विनोबांनी दिलेल्या ५ रु. पासून काम सुरु केलेलं, आज नक्षलवाद्यांच्या तावडीतुन जवानाला सोडवलंय.
मागच्या शनिवारी छत्तीसगड मधल्या बिजापूर सुकमा या डोंगराळ भागात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यात जवळपास २२ जवान शहीद तर तीसच्या वर जवान जखमी झाले. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह या एका जवानाचं अपहरण करुन त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. ही गोष्ट समजल्यानंतर सरकार पासून सामान्य नागरिकांपर्यत सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती.
त्यानंतर सरकार एका बाजूला शहीद आणि जखमी झालेल्या जवानांच्या मदतीसाठी काम करत होते, आणि दुसऱ्या बाजूला राकेश्वर सिंह यांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न. मात्र जसा जसा वेळ जात होता तस-तसा सरकारवरचा दबाव चांगलाच वाढत होता.
अखेर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यासाठी बस्तरचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ९२ वर्षीय वृद्धाची मदत घ्यायची ठरवलं, तशी त्यांच्याशी बोलणी झाली आणि बघता बघता या वृद्ध माणसानं केलेल्या मध्यस्थीमुळे तो जवान सुखरूप घरी परतला. जे काम सरकारला जमलं नव्हतं ते काम या बस्तरच्या गांधींनी पूर्ण करून दाखवलं.
अशा या बस्तरचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वृद्धाच नाव म्हणजे,
धर्मपाल सैनी.
जवळपास ४५ वर्षांपूर्वी धर्मपाल पहिल्यांदा बस्तरला आले, आणि आल्यानंतर इथलेच झाले, या साडे चार दशकांच्या काळात त्यांनी इथल्या जंगलातील आदिवासींच्या साक्षरतेची टक्केवारी १० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणली आहे. इतकचं नाही तर २ हजार पेक्षा जास्त ऍथलेटिक्स पण तयार केलेतं. त्यांच्या आश्रमात शिकलेली मुलं आज डॉक्टर, इंजिनिअर आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत.
मूळ मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील असलेल्या सैनी यांची बस्तरला येण्याची गोष्ट देखील तेवढीच प्रेरणा देणारी आहे.
६० च्या दशकात सैनी भूदान चळवळीचे प्रणेता विनोबा भावे यांचे शिष्य होते. विनोबांसोबत काम करतं असताना त्यांनी बस्तरमधल्या मुलींच्या संदर्भातून एक बातमी वाचली. त्या बातमीत सांगितलं होतं कि,
दसऱ्याच्या कार्यक्रमातून परतताना काही मुलांनी मुलींची छेड काढली. त्यावर या धाडसी मुलींनी त्या मुलांचे हातपाय तोडून त्यांची हत्या केली.
या मुलींच्या बातमीनं प्रभावित होऊन सैनी यांनी या ऊर्जेचा आणि धाडसाचं सकारात्मक उपयोग करून घ्यायचं ठरवलं. त्यासाठी बस्तरला येण्याचा निर्णय घेतला.
सैनी यांनी आपले गुरु विनोबांना या योजनेबद्दल सांगितलं, आणि जाण्यासाठी परवानगी मागितली. पण विनोबांनी त्याक्षणी या योजनेला नकार देत, सैनींना परवानगी दिली नाही. पुढची बरीच वर्ष सैनी विनोबांना परवानगीसाठी विनवण्या करत होते, अखेरीस तब्बल १६ वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. १९७५ च्या आसपास त्यांना परवानगी मिळाली.
विनोबांनी ५ रुपयांची नोट सैनींच्या हातात ठेवत एक अट घातली. म्हणाले,
“आता जात आहेस तर पुढची १० वर्ष तरी तू बस्तर सोडणार नाहीस. तिथंच काम करत राहशील.”
सैनींनी तात्काळ अट मान्य केली आणि ते बस्तरच्या घनदाट जंगलात दाखल झाले.
आग्रा विद्यापीठामधून ग्रॅज्युएट असलेले धर्मपाल सैनी हे स्वतः ऍथलिट आहेत. १९७६ साली ते जेव्हा इथं आले तेव्हा त्यांच्या एका गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, इथली छोटी मुलं १४ ते २० किलोमिटर अगदी सहज चालू शकतात. त्यांनी मुलांच्या या क्षमतेला खेळात आणि शिक्षणात वापरण्याची योजना आखली. १९८५ मध्ये पहिल्यांदा आश्रमातल्या मुलांना त्यांनी खेळाच्या स्पर्धेत उतरवलं.
तिथून सुरू झालेला या स्पर्धांमधून सैनींनी आजवर २ हजार पेक्षा जास्त खेळाडू घडवले. आज दरवर्षी १०० हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धेत भाग घेतात आणि जिंकत असतात. त्यामुळे बस्तर वाल्यांना एका पाठोपाठ एक जिंकणाऱ्या मुलांना बघून विशेष अप्रूप वाटत नाही. त्यांच्या डिमरापालमधील आश्रमात आज हजारोंच्या संख्येनं मेडल्स आणि ट्रॉफीज् ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळांमधून ३० लाखांहून अधिक रक्कम जिंकून आणली आहे.
सोबतचं इथल्या परिसरातील साक्षरता वाढवण्यासाठी देखील त्यांनी काम केलं. मुलांच्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या आधी बस्तरचा साक्षरता दर १० टक्क्यांपेक्षा कमी होता. ते आल्यानंतर शाळेत न जाणाऱ्या आदिवासी मुली शाळेत जावू लागल्या. आज याच माजी विद्यार्थीनी मोठ्या प्रशासकिय पदांवर काम करतात.
जानेवारी २०१८ मध्ये इथला साक्षरता दर ५३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
त्यांच्या या सगळ्या विकासात्मक कामाचा गौरव म्हणून त्यांचा १९९२ साली पद्मश्रीनं सन्मान केला आहे. तर २०१२ च्या द वीक मॅगझिनने सैनींचा मॅन ऑफ द इयर म्हणून गौरव केला.
सैन्यींच्या कामामुळेच त्यांना बस्तरच्या आजूबाजूच्या भागातील केवळ नागरीकच नाही तर नक्षलवादी देखील मान, सन्मान देतात. त्यांना मानतात. याआधी देखील सैनी सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये शांती वार्तासाठी प्रयत्न करत होते. हळू हळू ते त्या दिशेनं जात होते. पण मध्येच केंद्रीय दलांनी नक्षलवाद विरोधी मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे चर्चा सुरु होण्यापुर्वीच फिस्कटली.
राकेश्वरसिंग हे नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याच कळाल्यानंतर मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सैंनीना मध्यस्थीची विनंती केली. त्यानंतर तात्काळ सुत्र हालवत नक्षलवाद्यांशी चर्चा झाली आणि सैनींनी जवानाला सुखरुप माघारी आणलं आहे.
हे ही वाच भिडू.
- त्यांच्या दोन वर्षाच्या काळात एकही पोलीस शहिद न होता ९५ नक्षलवादी शरण आले होते
- नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या धर्मारावबाबा आत्रामांना आमदारांनी थेट जंगलातनं सोडवून आणलं.
- नक्षलवाद्यांचा सामना करणारी मनमोहन सिंग यांची कोब्रा बटालियन…