त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय निवडणुकीच्या फंद्यात कधीच पडले नाहीत.

देशाचे पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्ष हे ज्या कोणत्या मोठ्या व्यक्तींना आपले आदर्श मानतात त्यापैकी अग्रस्थानी असलेलं नावं म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. पंतप्रधान मोदी आपल्या अनेक भाषणांमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख करत असतात. आज भाजपचा जन्म ज्या जनसंघातून झाला त्या पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी विचार मानणारे नेते म्हणून देखील त्यांना ओळखलं जात.

१९५३ साली जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या गूढ मृत्यू नंतर संघटनेची सगळी जबाबदारी दीनदयाळ उपाध्याय यांच्या खांद्यावर आली. जेव्हा ते संघटनेचे महामंत्री झाले तेव्हा जनसंघाच्या लोकसभेत केवळ २ जागा होत्या, तर त्याचवेळी कम्युनिस्ट आणि इतर पक्ष काँग्रेस समोर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर होते.

पण कोणताही गाजावाजा न करता पुढच्या काही वर्षातच त्यांनी संघटनेला अगदी तळागाळातून मजबूत केलं, आणि १९६७ च्या निवडणुकीत जनसंघाला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आणलं होतं.

संपूर्ण देशात स्वतःच्या पक्षाला मजबूत करणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय यांनी मात्र आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात एकमेव निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा प्रचार अगदी अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी यांनी केला होता, पण प्रचार चालू असतानाच त्यांनी स्वतःला पराभूत म्हणून जाहीर केलं होतं.  

१९६२ साली देशात तिसऱ्या लोकसभेसाठी निवडणूका पार पडल्या. मात्र १ वर्षाच्या आताच काही जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती, यात प्रामुख्याने अमरोहा, फारुखाबाद, जौनपुर, राजकोट अशा जागांचा समावेश होता.

यातीलच जौनपुरमधून जागेवरून उपाध्याय यांना पहिल्यांदाच निडवणुकीच्या मैदानात उतरवले होते, संघटनेच्या कामाला महत्व देणारे उपाध्याय हे निडवणूक लढवण्यास जास्त इच्छुक नव्हते पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते भाऊराव देवरस यांच्या आदेशामुळे त्यांना निवडणूक लढवायला लागली होती. 

दीनदयाळ उपाध्याय यांना देशातील दिग्गज नेता म्हणून ओळखलं जात असल्यामुळे ते जौनपुरमधून अगदी सहजच निवडून येतील असं सर्वांनाच वाटत होतं. त्याच दुसरं देखील कारण होतं, ते म्हणजे १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत या जागेवरून जनसंघाचेच ब्रह्मजीत सिंह निवडून गेले होते. मात्र त्यांच्या निधनामुळे इथं पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

ब्रम्हजीत यांच्यामुळे आपल्याला जौनपुरमध्ये चांगला जनाधार आहे, याचा उपाध्याय यांना फायदाच होईल असं देवरस आणि इतर नेत्यांना वाटत होतं.

तिकडे उपाध्याय यांच्या विरोधात काँग्रेसने आपले तगडे स्थानिक नेते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय असलेले राजदेव सिंह यांना मैदानात उतरवलं होतं. काही ही करून ही निवडणूक जिंकायची हा चंगच काँग्रेसने बांधला होता. राजदेव यांच युवकांच्यात देखील क्रांतिकारी नेता म्हणून मोठं नाव होतं. 

जेव्हा प्रचाराची सुरुवात झाली तेव्हा दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रचारासाठी त्यावेळचे जनसंघाचे पाहिल्या फळीतील नेते असलेले अटलबिहारी वाजपेयी हे महिनाभर जौनपुरमध्ये मुक्कमी होते, तर मुरली मनोहर जोशी यांनी उपाध्याय यांच्या कार्यालय प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच जौनपुरचे महाराज यादवेंद्र दत्त यांच्यासोबत अनेक नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. 

मात्र या सगळ्यांच्या प्रयत्नानंतर देखील पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

त्या प्रसंगानंतरच उपाध्याय यांनी प्रचारा दरम्यान आपला पराभव जाहीर केला होता… 

या पोटनिवडणुकीत दीनदयाळ यांच्या पराभवाची अनेक कारण सांगितली गेली, त्यापैकी पाहिलं कारण म्हणजे जातीय ध्रुवीकरण. जौनपुर भागात काँग्रेसने राजपूत मतदारांना आकर्षित करण्यासाठीच राजदेव सिंह यांना मैदानात उतरवलं होतं, असं सांगितलं गेलं.

याला उत्तर देण्यासाठी जनसंघाच्या स्थानिक नेत्यांनी ब्राम्हण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला, पण या गोष्टीला स्वतः उपाध्याय यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यांनी या प्रकारची निंदा करत जातीच्या आधारवर मत मागायची नाहीत असं स्पष्टपणे ठणकावलं होतं.

दुसरं कारण सगळ्यात महत्वाचं कारण सांगितलं गेलं. ते म्हणजे,

जेव्हा पंडित दीनदयाळ आणि त्यांचे समर्थक शहरात प्रचार करत होते. त्यावेळी ओलंदगंज मोहल्यामध्ये रस्त्याच्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार राजदेवसिंग तिथल्या काही रिक्षावाल्यांशी चर्चा करत होते. 

त्याआधी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राजदेव सिंह यांना बघितलं नव्हतं. सोबत असलेल्या यादवेंद्र दत्त यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, हेच आपल्या विरोधात निवडणूक लढवत असलेले राजदेव सिंह आहेत.

त्याच वेळी उपाध्याय म्हणाले,

यादवेंद्रजी मी हि निवडणूक इथंच हरलो आहे, ज्या ठिकाणी आपला प्रतिस्पर्धी इतका लोकप्रिय आहे त्या ठिकाणी दुसरं कोण निवडून येईल, असं मला वाटत नाही. 

सोबतच जनसंघाने चीन विरुद्ध झालेला पराभव हा प्रचाराचा महत्वाचा मुद्धा बनवत, केंद्रावर टीका करायला सुरुवात केली होती. त्या विरुद्ध काँग्रेसने प्रचार स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित ठेवला होता. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर बाहेरील उमेदवार म्हणून देखील टीका झाली. लोकल हिरो म्हणून राजदेव यांना निवडून देण्याच आवाहन केलं गेलं.

पंडित दीनदयाळ उपाध्यय यांनी स्वतः आपल्या ‘पॉलीटिकल डायरी’मध्ये या सगळ्याबद्दल लिहून ठेवलं आहे. ते म्हणतात,

जनसंघाला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला त्याच कारण जनतेचा आम्हाला पाठिंबा नव्हता असं म्हणता येणार नाही, उलट आम्हीच काँग्रेसच्या निवडणूक प्रचारातील विविध तंत्रांच उत्तर देऊ शकलो नाही. 

त्यानंतरच्या काळात उपाध्याय यांनी दुसरी कोणतीही निवडणूक लढवली नाही. तर राजदेवसिंह यांनी मात्र १९६७ आणि १९७१ साली याच जागेवरून निवडणूक जिंकत विजयाची हॅट्रिक केली होती. 

जौनपुरसोबतच झालेल्या इतर ठिकाणच्या पोटनिवडणुकांपैकी, अमरोहामधून जेपी कृपलानी, फारुखहाबाद मधून डॉ लोहिया, आणि राजकोट मधून मीनू मसानी निवडून आले होते.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.