गुन्हेगारांशी लढणाऱ्या पोलिसांना विमा संरक्षण मिळालंय ते फक्त दत्ताजी नलावडे यांच्यामुळं..

गणेशोत्सव, शिवजयंती, ईद अथवा कोणताही सण समारंभ.

संपूर्ण जग उत्साहात जल्लोषात ते साजरा करण्यात मग्न असते आणि आपले पोलीस दल मात्र ऊनवारा पावसाचा विचार न करता आपल्या ड्युटीवर तैनात असतो.  सण असो, महापूर असो अथवा सध्या सुरु असलेला कोरोनाची महामारी. आपल्या वर्दीशी इमान राखत ते प्रत्येक संकटाशी सामना करत असतात.

पोलीस दलावर प्रचंड ताण आहे, याची सगळ्यांनाच जाणीव असते. आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस दलातील कॉन्स्टेबल पासून मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण या तणावातून जात असतो. नागरिकांच्या जीवाची, त्यांच्या मालमत्तेची जबाबदारी पोलीस दलावरती असते. कधी बॉम्बस्फोट तर कधी दंगल तर कधी नक्षलवादी हल्ला अशा अनेक गोष्टींना त्यांना सामना करावा लागतो.

मात्र इतकं असलं तरी त्यामानाने पोलीस दलाला इतक्या सुविधा नसतात. त्यांना दिलेल्या बंदुका देखील जुन्या पद्धतीच्या असतात. अत्यंत असुविधा असूनही पोलीस सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणेच पोलीस दल देखील आपले जीव पणाला लावून रोजची लढाई लढत असतो.

काही वर्षांपूर्वी पर्यंत तर पोलीस दलाला विमा संरक्षण देखील नव्हतं.

हे विमा संरक्षण मिळालं विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांच्यामुळे..

दत्ताजी नलावडे म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून म्हणजे १९६७ पासून ते सैनिक म्हणून पक्षात दाखल झाले. ते मोठे कबड्डीपटू होते. गोवा मुक्ती संग्रामात, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या बाळासाहेबांकडे ते तरुण वयातच आकर्षित झाले.

गिरणी कामगारांच्या प्रश्नापासून ते रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत ते प्रत्येक ठिकाणी आघाडीवर राहिले.

१९६८ साली त्यांनी पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक  लढवली आणि जिंकली. तिथून पुढे ते सतत निवडणूक जिंकत राहिले. सेनेच्या कठीण प्रसंगी देखील दत्ताजी नलावडे यांनी निवडणूक हरली नाही. त्यांना शिवसेनाप्रमुखानी मुंबईचा महापौर होण्याची देखील संधी दिली. तिथल्या कार्यकाळात देखील त्यांनी आपली छाप सोडली.

वरळी विधानसभा मतदारसंघातून १९९० साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यावर्षी पहिल्यांदाच सेनेचे चाळीस बेचाळीस आमदार निवडून आले होते. छगन भुजबळ, मनोहर जोशी आणि दत्ताजी नलावडे हे सेनेचे जेष्ठ नेते विधिमंडळ सभागृहात बाळासाहेबां चा आवाज बुलंद करत होते.

नव्वदच्या दशकात मुंबईत गॅंग वॉर त्याच्या भरात होता. दाऊद सारखे अंडरवर्ल्ड डॉन मुंबईची कायदा व सुव्यवस्था वेठीस धरत होते. दिवसाढवळ्या खुनाच्या सर्रास केसेस समोर येत होत्या. यांना यावर घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी देखील कडक धोरण अवलंबले. बुलेट फॉर बुलेट चा नारा देणारे ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱयांनी पोलिसांना मोकळीक दिली. एका पाठोपाठ एक एन्काउंटर करण्यात येऊ लागले.

मात्र मुंबई अंडरवर्ल्डच्या टोळ्या एके ४७ सारख्या बंदुकांनी सज्ज होत्या आणि पोलिसांना त्यांच्याशी साध्या बंदुकांनी लढावं लागत होतं. या लढाईत अनेक पोलिसांना प्राण देखील गमवावे लागत होते, कित्येकजण जायबंदी होत होते. अशा परिस्थितीत पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना विमा संरक्षणाचे कवच हवे हि दत्ताजी नलावडे यांच्या मनात आलं.

त्यांनी हा प्रश्न विधानसभेत उठवला.

१७ जुलै १९९० तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे तसे निवेदन देण्यात आले. त्यानंतर सातत्याने तारांकित प्रश्न, चर्चा, कपात सूचना याच्या आधारे हा प्रश्न लावून धरला.  त्याकाळी शिवसेनेची विधानसभेतील बळ खूप मोठं नव्हतं. पण दत्ताजी नलावडे यांनी कोणताही आक्राळस्तेपणा न करता संयमाने आणि संसदीय आयुधांचा वापर करत हि लढाई सुरु ठेवली.

अखेर शरद पवारांनी ही मागणी मान्य केली. देशाच्या स्वातंत्र्याच्या चाळीस वर्षानंतर पोलिसांना विमा संरक्षण मिळाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.