खायला चांगलं भेटतंय म्हणून दिल्लीत बेरोजगार तरूण गुन्हा करून जेलमध्ये चाललेत!

बेरोजगार तरूण पोरांच्या गरजा लई मोठ्या नसतात. बेरोजगार असतांना फुकटात खायला चांगलं भेटत असेल. महिन्याचं भाडं न देता राहायला चांगली जागा मिळत असेल. अंंघोळीला गरम पाणी भेटत असेल. काही काम न करता सगळं बसल्या जागेवर मिळत असेल तर आपल्या सारख्या तरूण बेरोजगार पोट्ट्यांना भरून पावल्यासारखं आहे.

भिडूंनो हे सगळं दिल्लीतल्या बेरोजगार तरूणांना भेटतयं. आता तुम्ही म्हणाल कसं? कुठं? आम्हालाबी सांगा आम्ही पण जातो. तसंही नोकरी मिळावं म्हणून लई घासलीय. ढेकणात राहिलोय. रविवार एका वडापाववर काढलाय. पैसे नाहीत म्हणून दोन- चार महिन्यातून एकदा केस कापलेत. रूममालकाचं भाडं थकवलंय. 

भिडूंनो काही भी चिंता करायची नाही . सगळं सविस्तर सांगतो की तुम्हास्नी. त्यामुळे ओळ न ओळ नीट लक्ष देऊन वाचा.

राजधानी दिल्लीच्या उत्तर-पुर्व भागात ६८ एकरवर मंडोली नावाचं नवीन जेल झालेलं आहे. तब्बल 169 कोटी रूपये खर्च करून हे जेल बनवण्यात आलंय. कैद्यांना ठेवायला सहा वेगवेगळ्या प्रकारचे आतमध्ये जेल आहेत. ३७५० कैदी एकाच वेळी राहू शकतील एवढी मोठी व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. तसंच दिल्लीतील सगळ्यात हायप्रोफाईल जेल म्हणून या जेलला ओळखलं जातं. आणि याच हाय प्रोफाईल जेलमध्ये वर सांगितेल्या सगळ्या सुख सुविधांचा लाभ बेरोजगार तरूण पोरं घेतायेत.

झालं असं की, नवभारत टाईम्स या वृत्तपत्रानं एक बातमी दिली. इथं क्लिक करून वाचू शकता.

https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/crime/tihar-inmates-share-video-from-jail/articleshow/68454096.cms 

त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नवभारत टाईम्सच्या म्हणण्यानुसार,या जेलमध्ये सगळ्या सुख सुविधा मिळतात म्हणून तरूण पोरं छोटा- मोठा अपराध करून येतात. कारण तरूण पोरांना नोकरी भेटत नाही. ते स्वत: वैतागलले असतात. घरचेही वैतागलेले असतात त्यामुळे ते बेरोजगार तरूण मुलं हे पाऊल उचलतात.

मंडोली जेलच्या अधिकाऱ्याने सांगितलं, की या जेलमध्ये जे कैदी आहेत त्याचे नातेवाईक सुरूवातीला या जेलमध्ये होते. जेव्हा ते या जेलमधून सुटून बाहेर गेले तेव्हा त्यांनी या जेलची तारिफ केली. खायला भारी भेटतं. रोज जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. दाळ भात असतो. आठवड्यातून एक दिवस खीर भेटतेय झोपायला निवांत रूम आणि कपडे भेटतात आणि अंघोळीला गरम पाणी मिळतं. अन् हे सगळं फुकटात भेटतं. त्यामुळे बाहेरच्या बेरोजगार तरूणांना मोटीव्हेशन मिळालं. नोकरी मिळत नाही म्हणल्यावर तरूण पोरांनी हा मार्ग धरला.

इथं आलेल्या मुलांनी आमच्या पोलिसांना हे सांगितलं तेव्हा आम्हीच हैराण झालो. एका मुलांनी सांगितलं,

“साहेब आमच्याकडं ना नोकरी आहे ना पैसा. अशातच आम्ही मंडोली जेलमधील सुख सोयीबद्दल आणि खाण्याबद्दल ऐकलं तेव्हा वाटलं चला जाऊन येवू एकदा जेलमध्ये. आता फुकटात आणि काही कारणाशिवाय तर जेलमध्ये येवू देणार नाहीत. मग काय छोटा मोठा गुन्हा करून आतमध्ये आलो.”

या जेलमधील कैदीसुद्धा एकदम खुश आहेत. या जेलची तारीफ करतात. कारण या जेलमध्ये सगळ्या सुख सोयी आहेत. आतमध्ये मोठ मोठ्या पेंटीग्स लावलेल्या आहेत. तसंच या जेलमध्ये कैद्यांना मारतही नाहीत. महत्वाचं म्हणजे जे कैदी इथं मुरलेले आहेत, पैश्यावाले आहेत. त्यांचे हातपाय दाबले, काम ऐकलं की सिगरेट,तंबाखू भेटते, असं नवीन आलेले कैदी सांगतात.

जास्त करून कैदी या जेलमध्ये हिवाळ्यात येतात. कारण थंडीनं बाहेर काकडू नये म्हणून या जेलचा आसरा घेतात. हिवाळा संपुपर्यंत जेलमध्येच राहतात. बेलसुद्धा करून घेत नाहीत. आणि हिवाळा संपत आला की पुन्हा आपली सुटका करून घेतात. आम्हाला मात्र कायद्यानं चालावं लागतं जास्त काही करता येत नाही असं तिथलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

नुकताच या जेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रूस्तम नावाचा गुंड जेलमध्य़े काय सुख सोयी भेटतात ते दाखवतोय. इथं क्लिक करून तो व्हिडिओ पाहा.

मात्र, भिंडूनो खायला भारी भेटतंय, अंघोळ करायला गरम पाणी मिळतंय म्हणून जेलमध्ये तरूण बेरोजगार पोरं जातात ही खरच शरमेची आणि लाजीरवाणी बाब आहे. थोडं अजून घासा, ढेकणं चावू द्या. डोक्याची केस वाढू द्या, रूमचं भाडं थकून मालक बोंबलुद्या. मात्र, अभ्यास करून चांगल्या नोकरीला लागा कारण जगण्यासाठी हा एकच पर्याय नाहीये. हे ध्यानात ठेवा.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.