त्यादिवशी तो बाबा भेटला नसता तर कदाचित अब्दुल कलाम मिसाईल मॅन झाले नसते

भारतरत्न, माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, अभ्यासक, अशा अनेक विशेषणांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा गौरव केला जात असला तरी त्यांची ओळख होती, ती ‘मिसाइल मॅन’ म्हणून!

भारताला संरक्षणसिद्ध बनविण्यासाठी जो मिसाईल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम राबविण्यात आला, तो त्यांच्याच नेतृत्वाखाली.

किंबहुना त्या मिसाईलच्या निर्मितीत त्यांनी मोठा वाटा उचलल्यानं कलामांना ‘मिसाइल मॅन’ हे विशेषण आपसूकच जोडले गेले. पुढे त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले गेले, ते राष्ट्रपती झाले आणि विविध कल्पक उपक्रमांच्या संकल्पनाद्वारे ते मुलांना, तरुणांना प्रेरित करू लागले. पण ‘मिसाइल मॅन’ ही ओळखच कायम राहिली.

खरं तर भारताने एका महान वैज्ञानिकाच्या रूपातच अब्दुल कलामांना पाहिलंय. पण त्यांची अशी ओळख निर्माण होण्यामागे एका फकीराचं मार्गदर्शन होत. 

होय, कलामांनी फिजिक्सचा अभ्यास सोडून एरोनॉटिकल इंजीनियरचा अभ्यास करण्यामागे त्या फकीराच मार्गदर्शन होत आणि पुढं याच मार्गदर्शनामुळे कलाम जगातले सगळ्यात भारी एरोनॉटिकल इंजीनियर झाले.

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा कलाम २० वर्षांचे वैगरे असतील.

ते तेव्हा मद्रासच्या एका कॉलेज मध्ये फिजिक्सचा अभ्यास करत होते. बघायला गेलं तर कलाम हे लहानपणापासूनच जे काम करत ते अगदी मन लावून करत. त्यामुळे ते प्रत्येकच क्षेत्रात ते अव्वल असायचे. फिजिक्सची डिग्री घेताना सुद्धा ते वर्गात हुशार होतेच. मात्र ते जे करत होते त्यात त्यांचं मन रमत नव्हतं. म्हणजे फिजिक्सच्या फॉर्म्युल्यांमध्ये मन रमत नव्हतं अशी परिस्थिती होती.

म्हणजे एकीकडे ते फिजिक्स या विषयाचे टॉपर होते पण त्यांना ते तितकस आवडेना. त्यांनी त्यात आवड निर्माण करायचा बराच प्रयत्न केला पण काही होईना.  

काय करावं कोणाचं मार्गदर्शन घ्यावं हे त्यांना समजेना. एक दिवस त्यांची मनस्थिती त्या फिजिक्सच्या विचाराने इतकी ढासळली की, त्यांना त्यांचं मन शांत करण्यासाठी कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन मन एकाग्र करण्याची इच्छा निर्माण झाली. अशात ते जाऊन पोहोचले, तिरुचिरापल्लीच्या नाथर वली दर्ग्यात.

नाथर वली शाह दर्गा अकराव्या शतकातला आहे. नाथर वली नावाचे एक सुफी संत तिरुचिरापल्लीत आले होते. त्यानंतरच इथं त्यांचा दर्गा बांधण्यात आला. कलाम तिथं गेले आणि ध्यानस्थ बसले. बराच वेळ गेला पण त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर काही सापडेनात. शेवटी त्यांनी डोळे उघडले तर त्यांना समोर एक फकीर दिसले. फकिराने हातवारे करून अब्दुल कलामांना जवळ बोलावलं.

आणि त्यांच्यात संवाद सुरु झाला तो असा

फकीर – तरुण मुला तू काय शोधतोयस ?

कलामांना पहिल्यांदा तर थोडं आश्चर्य वाटलं. कारण ते काहीतरी शोधतायत हे फक्त त्यांच्या मनाला माहित होत. आणि ते त्या फकीराना कसं समजलं. पण मग उत्तर द्यायचं म्हणून ते म्हंटले,

मी स्वतःच अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतोय.

त्यावर फकीर म्हंटले – मग यात समस्या काय आहे ?

यावर कलाम उत्तरले – मला ते अस्तित्व सापडेना.

फकीर म्हंटले – नफ्स स्वच्छ करून घे.

यावर कलामांनी विचारलं – हे नफ्स काय आहे.

त्यावर फकिराने उत्तर दिलं – नफ्स ही मानवाच्या स्वभावातली घाणेरडी वृत्ती, गर्व, तामसी वृत्तीची यादी आहे. तू तुझ्या मनावरचं ओझं हटवून देवाप्रती म्हणजेच तुझ्या कामाप्रती शरण जा. तुला ज्यात आनंद मिळेल ते काम कर.

अशाप्रकारे जवळ जवळ दोन तास हे संभाषण सुरूच राहील. कलाम प्रश्न विचारत गेले. ते फकीर त्यांची उत्तर देत गेले. त्यात सनातन, इस्लाम, ख्रिश्चन अशा सगळ्या धर्मांचा अंतर्भाव देऊन फकीर कलामांच्या शंकांचं निरसन करू लागले.

ज्यावेळी कलामांना त्यांच्या प्रश्नच उत्तर सापडलं तिथं त्यांनी ते संभाषण थांबवलं आणि ते फकीर निघून गेले. आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी चेन्नईला जाऊन कलामांनी त्यांना मिळालेल्या उत्तरांची तामिली केली.

कलामांनी त्याच दिवशी फिजिक्स सोडून एरोनॉटिकल इंजिनियरिंग करायचं ठरवलं. आणि त्यांचा हा निर्णय योग्य होता हे त्यांना पुढं मिळालेल्या त्यांच्या मिसाईल मॅन या नावावरुनच सिद्ध झालं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.