८५ वर्षानंतर भगतसिंग यांच्या पिस्तुलचा शोध सुरू झाला..

क्रांन्तीकारकांनी आपल्या रक्ताने भारताला स्वातंत्र मिळवून दिले. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू हे तरूण म्हणजे स्वतंत्र भारतात जन्म घेतलेल्या कित्येकांची प्रेरणा. ऐन तारूण्यात हसत हसत देशासाठी फासावर जाणारे या क्रांन्तीकारकांच्या गोष्टी वाचल्या की अंगावर शहारे येतात.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या शौर्यगाथेतील महत्वाच पानं म्हणजे, सॉर्ड्सची हत्या. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला या क्रांन्तीकारकांकडून सॉर्ड्स चा वध करुन घेण्यात आला. त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 23 मार्च 1931 रोजी हि शिक्षा अंमलात आली आणि हे तीन महान क्रांन्तीकारक देशासाठी हसत हसत फासावर गेले.

आपल्याप्रमाणेच एक तरुण हि शौर्यगाथा वाचत वाचतच मोठ्ठा झाला. पण त्याला एक प्रश्न नेहमी पडायचां. तो म्हणजे चंद्रशेखर आझाद यांची ती बंदूक आजही सुरक्षितरित्या जपून ठेवण्यात आली आहे. मात्र भगतसिंग यांनी वापरलेली ती पिस्तुल आज कुठे असेल?

फक्त विचार करून थांबणाऱ्यातला तो तरुण नव्हता, त्या तरुणाने या भगतसिंग यांच्या या पिस्तुलचा शोध घेण्याचा निर्णय घेतला,

आणि सुरू झाला तो शोध भगतसिंग यांच्या पिस्तुलचा. 

पत्रकार असलेल्या पंचवीस तिशीत असणाऱ्या जुपिंदरजीत सिंह या तरुणाने 2016 साली भगतसिंग यांची पिस्तोल आज कुठे असेल याचा शोध घेण्यासाठी सुरवात केली. अनेक कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांना पिस्तुलीची माहिती मिळाली. भगतसिंह यांची पिस्तुल 32 बोर कोल्ट सेमी ऑटोमॅटिक प्रकारातली होती आणि तिचा सिरीयल नंबर 168896 असा होता.

पिस्तुलीसाठी असणारी आवश्यक आणि पुरेसी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर मात्र पुढचा शोध घेणं अवघड होतं. सिरीयल नंबरच्या आधारे कोर्टाकडून जप्त करण्यात आलेली पिस्तुल कुठे गेली याचा शोध घेत असताना त्यांना समजलं की 1931 साली लाहोर उच्च न्यायालयाने हि पिस्तुल पंजाबच्या फिल्लोर पोलीस ट्रेनिंग अॅकडमीकडे पाठवण्याचा आदेश दिला होता.

त्यानंतर मात्र, पिस्तोल या ट्रेनिंग सेंटर मध्ये 13 वर्षानंतर पोहचल्याची नोंद होती. पिस्तोल फील्लौर पोलीस स्टेशनमध्ये आहे याचा अर्थ लाहोर मधून ती पंजाबमध्ये आली होती. याचाच अर्थ ती सध्या भारताकडेच असण्याच्या गोष्टीला दुजोरा मिळत होता.

जुपिंदरजीत सिंह, हा तरुण फील्लोर च्या पोलीस ट्रेनिंग अॅकडमीमध्ये गेला.

तिथल्या सर्व कागदपत्रांची त्याला पहावी लागली. तेव्हा अस लक्षात आलं की 1968 साली फिल्लोर मधून 8 पिस्तुल मध्यप्रदेशातील इंदोरमधील BSSF CENTRAL SCHOOL OF DEFENCE AND TACTICS येथे पाठवण्यात आले आहेत.

त्यावेळी नुकतेच BSSF चालु झाले होते आणि या तुकडीच्या प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र इंदौर होते. तत्कालीन राष्ट्रपतींनी सगळ्या राज्यांना स्वत:कडे असलेली शस्त्रे या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरुन हि पिस्तुल मध्यप्रदेशातील इंदोर येथे पाठवण्यात आली होती. 

आत्ता जुपिंदरजीत सिंह या तरुणाने मध्यप्रदेशातील इंदोर गाठले.

तिथे त्याने या पिस्तुलीचा शोध घेण्यास सुरवात केली. 

जुपिंदरजीत सिंह यांनी BSSF चे IG असणाऱ्या पंकज यांच्याशी संपर्क साधून या पिस्तुलीचा शोध घेण्याची विनंती केली. भगतसिंह यांची पिस्तुल आणि जुपिंदरजीत सारखा एक तरुण ती शोधण्यासाठी आलेला पाहून आपल्या अधिकाराखाली BSSF ची यादी पाहण्याची परवानगी पंकज यांनी दिली.

शस्त्रांची लिस्ट शोधण्यास सुरवात केल्यानंतर ती शस्त्र इथेच आहेत याची पुष्टी मिळाली. शेवटी फिल्लोर मधून 1968 साली आलेली त्या आठ पिस्तुल समोर आणण्यात आल्या. या पिस्तुल गंजू नयेत म्हणून त्यांवर पेंट करण्यात आलेलं होतं. हळुहळु एक एक पेंट काढून नंबर मॅच करण्याच काम सुरू झालं, आणि अखेर एका पिस्तुलवरचा नंबर मॅच झाला.

हिच ती भगससिंग वापरत असणारी पिस्तुल.

पिस्तुल मिळाली पण सर्वात मोठा प्रश्न होती ती आत्ता पंजाबकडे घेवून जाण्याचा. यासाठी पंजाब हरियाणा हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. या कागदपत्रांच्या मदतीने या पिस्तुलवर पंजाबचा हक्कच नाही तर ती पंजाबच्या भावनेशी जोडली असल्याचं सांगण्यात आलं.  कोर्टाने आदेश दिले आणि पिस्तुल पंजाबला पाठवण्यात आली.

Screenshot 2019 03 23 at 2.31.37 PM

आज हि पिस्तुल इतिहासाची साक्षीदार म्हणून हुसैनवाला म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे. तर या सर्व घडामोडींवर पत्रकार जुपिंदरजीत सिंह यांनी डिस्कवरी ऑफ भगत सिंग पिस्टल नावाचे पुस्तक लिहले आहे. 

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.