आज भाजप मध्ये प्रवेश केलेला मिथुन कधीकाळी नक्षलवादी चळवळीच्या नादाला लागलेला

पश्चिम बंगालच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच आज दिनांक ७ मार्च रोजी मिथुन चक्रवर्तीने भाजप प्रवेश करुन भाजप कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला.

पण त्याचा काय हा पहिला राजकीय प्रयोग नाही, यापुर्वी तो नक्षलावादाच्या नादाला लागलेला. त्यानंतर ज्योती बसुच्या जवळचा होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पाठबळावर राज्यसभेचा खासदार झाला व आज कुठे तो भाजपमध्ये स्थिरावला..

काय आहे मिथूनची एकंदरीत कहानी…

त्याच खरं नाव मिथुन नाही. तो जन्मला गौरांग चक्रवर्ती म्हणून. वडील बसंतकुमार चक्रवर्ती आणि आई शांती मयी चक्रवर्ती. एकूण चार भावंडे. कलकत्त्याच्या टेलिफोन एक्स्चेंज मध्ये वडील नोकरीला असल्या मुळे घरची परिस्थिती उत्तम होती. गौरांग लहानपणापासून कडमडया होता. नवरात्रीत दुर्गाउत्सवात नाटकात, नाचात भाग घ्यायचा. त्याच प्रचंड कौतुक व्हायचं.

शाळेत सुद्धा हुशार चुणचुणीत होता. त्याला ओरिएण्टल सेमिनरी या कलकत्त्याच्या सर्वात प्रतिष्ठित शाळेत घालण्यात आलं होतं. शाळा झाल्यावर गौरांगने स्कॉटिश चर्च कॉलेज मध्ये बीएस्सी केमिस्ट्री साठी ऍडमिशन घेतलं.

कॉलेजच्या जीवनाने गौरांग चक्रवर्तीच आयुष्यच बदलून गेलं. अगदी नावासकट. 

साधारण साठच्या दशकातला काळ. संपुर्ण देश वेगवेगळ्या विद्यार्थी चळवळींनी भारावून गेला होता. गौरांग देखील कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेत सहभागी झाला. बॉक्सिंग चॅम्पियन असल्यामुळे तो कॉलेज मध्ये प्रचंड फेमस होता.  त्याच गोड वर्तन बघून त्याला सगळे दोस्त मिष्टीदा असं म्हणायचे. यावरूनच त्याच नाव मिथुन पडलं.

त्याकाळी कलकत्त्याच्या विद्यार्थी चळवळी वर डाव्या मार्क्सवादी चळवळींचा प्रभाव होता.

विद्यार्थी नेता असलेला मिथुन याला अपवाद नव्हता. समाजात असलेली विषमता दूर करून जगातल्या प्रत्येक व्यक्तीची वस्त्र निवारा याची भ्रांत कायमची मिटावी एवढी समानता यावी हे आदर्शवादी स्वप्न मिथुन ला देखील पडत होतं.

यातूनच तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी/लेनिनवादी ) या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आला. या हुशार तगड्या बॉक्सरला त्यांनी आपल्या बोलण्याने आकर्षित करून घेतले. ते नक्षल वादी चळवळीचे नेते होते. रवी रंजन नावाच्या नक्षलवाद्याने आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर मिथुनवर जादू केली. मार्क्सच्या स्वप्नातला समाज घडवायचा झाला तर हातात बंदूक उचलावी लागेल हे मिथुनला पटले.

तो अचानक घरातून गायब झाला ते थेट माओवादी नक्षलवादी गटात सामील झाला.

फक्त मिथुनच नाही तर त्याकाळचे अनेक बंगाली उच्चशिक्षित तरुण सशस्त्र आंदोलक बनले होते. चारू मुजुमदार हा त्यांचा नेता होता. दार्जिलिंग येथे झालेल्या नक्षलबारी येथे त्याने क्रांती घडवून आणली. त्यामुळेच या तरुणांना नक्षलवादी म्हणत. मिथुन चक्रवर्ती चारू मुजुमदार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये ओळखला जायचा.

जंगलात लपून पोलिसांच्या विरोधात, सावकारांच्या,जमीनदारांच्या विरोधात घातपाती कारवाया करणे हे त्यांचे कार्य चाललेले असायचे.

पोलीस त्यांच्या मागावरच होते. अनेकदा पोलिसांचा आणि नक्षलवाद्यांचा सामना व्हायचा. मिथुनने देखील यातून जीव वाचवून पळ काढला होता. मित्रांच्या सल्ल्या नुसार तो भूमिगत झाला होता. मात्र एकदा त्याच्या भावाला पोलिसांनी पकडले आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक दिला. यात त्याचा मृत्यू झाला. हा अपघाती मृत्यू झाला असल्याचं सांगितलं गेलं.

मिथुन साठी हा खूप मोठा धक्का होता.

घरी आपल्या रडणाऱ्या आईचा चेहरा त्याला आठवला. मोठमोठ्या क्रांतीच्या बाता मारणाऱ्या नक्षलवादी नेत्यांच्या वागण्यावरून त्याचा भ्रम निरास झाला. अखेर त्याने हे सगळं सोडून परत घरी जाण्याचा निर्णय घेतला.

नक्षलवाद हा वनवे आहे असं म्हणतात. यात एकदा प्रवेश घेतला कि परतीचा मार्ग नसतो.

नक्षलवाद सोडून येणाऱ्या तरुणांचा एकतर पोलीस एन्काउंटर मध्ये मृत्यू होतो किंवा नक्षलवादी तुम्हाला दगाबाज ठरवून मारून टाकतात. मिथुनला मात्र त्याच्या मित्रांनी वाचवले. कलकत्त्यात परत आल्यावर तो अनेक दिवस लपून बसला होता.

मिथुनदा नक्षली जीवन मागे सोडून आला होता मात्र त्याच्यावरचा नक्षलवादी शिक्का मात्र गेला नव्हता. तो मिटवण्यासाठी तो आपल्या पहिल्या प्रेमाकडे वळला. ऍक्टिंग !!

कलकत्त्यामध्ये काही नाटकात त्याने काम केले. काही दिवसांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफटीआयआयची प्रवेश परीक्षा दिली. ती तो चांगल्या मार्काने पास झाला आणि तिथे प्रवेश घेण्यासाठी पुण्याला आला. एफटीआय आय ही भारताची सिनेमाक्षेत्रातील अग्रगण्य संस्था मानली जाते. त्याच्या नक्षलवादी इतिहासाचे  इथपण त्याचा पिच्छा  करत होते.रझा मुराद वगैरे सिनियर त्याच्या पासून अंतर राखून राहायचे.

पण नंतर नंतर मिथुन फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये रुळला.

अभिनयाचे गुण त्याच्यात भरपूर होते. अंगात नेतृत्वगुण देखील होते. तिथल्या मुलांचा देखील तो लीडर बनला. ज्युनियर असलेल्या शक्ती कपूरचा त्याने घेतलेली रॅगिंग आणि नंतर जुळलेली मैत्री याचे किस्से आजही फेमस आहेत.

मिथुन एफटी आय आय मधून पास आउट झाल्यावर मुंबईला आला.

मुंबईत त्याचा कोणी गॉड फादर नव्हता ना खिशात पैसे होते. दोन वेळच्या जेवणाची सुद्धा शाश्वती नसायची. त्यात नक्षलवादी असल्याचा शिक्का अजून होताच. कधी मॉडेलिंग कधी छोटे छोटे गर्दीतले रोल मिळवून त्याने स्वतःच बस्तान मांडलं. हेलनच्या नाचात असिस्टंट म्हणून देखील काम केलं.

अखेर बंगालच्याच मृणाल सेन यांनी त्याला त्यांच्या मृगया या सिनेमामध्ये पहिला ब्रेक दिला. आपल्या डेब्यू सिनेमातच मिथुनदाने इतकी जबरदस्त ऍक्टिंग केली कि त्याला या सिनेमासाठी अभिनयाचा नॅशनल अवॉर्ड मिळाला.

या नॅशनल अवॉर्ड मुळे त्याच्या वरचे सगळे शिक्के वाहून गेले.

तेरे प्यार में, सुरक्षा, तराणा असे काही सिनेमे चांगले चालले. तो हळूहळू हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थिरावत होता. अशातच एकदा समांतर सिनेमामधले जुने फेमस लेखक दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास त्याच्या कडे आले. ते एक सिनेमा करणार होते. त्याचं नाव कळल्यावर मिथुनला शॉकच बसला.

सिनेमाचं नाव होतं  द नक्षलाईट

अहमद अब्बास यांचं नाव मोठं होतं पण मिथुन नक्षलवादावर सिनेमा करण्यास तयार नव्हता.  मिथुनला आपली इमेज एक डान्सर, ऍक्शन हिरो अशी करायची होती, पण जो इतिहास तो विसरू पाहात होता तो त्याच्या मागे येत होता. अब्बास अहमद यांनी त्याला खूप समजावून सांगितलं. अखेर स्मिता पाटील सारख्या जबरदस्त अभिनेत्री बरोबर काम करायला मिळेल म्हणून मिथुनने हा सिनेमा स्वीकारला.

द नक्षलाईट बॉक्सऑफिस वर फ्लॉप झाला मात्र त्याच समीक्षकांनी भरपूर कौतुक केलं. बरेच पुरस्कार देखील मिळाले. पिक्चर फ्लॉप झाल्यामुळे मिथुनच्या इमेजवर या सिनेमाचा विशेष परिणाम झाला नाही.

यापाठोपाठ आलेल्या डिस्को डान्सरने भारतात परदेशात प्रचंड हवा केली त्याने त्याकाळी सगळे रेकॉर्ड ब्रेक करत १०० कोटी रुपये कमवले. या सिनेमाच्या सुपरहिट यशामुळे मिथुन चक्रवर्ती घराघरात पोहचला. त्याला सुपरस्टार अभिनेत्यांच्या यादीत ओळखलं जाऊ लागलं.

कामगार वर्गात फेमस असलेला, गोरगरिबांची भाषा आपल्या सिनेमातही बोलणारा मिथुनदा डाव्या चळवळी पासून दूर गेला असला तरी विचारसरणी पासून दूर गेला नाही .

तो राजकारणात देखील सक्रिय राहिला. कम्युनिस्ट नेते ज्योती बसू यांच्याशी त्याची चांगली ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र मिथुनने डाव्या पक्षांशी आपले नाते कायमचे संपवून टाकले. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये गेला. त्याला त्यांनी राज्यसभा खासदार देखील बनवलं होत. प्रणब मुखर्जी याना राष्ट्रपती बनवताना ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा घेण्यात त्याची महत्वाची भूमिका होती असं बोललं गेलं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.