दापोडीतून तयार झालेली लालपरी ६२ च्या युद्धात सैनिकांच्या मदतीला धावली होती..

आयुष्यातला १३ व्या काही गोष्टी पुजल्या जातात. म्हणजे माणूस कसाही असो आणि कोणीही असो. अगदी राजकारणातला मात्तब्बर असो पण स्टंटसाठी का होईना त्याला एस्टीचा प्रवास करावा लागतो. बाकी आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यात “एस्टीचा प्रवास उत्तम प्रवास” हे सटवाईनं लिहलेलच असतंय.

असो पण मुद्दा आहे तो ही लाडकी लालपरी कुठे तयार होतं असेल…? 

बोलभिडूच्या माध्यमातून हीच गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात एस्टीच्या तीन फॅक्टरी अर्थात वर्कशॉप्स आहेत. एक औरंगाबादच्या चिखलठाण्यात दूसरी नागपूरचं हिंगणा आणि तिसरं पुण्यातील दापोडी.

यातलं दापोडी वर्कशॉप हे आशिया खंडातलं सर्वात जूनं आणि सर्वात मोठ्ठं वर्कशॉप म्हणून ओळखलं जातं. यालाच सेंट्रल वर्कशॉप दापोडी किंवा CWD या नावाने देखील ओळखलं जातं.  बस बॉडी बिल्डिंग अर्थात बस च्या बॉडी ची बांधणी करण्याचं, जून्या बसेसची रिकन्डीशनिंग करण्याच, रिबॉडी उभारण्याच, टायर रिमोल्‍डिंग करण्याच, इंजिन रिकन्डिशनींग करण्याचं अशी अनेक कामे इथे केली जातात.

एका वर्षात किमान १ हजार बसेसची निर्मीती इथं केली जात असल्याचं सांगितलं जातं. इतक्या बसेस करूनही आमच्या गावाला वेळेत बस येत नाही अशी टिमकी मात्र इथे वाजवू नये. तर साधारण २००० बसेसची पुर्णबांधणी देखील इथे केली जाते.

असा आहे दापोडी वर्कशॉपचा इतिहास…

भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतरच्या एक वर्षातच म्हणजे १९४८ ला प्रवासी वहातूक व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. याच काळात बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्टची स्थापना करण्यात आली. १ जून १९४८ साली एकूण ३५ बसेसच्या माध्यमातून हा प्रवास सुरू करण्यात आला होता. महाराष्ट्रात पहिली बस धावली होती ती पुणे-अहमदनगर या मार्गावरून.

बस आणि बसफेऱ्यात वाढ होवू लागली तशी नव्या बसेसची निर्मीती, बॉडी तयार करण्याची गरज व त्याचसोबत जून्या बसमध्ये दूरुस्तीची गरज भासू लागली. तेव्हा बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्टने आपले पहिले वर्कशॉप १९४९ साली मुंबईच्या सांताक्रुझ येथे सुरू केले.

सुरुवातीच्या काळात इंग्लंड आणि जर्मनी वरून आयात केलेल्या रिलँड, मॉरीस, टॉच, अलेबिअन या कंपनीच्या बसेसची असेंब्ली या वर्कशॉपमध्ये केली जात होती. नंतर हे वर्कशॉप अपूर पडू लागल्याने बॉम्बे स्टेट ट्रांसपोर्टने दापोडीच्या सेंट्रल वर्कशॉपची स्थापना केली.

१९५१ साली पवना नदीच्या काठावर दापोडीचे वर्कशॉप सुरू झाले.

कालांतराने बॉम्बे स्टेट ट्रांसपोर्टचा कारभार वाढू लागला, आणि दापोडीच्या वर्कशॉपवर त्याचा अतिरिक्त भार पडायला लागला.

त्यावेळी म्हणजे १९६० च्या पूर्वी मुंबई राज्य अस्तित्वात होते. बॉम्बे स्टेट ट्रांसपोर्टचा कारभार गुजरातच्या अहमदाबादपासून कर्नाटकच्या हुबळी पर्यंत होता. त्यावेळी दापोडीचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी १९५५ साली बॉम्बे स्टेट ट्रांसपोर्टने अहमदाबाद आणि हुबळी येथे रिजनल वर्कशॉप उभे केले.

त्यानंतर मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि १९६० सालापर्यंत कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्य अस्तित्वात आली. याच काळात बॉम्बे स्टेट ट्रांसपोर्टचे अस्तित्व संपुष्टात आले, कारण ३००० बसेससह अहमदाबाद रिजनल वर्कशॉप गुजरात ट्रांसपोर्टच्या आणि हुबळी रिजनल वर्कशॉप कर्नाटक ट्रांसपोर्टच्या वाट्याला आलं.

आणि महाराष्ट्राच्या वाट्याला राहिल्या अवघ्या २००० बसेस आणि दापोडीचं एक वर्कशॉप.

यानंतर १९६० च्या नंतरचा काळ एसटी महामंडळ आणि दापोडी वर्कशॉपसाठी आव्हानात्मक होता. कारण महामंडळाला आपले जाळे नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवायचे होते. याला तब्बल १० वर्ष लागली. या दरम्यान दापोडीच्या वर्कशॉपनं महत्त्वाची भूमिका बजावली.  २,००० बसेसचा असलेला ताफा त्यांनी १० वर्षात ५८०० बसेस म्हणजे जवळपास तिप्पट केला.

जेव्हा दापोडीच्या वर्कशॉपनं बसच्या बॉडी बिल्डिंगला सुरूवात केली होती तेव्हा बसेसची रूंदी ६ फूट ६ इंच बांधण्याची परवानगी असे. त्यामुळे बसची आसन व्यवस्था उजव्या बाजूला 3 सीट्स, आणि डाव्या बाजूला लांबचलांब खिडकीच्या विरूद्ध दिशेला असे.

मात्र लांबच्या प्रवासासाठी अशा बसेस ़डोकेदुखीच्या कारण ठरायच्या. पुढे १९५८ साली मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि बसेसची रुंदी ८ फुटांपर्यन्त वाढवण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर ३ बाय २ अशी आसनव्यवस्था निर्माण करण्यात आली. दापोडीच्या वर्कशॉपमधून अशी बस बाहेर पडली ती पुढे कायम झाली.

पुढे १९६२ साली मर्सडीज बेंन्झच्या बसमध्ये बदल करून सिटींग अरेजमेंट ५० पर्यन्त वाढवण्यात आली. आपात्कालीन खिडक्यांची बांधणी करण्यात आली. हे काम इतकं प्रभावी ठरू लागली की १९६२ च्या युद्धात या वर्कशॉपने भारतीय सैन्याला बसेस पुरवल्या होत्या.

१९६८ साली महामंडळाने रातराणी सेवा सुरू केली. यासाठी रात्रीच्या प्रवासाची कम्फर्ट प्राधान्याने ठरवण्यात आला. त्यासाठी २ बाय २ सिटींग अरेजमेंट आणण्यात आली. खिडक्यांमध्ये बदल करून फुल्ली ड्रॉप डाऊन विंडोजची सिस्टीम उभारण्यात आली. १९७० साली दापोडी वर्कशॉपमधून पुर्णपणे AC बस बाहेर पडली. त्यासाठी लक्झरी हेतूकडे लक्ष देण्यात आली. १९७३ साली बसची सीटींग कॅपॅसीटी वाढविण्यासाठी जून्या बसवर बॉडी बिल्डिंग करून सीटींग कॅपॅसीटी ५० वरून ६० वर आणण्यात आली.

तेव्हा बसचा दरवाजा मागून पुढे बसवण्यात आला… 

१९७४ साली दापोडी वर्कशॉपने प्रायोगिक तत्त्वावर दोन स्लिपर कोचची निर्मिती केली. स्लिपर कमी सीटर कॅटेगरीच्या या बस त्यावेळी मुंबई-गोवा आणि मुंबई-कोल्हापूर या मार्गावर धावायच्या.

७० च्या दशकात दापोडी वर्कशॉपन आणखी एक कामगिरी केली ती म्हणजे डबल डेकर बस. त्यावेळी नाशिक शहरात याला खूप पसंती मिळाली.

यानंतर दापोडी वर्कशॉपन आपल्या बस बॉडी बिल्डिंगमध्ये अनेक सुधारणा केल्या आणि त्याकाळात बस बॉडी बिल्डिंग क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकावले.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे एशियाड बस.

दापोडी वर्कशॉपच्या कामाची कुशलता पाहता १९८२ साली दिल्लीत होणाऱ्या एशिया गेम्ससाठी तब्बल २०० बसेस बांधण्याच काम दापोडी वर्कशॉपला मिळालं. या बसेस इतक्या भारी होत्या की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः या बसेसचे कौतुक केले. एशिया गेम्स संपल्यानंतर २०० पैकी ५० बस महामंडळाला परत मिळाल्या.

दादर-पुणे मार्गावर एशियाड या ब्रँड नेम नावानं हिट झाल्या.

यापुढे आणखी एक पाऊल टाकत १९८५ साली दापोडीनं डबल डेकर बसेसची देखील निर्मिती केली. या ठाणे-भिवंडी आणि तुळजापूर-सोलापूर या मार्गावर यांना चांगला प्रतिसाद मिळाला. १९९० ला सुरू झालेल्या सुपर डिलक्स बसेसने तर दापोडीची मान उंचावली. आजसुद्धा जूणाजाणता प्रवास वर्ग या बसेसचे नाव काढतो.

मात्र, ९० च्या दशकात एसटीला टक्कर देण्यासाठी खाजगी वाहतूकदार देखील उतरले. आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काळाबरोबर चालणार आवश्यक होत. सहाजिकच या काळात एसटीला लक्झरी बसेस बाहेरून विकत घ्याव्या लागल्या.

सुरुवातीला एअर बसेस आणि नंतर शिवनेरी सुरू केली. खाजगी बसेस पुढे हार व मानता दापोडीनं त्यांना तोडीसतोड नवनवीन प्रयोग करत बसेसची निर्मिती केली.

दापोडी वर्कशॉपनं पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर यांना सीटी बस देखील बांधून दिल्या. यासोबतच राज्य शासनाची विविध खाती आणि महाविद्यालयांना देखील दापोडी वर्कशॉपनं बसेस तयार करून दिल्या.

त्यानंतर २००६ साली एसटी बसमध्ये परिवर्तन बसच्या रूपाने परिवर्तन झाले. सुरुवातीला ३×२ असणाऱ्या बसेस २×२ करण्यात आल्या. ज्यामुळे त्या अधिक आरामदायी झाल्या. परिवर्तन नंतर दापोडीनं आणल्या वारी बसेस ज्याला रेल्वेचा डब्बा असही म्हणतात. कारण या लांबच लांब बसची सीटींग कॅपॅसीटी होती ६५ सीट्स. त्यात त्यांच्या अनोख्या रंगामुळे त्या आर्कषक वाटायच्या.

२०१० नंतर वर्कशॉपनं पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या बस स्वतः न बांधता, त्यात काम एसीजील या खाजगी कंपनीकडून बांधून घेतल्या. या बाहेरून जरी बांधून घेतल्या, तरी त्याची बांधणी एसटी वर्कशॉप सारखी होती.

२०१४ पर्यंत एसटी वर्कशॉपनं फक्त परिवर्तन बसेसची निर्मिती केली, मात्र २०१५ पासून एसटी वर्कशॉपनं पुन्हा कंबर कसली. यात काळात हिरकणी, स्कूल बसेस आणि २०१५ सालच्या नाशिक कुंभमेळ्यासाठी विशेष बस अशा एकूण १००० बसेसची निर्मिती केली. विशेष बाब म्हणजे हिरकणी बसेसची ओळख असणारा हिरवा आणि पांढरा हा पारंपरिक रंग दिला आणि पुशबॅक सीट्स लावल्या.

२०१६ साली एसटी महामंडळात आयसर कंपनीच्या बसेसच आगमन झाले त्याआधी महामंडळाच टाटा आणि लेलँडची चालायची. दापोडीचा प्रयोग यशस्वी झाल्यावर नागपूर आणि औरंगाबाद येथील वर्कशॉपनं देखील या कंपनीच्या मदतीने बस बांधणी केली.

२०१७ हे वर्षे टर्निंग पॉइंट ठरले आणि शिवशाही बसेस सुरू झाल्या. आणि सोबतच पारंपरिक ॲल्युमिनियम बसचं रूपांतर एमएसमध्ये करण्यात आलं. या बसेस अपघाताच्या दृष्टीने अधिक मजबूत होत्या. ( म्हणूनच शिवशाहीचे ड्रायव्हर हा प्रयोग करून बघायचे)

टप्प्याटप्प्याने यात सुधारणा करण्यात आली. यात बसचा फ्रंट शो, फ्रेमलेस विंडोज, रंगरंग, आरामदायी २×२ सिटींग आणि सेफ्टीवर भर दिला गेला. यातच स्लीपर कोचचा देखील वापर केला गेला. त्यात ‘विठाई’ या ब्रँड नेमने देखील आगमन केले आहे.

अशा पद्धतीने ७० वर्षापेक्षा जास्त काळापासून दापोडी वर्कशॉपनं रोमांचकारी प्रवास केला. कित्येक तरूणांना या वर्कशॉपनं रोजगार उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे याला एसटीचा ऐतिहासिक वारसा म्हणायचा काही हरकत नाही.

माहिती संदर्भ : BusforUs Foundation

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.