीकांतने पुन्हा एकदा युटर्न घेतला आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घोषित केलं की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी माझा पक्ष स्थापन करणार नाही. त्यावेळी रजनीकांतला एका चित्रपट शूटिंगवेळी तब्येत बिघडल्यामुळे हैदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.

यावर भाजप- अन्ना द्रमुकची भूमिका काय होती?

रजनीकांतच्या या निर्णयाचा त्यावेळी सगळ्यात मोठा झटका भाजपला बसला असल्याचं सांगण्यात आलं. त्याच कारण त्या निर्णयाच्या काही दिवस आधीच राज्यात निवडणुकीत युती करण्याच्या अनुषंगानं राजनीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

भाजपकडून देखील याला तेवढाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. कारण पक्षाकडे राज्यातील प्रसिद्ध असा एकही चेहरा नव्हता. जसं अन्ना द्रमुककडे दिवंगत एमजीआर, जयललिता, तर द्रमुककडे दिवंगत करुणानिधी यांचा चेहरा होता. त्यामुळे त्यावेळी भाजप रजनीकांत यांना अगदी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पण घोषित करण्यास तयार असल्याचं बातम्या येत होत्या.   

रजनीकांत यांच्या निर्णयावर भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवि यांना प्रश्न विचारण्यात आला होता कि, आता त्यांचा पक्ष राजनीकांत यांना समर्थन मागणार का? त्यावर नक्कीच. मला आशा आहे आम्ही नक्की मदत मागू. मोदीजी आणि रजनीकांत यांचे जवळचे संबंध सगळ्यांनाच माहित आहे.

त्यावेळी अन्नाद्रमुक देखील तिथं उपस्थित होते. त्यांनी म्हंटल होतं कि, आपला पक्ष न बनवण्याच्या परिस्थितीमध्ये रजनीकांत आमच्या नेतृत्वात बनलेल्या युतीचं समर्थन नक्की करतील.

तामिळनाडूचे फ्रंटलाईन वृत्तपत्राचे सहयोगी संपादक यांनी त्यावेळी एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना भाजपच्या रणनीती विषयी सांगितलं होतं कि,

भाजपची रजनीकांत यांच्या माध्यमातून रणनीती होती की, द्रमुकचे मत कमी करायची. जर २०१६ मधील मतांची टक्केवारी बघितली तर अद्रमुक आणि द्रमुक मधील तो फरक केवळ १ टक्क्यांचा होता.

त्यामुळे रजनीकांतच्या प्रसिद्धीचा वापर करून जो द्रमुकचा पारंपरिक मतदार नाही त्याला अद्रमुक आणि भाजपकडे वळवायचं. आणि द्रमुकची मत कमी करायची.

सध्या रजनीकांत यांची भूमिका काय आहे? 

रजनीकांत यांनी त्यानंतर कोणत्याही पक्षाला उघड समर्थन दिलेलं नाही. मात्र २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं रजनीकांतनं भाजपला आपला छुपा पाठिंबा दिला होता अगदी त्याच प्रमाणे यंदाच्या निवडणुकीमध्ये देखील रजनीकांतचा भाजप-अद्रमुक युतीला छुपा पाठिंबा बोललं जात.

त्याची कारण म्हणजे रजनीकांतने मागच्या काही दिवसांमध्ये भाजपच्या विविध धोरणांना दिलेला जाहीर पाठिंबा. 

रजनीकांतने मागच्या काही दिवसात, भाजपच्या नदीजोड प्रकल्प, नोटबंदी, नागरिकत्व दुरुस्ती कायदा अशा मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे. तसचं काश्मीरचा प्रश्न मुत्सदेगिरीनं हाताळला असल्याचं सांगितलं. एवढ्यावरच न थांबता रजनीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तुलना महाभारतातील कृष्ण-अर्जुन जोडीशी केली होती.

रजनीकांत यांची राजकीय ताकद आणि प्रभाव किती आहे? 

रजनीकांत समर्थकांनी तयार केलेल्या रजनी मक्कल मण्ड्राम या असोसिएशनच्या संपूर्ण तामिळनाडूमध्ये जवळपास ६५ हजार शाखा आहेत. यात जवळपास ९० लाखांपेक्षा जास्त सदस्य संख्या आहे. याच शाखांच्या जोरावर रजनीने राजकीय पक्षाचा निर्णय घेतला होता.

रजनीकांत यांचा राजकीय प्रभाव आहे का? तर आहे.

१९९६ च्या निवडणुकांमध्ये रजनीकांतने जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर द्रमुकला जाहीर पाठिंबा दिला होता.

रजनीकांत त्यावेळी प्रत्यक्षात प्रचारात उतरले नव्हते, पण पडद्यामागून मात्र ते प्रचंड सक्रिय झाले होते. त्यावेळी त्यांनी आपला ‘बाशा’ हा बहुचर्चित सिनेमा निवडणुकांच्या तोंडावर रिलीज केला. याच दरम्यान त्यांनी जयललितांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं. ते म्हणाले, 

जर तामिळनाडूच्या जनतेने पुन्हा जयललितांच्या हातात सत्ता दिली तर देव पण तामिळनाडूला वाचवू शकणार नाही. 

रजनीकांत यांचं ते वाक्य म्हणजे डीएमकेसाठी टॅगलाईन बनली, प्रत्येक सभेत आणि प्रत्येक नेत्याच्या तोंडात ‘…तर देव पण तामिळनाडूला वाचवू शकणार नाही’ हे एकच वाक्य होतं. डीएमकेनं आपला सगळा प्रचार या एका वाक्याभोवती केंद्रित केला होता.

जेव्हा निवडणूक पार पडली, निकाल लागला तेव्हा १९९१ जो पराभव डीएमकेला बघावा लागला होता, त्याहून वाईट पराभव १९९६ ला जयललिता आणि त्यांच्या पक्षाला पाहायला लागला होता. लोकसभेत ३९ जागांवर पराभव स्वीकारावा लागला, विधानसभेत तर डीएमकेने २२१ पैकी तब्बल २१९ जागा जिंकल्या. जयललिता स्वतः ‘बरगुर’ जागेवरून निवडणूक हरल्या.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.