याआधी आल्लापल्लीचं जंगल मंत्र्यांच्या अपहरणामुळं चर्चेत आलेलं…
अयोध्येतल्या राम मंदिराच्या कामाला आता जोरदार वेग आला आहे, हे बांधकाम पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ ला खुलं होईल असा अंदाज आहे. राम-सीतेच्या मूर्तीसाठी नेपाळवरुन शाळीग्राम आणल्याचीही मोठी चर्चा झाली. आता राम मंदिराच्या प्रवेशद्वारासाठी वापरण्यात येणारं सागवानी लाकूड आपल्या गडचिरोलीतल्या आल्लापल्ली जंगलातून मागवण्यात आलंय. फक्त याच जंगलात मिळणारं अतिशय द्रुमिल आणि उच्च प्रतीचं लाकूड राम मंदिराचं प्रवेशद्वार बनवण्यासाठी वापरलं जाईल.
यामुळं साहजिकच आल्लापल्लीचं जंगल चर्चेत आलंय आणि सोबतच आणखी एक किस्सा.. अपहरणाचा.
गोष्ट आहे ९० च्या दशकातील. धर्मरावबाबा आत्राम म्हणजे गडचिरोलीच्या आत्राम राजघराण्याचं वलयं लाभलेले आमदार. सोबतचं शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान अशी ओळखं. १९९० च्या दशकातच त्यांनी आमदार आणि पवारांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती.
त्याचवेळी एप्रिल १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आत्राम हे मामा रामचंद्र तलांडी आणि काही सहकाऱ्यांसह अहेरी-भामरागड रस्त्यावरील मेडपल्लीला या भागात गेले होते. मेडपल्लीमध्ये ते काँग्रेस नेते वेलादी यांच्याकडील लग्न समारंभात उपस्थित होते.
त्यानंतर धर्मारावबाबा बाजूलाच असलेल्या एका प्राथमिक शाळेत जाऊन बसले. याच सुमारास एटापल्ली आणि पेरमिली दलम समन्वयकाची भूमिका बजावणारा डीवीसी जहाल माओवादी देवण्णा आणि अहेरी दलमची राधक्का यांच्या नेतृत्वात पीपल्स वॉर ग्रुपचे २० माओवादी तिथं आले, आणि बंदुकीच्या धाकावर आत्रामांच अपहरण केलं.
जशी ही घटना मुंबईत समजली तसे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यापासून गृह विभाग, पोलिस यंत्रणा अक्षरशः हादरून गेली होती.
गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक के. पी. रघुवंशी तात्काळ सगळा पोलिसांचा ताफा घेऊन अहेरीत दाखल झाले. सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कनकरत्नम, सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त आणि राजुऱ्याचे तेव्हाचे उपाधीक्षक हेमंत नगराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आलापल्लीत मुक्कामी आले. हेलिकॉप्टरने शोधमोहीम सुरू झाली. पण प्रयत्नांना यश येत नव्हतं.
१५ दिवस झाले तरी आत्राम नक्षलवाद्यांच्या तावडीत होते. सरकारी प्रयत्न निष्फळ ठरत होते. शेवटी मुख्यमंत्री शरद पवार यांनी धर्मरावबाबा यांच्या सुटकेची जबाबदारी थेट चंद्रपूरचे आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांच्यावर सोपविली.
त्यामागे दोन कारण होती.
अॅड. एकनाथराव साळवे हे राजकीयदृष्ट्या त्या भागाशी परिचीत असलेले आमदार होते. तिथली त्यांना खडा न् खडा माहिती होती. दुसरं कारण म्हणजे ते व्यवसायाने वकील होते. त्यामुळे त्यांचा दक्षिण गडचिरोलीमधील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यात बराच संपर्क होता.
या भागात माओवाद्यांच्या कारवाई प्रकरणात अटक झालेल्या अनेकांची प्रकरणं त्यांनी न्यायालयात लढवली होती. ज्यावेळी १९८५ ला दहशतवाद विरोधी ‘टाडा’ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी काहींना विनाकारण यात गोवण्यात आल्याचं म्हणतं या साऱ्यांची बाजू घेऊन ते लढले होते.
त्यामुळे या प्रकरणात अॅड. साळवे हे महत्त्वाची भूमिका बजावून आत्राम यांना सुरक्षित परत आणू शकतात, हा विश्वास पवार यांना होता.
यानंतर साळवे यांनी जलदगतीनं आपली सूत्र फिरवली.
माओवाद्यांनी आत्राम यांच्या सुटकेसाठी सरकार समोर जहाल माओवादी नेता विकास उर्फ शिवण्णा याची बिनशर्त सुटकेची आणि इतर काही महत्वाच्या मागण्या ठेवल्या. या मागण्या अॅड. साळवे यांनी पवारांपर्यंत कळवल्या. आत्राम यांच्यासाठी शिवण्णाच्या सुटकेची मागणी सरकारनं मान्य केली. तशी सुटकाही करण्यात आली.
दुसरीकडे या भागात पेपरमिलसाठी बांबू तोडायचे काम असल्यानं त्यांच्याच एका जीपमधून अॅड. साळवे थेट कोपर्शीच्या जंगलात म्हणजे नक्षलवाद्यांच्या कंपुत शिरले. त्यांची देवण्णाशी जवळपास एक तास चर्चा झाली. सरकारी प्रयत्नांची माहिती देवून शिवण्णाच्या सुटकेची मागणी मान्य झाली असल्याचं अॅड. साळवे यांनी सांगितलं.
त्यानंतरच देवण्णानं धर्मरावबाबांना अॅड. साळवे यांच्यासोबत जिवंत परत पाठवलं होतं. एकनाथरावांनी त्यावेळी दाखवलेल्या धैर्यामुळेच आपला जीव वाचू शकला असं धर्माराव आज देखील मान्य करतात.
हे हि वाच भिडू
- आज भाजप मध्ये प्रवेश केलेला मिथुन कधीकाळी नक्षलवादी चळवळीच्या नादाला लागलेला
- त्यांच्या दोन वर्षाच्या काळात एकही पोलीस शहिद न होता ९५ नक्षलवादी शरण आले होते
- असच एक मुनगंटीवारांच आव्हान आबांनी स्वीकारून इतिहास घडवून दाखवला होता..