देगलूरच्या निवडणुकीत वंचित किंगमेकर ठरणार !
सध्या राज्यात ‘सीट कुणाचं लागलं?’ हा प्रश्न फक्त एकाच इलेक्शनमुळं विचारला जातोय. ते म्हणजे देगलूरची पोटनिवडणूक. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाच्या संसर्गामुळं निधन झालं. त्यामुळं रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक लागली.
या जागेसाठी काँग्रेसनं रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना उमदेवारी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत बंडखोरी झाली आमो माजी आमदार सुभाष साबणे भाजपच्या तिकीटावर उभे राहिले. दुहेरी सामना रंगणार असं वाटत असतानाच वंचित बहुजन आघाडीनं डॉ. उत्तम इंगोले यांना तिकीट दिलं आणि ही लढत तिहेरी होणार हे नक्की झालं.
देगलूर मतदारसंघ कधी तयार झाला?
lलोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना २००९ मध्ये झाली. त्यावेळी देगलूर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. आतापर्यंत पार पडलेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर दोनदा, माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे एकदा विजयी झालेत.
निवडणूक २००९- आमदार रावसाहेब अंतापूरकर
पहिल्या निवडणुकीत रावसाहेब अतापूरकर यांचा विजय झाला. त्यांनी सुभाष साबणेंना पराभूत केलं. अंतापूरकर यांना ६४ हजार ४०९, तर साबणेंना ५८ हजार ३९८ मतं मिळाली.
निवडणूक २०१४- आमदार सुभाष साबणे
या निवडणुकीवेळी सर्व पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले. युती आणि आघाडी नसल्यानं सुभाष साबणे यांना अप्पर हँड मिळाला. साबणेंना ६६ हजार ५८२ मतं पडली, तर अंतापूरकर यांना ५८ हजार २०४ मतांवर समाधान मानावं लागलं.
निवडणूक २०१९ – आमदार रावसाहेब अंतापूरकर
हा सामना एक एक असा बरोबरीत असताना २०१९ मध्ये अंतापूरकर यांची सरशी झाली. राज्यात सेना-भाजप युतीची लाट असताना अंतापूरकर यांनी मुसंडी मारत ८९ हजार ४०७ मतं मिळवली. साबणे यांना ६६ हजार ९७४ मतं पडली.
जुनं राज्य, नवा गडी?
सुभाष साबणे एक टर्म आमदार राहिलेले आहेत, तर जितेश अंतापूरकर आणि उत्तम इंगोले यांना पहिल्यांदाच विधानसभेत जाण्याची संधी आहे. त्यामुळे साबणे आपला मतदारसंघ राखतात की जितेश किंवा इंगोले यांच्या रूपात देगलूरला नवा आमदार मिळतो हे पाहावं लागेल.
वंचित किंग की किंगमेकर?
सुरुवातीपासूनच या पोटनिवडणुकीकडे भाजप विरुद्ध काँग्रेस असं पाहिलं जात होतं. मात्र वंचित बहुजन आघाडीनं इंगोले यांचा जनसंपर्क पाहता त्यांना मैदानात उतरवलं. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वंचितनं चांगलाच जोर लावला. वंचितचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळंही वातावरण चांगलंच तापलं. त्यामुळं वंचितनंही चांगलीच दावेदारी सिद्ध केली आहे.
आता वंचित आपला उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरतंय? की त्यांच्या पारड्यात गेलेली मतं समोरच्या पक्षाला धक्का देणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मतपेटीतून बाहेर आली की मगच मिळणार!
हे ही वाच भिडू:
- शिवसैनिकाला हाताशी धरत फडणवीस महाविकास आघाडीचा पुन्हा करेक्ट कार्यक्रम करणार?
- महाविकास आघाडी आणि फडणवीसांच्या वादात नायगाव पोलीस लाईनीचा प्रश्न लोंबकळत पडलाय?
- पृथ्वीराज चव्हाणांमुळे मागच्या वेळी रजनी पाटील बिनविरोध राज्यसभा खासदार बनल्या होत्या..