नक्षलवाद्यांचा सामना करणारी मनमोहन सिंग यांची कोब्रा बटालियन…
शनिवारी छत्तीसगड मधल्या बिजापूर सुकमा या डोंगराळ भागात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर भ्याड हल्ला झाला.
यात जवळपास २२ जवान शहीद झाले तर तीसच्या वर जवान जखमी झाले. छत्तीसगड, आंध्र सीमेवरील जोनागुडा डोंगराळ भाग हे नक्षलवाद्यांचे मुख्य ठिकाण आहे. इथे नक्षलवाद्यांची संपूर्ण एक बटालियन आणि अनेक प्लाटून कायम तैनात असतात. या संपूर्ण भागाचं नेतृत्व नक्षलवादी सुजाता हिच्या हातात आहे.
तिच्या नेतृत्वाखाली नक्षलवादी जवानांवर मोठा हल्ला करणार अशी शंका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आधीच होती. यामुळेच संपूर्ण भागात नक्षलवाद्यांविरोधात कारवाईसाठी २ हजारांहून अधिक जवानांना उतरवण्यात आलं होतं. पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी या संघटनेच्या हिडमा आणि सुजाता या दोघी नक्षलवादी महिला या हल्ल्याच्या मास्टरमाईन्ड आहेत असं म्हटलं जातं .
या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सीआरपीएफची खास कोब्रा बटालियन उतरवण्यात आली आहे. या बटालियनच वैशिष्ट्य म्हणजे यात महिला जवानांचा देखील समावेश आहे.
कोण आहेत हे कोब्रा जवान? त्यांचा डॉ.मनमोहन सिंग यांच्याशी काय संबंध?
२००४ साली जेव्हा भाजपला हरवून युपीए सरकार सत्तेत आलं तेव्हा माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान बनले. या सरकारला डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. डाव्यांच्या टेकूवर अवलंबून असलेल्या या सरकारला अनेकदा आपली धोरणे ठरवताना त्या पक्षांच्या मतांचा विचार करावा लागायचा.
खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक आणि एकेकाळी जागतिकीकरण आणणारे डाव्यांचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जाणारे डॉ.मनमोहन सिंग या आघाडीचे नेते बनले हि एक आश्चर्याची गोष्ट होती. पण नव्या पंतप्रधानांना त्यांच्या सौम्य प्रतिमेमुळे ओळखले जायचे.
साधारण नव्वदच्या दशकापासून भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला नक्षलवाद्यांचा मोठा धोका निर्माण झाला होता. विशेषतः प.बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, विदर्भ या भागातील जंगलांमध्ये हे माओवादी कट्टरपंथी प्रचंड शस्त्रसज्ज होऊन लपून बसले होते. याला रेड कॉरिडॉर म्हणून ओळखलं जायचं. या भागातील लाखो आदिवासींना आपली गावे सोडून वेगळीकडे वसावे लागले होते.
२००६ साली भारतीय गुप्तचर संस्था रॉने पंतप्रधानांना एक रिपोर्ट सबमिट केला. यात जवळपास वीस हजार नक्षलवादी रेड कॉरिडॉरमध्ये असल्याचं सांगितलं होतं. या शिवाय या नक्षलवाद्यांचे ५० हजारांचे वेगळे केडर असल्याचंही बोललं जात होतं. यावर लवकरातल्या लवकर उपाययोजना केली पाहिजे असं रॉच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
चीन मधून या नक्षलवाद्यांना मदत केली जाते, भारतातील डाव्या पक्षांची या नक्षलवादाला सहानुभूती आहे असेही आरोप केले जायचे. मनमोहन सिंग सरकार आणि डावी आघाडी यांचे अमेरिकेशी अणुकरारावरून मोठे मतभेद होते. यातून डाव्यांनी युपीएचा पाठिंबा काढून घेतला. त्यांचा पाठिंबा गेल्यावरही कसेबसे सरकार अविश्वास ठरावात पास झाले.
मनमोहन सिंग यांच्या वरील सर्व दबाव या निमित्ताने बाजूला गेला. नव्या आत्मविश्वासाने पंतप्रधानानी घोषणा केली,
“माओवादी नक्षलवाद हा देशाला लागलेला व्हायरस असून त्याचे समूळ उच्चाटन करण्याची वेळ आली आहे.”
शांत स्वभावाच्या मनमोहन सिंग यांनी केलेल्या या घणाघाती घोषणेमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. मनमोहन सिंग यांचे म्हणणे होते की रेड कॉरिडॉरमध्ये होत असलेल्या नक्षल कारवाईमुळे तिथला विकास रोखला गेला आहे, शेकडो पोलिसांवर, सरकारी कर्मचाऱ्यांवर रोज होणारे हल्ले, आदिवासाईंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारला आक्रमक व्हावे लागणार आहे.
तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाशी सामना करण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील याचा अभ्यास सुरु झाला. नक्षलवादी हे हिंसक असल्याने त्यांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे होते.
२००८ सालच्या ऑगस्ट महिन्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रमुख विजय कुमार यांनी १० युनिटची नवीन बटालियन स्थापन करण्याची घोषणा केली. तिला नाव देण्यात आले होते,
“Commando Battalion for Resolute Action उर्फ कोब्रा “
आंध्रप्रदेशचे १९८१ सालचे आयपीएस ऑफिसर के.दुर्गाप्रसाद यांना हि बटालियन स्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली. के दुर्गाप्रसाद हे अँटी नक्षल ऑपरेशनचे तज्ज्ञ मानले जायचे. त्यांना नक्षलवाद्यांना शोधून काढून त्यांचा खात्मा करण्याची ताकद असणारी १० हजार जणांची ग्रेहाऊंड कमांडो टीम बनवण्याचे आदेश देण्यात आले.
जंगल वॉरियर्स कोब्रा बटालियन स्थापन करण्यासाठी मनमोहन सिंग सरकारने १३८९ कोटी रुपयांचा निधी दिला. यातले ९०० कोटी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी तर चारशे कोटी कमांडोंच्या तीन वर्षांच्या ट्रेनिंग साठी राखीव ठेवण्यात आले.
हि कोब्रा बटालियन कोणत्याही अवघड परिस्थितीमध्ये गोरिला वॉरफेअर पद्धतीने युद्ध करणे, स्फोटके शोधून काढणे, जंगलात कित्येक दिवस क्षमता, फिल्ड इंजिनियरिंग,मॅप रिडींग, जीपीएस, इंटीलिजन्स नक्षलवाद्यांचा माग काढणे, प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन याच्या ट्रेनिंगने सुसज्ज करण्यात आले.
याच काळात मुंबईमध्ये २६/११ चा हल्ला झाला. देशातील अंतर्गत सुरक्षिततेचे महत्व वाढले, सुरक्षा यंत्रणांचे अपयश शोधून त्यात काय बदल करता येतील याच्या हालचाली सुरु झाल्या. देशाचे गृहमंत्रीपद देखील शिवराज पाटील यांच्याकडून काढून घेऊन पी.चिदम्बरम यांना देण्यात आले.
चिदंबरम यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेत अनेक मोठे बदल केले. त्यांच्या काळात रेड कॉरिडॉरमधल्या नक्षल चळवळीला संपवण्यासाठी आजवरची सर्वात महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली.
ऑपरेशन ग्रीन हंट
या मोहिमेमध्ये सर्वात आघाडीवर होते सीआरपीएफची कोब्रा बटालियन. २००९ पासून ही पॅरामिलिट्री कमांडो टीम झारखंड पासून गडचिरोली पर्यंत तैनात आहे. पुढच्या दोन वर्षातच त्यांनी ६१ नक्षलीचा खात्मा केला आणि जवळपास ८०० च्या वर जणांना अटक केली.
जेव्हा २०१३ साली छत्तीसगड मध्ये काँग्रेस प्रचार रॅली वर नक्षलवाद्यानी हल्ला केला आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना ठार केलं. याचा पुढच्या ४ च महिन्यात कोब्रा कमांडोनी बदला घेतला.
छत्तीसगड हल्ल्यात सहभागी झालेले माओवादी अतिरेकी दक्षिण ओरिसामध्ये लपले होते. स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या टीमने हल्ल्यात १४ अतिरेकी ठार केले.
आजवर या एलाईट कमांडो टीमने ९ गॅलंट्री वॉर्ड जिंकलेले आहेत यात दोन शौर्य पदकांची समावेश आहे.
गेल्याच वर्षी महिला नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी महिला कमांडोचा समावेश या बटालियनमध्ये करण्यात आला होता. जगभरातून याबद्दल कोब्रा बटालियनचे कौतुक करण्यात आले होते. आजही छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्याविरोधात कारवाईची मुख्य जबाबदारी कोब्रा बटालियनला देण्यात आली आहे. त्यांचा आजवरचा रेकॉर्ड पाहता लवकरच नक्षलवादी चळवळीला कणखर उत्तर देण्यात येईल हे नक्की.
हे ही वाच भिडू
- आज भाजप मध्ये प्रवेश केलेला मिथुन कधीकाळी नक्षलवादी चळवळीच्या नादाला लागलेला
- त्यांच्या दोन वर्षाच्या काळात एकही पोलीस शहिद न होता ९५ नक्षलवादी शरण आले होते
- नक्षलवाद्यांपासून दाऊदपर्यंत अनेकजण बिहारमेड AK47 चे फॅन आहेत.