एक काळ होता जेव्हा खडसे तिकीट नाकारत होते आणि भाजप त्यांच्या मागे लागली होती…

उत्तरेत शांत निवांत खान्देशात पुन्हा काही तरी गडबड सुरु असलेली दिसत आहे. बातम्यांच्या हेडलाईनमध्ये पुन्हा एकनाथराव खडसेंच नाव चमकू लागलंय. काल त्यांचे जुने सहकारी आणि सध्याचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस जळगावात त्यांच्या घरी भेटीस आले. लगेच बातमीदारांची झुंबड उडाली. भुवया उंचावल्या, सरकारे थरारली. जनता काही खुसखुशीत बातम्या मिळेल म्हणून आनंदून गेली.

नाथाभाऊ म्हणाले भेट राजकीय नव्हती. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज त्यांना सिल्वर ओकवरून बोलावणं आलं. ते शरद पवारांच्या भेटीस गेले. भाजपमधून राष्ट्रवादी मध्ये आलेल्याला त्यांना फार काळ झाला नाही. मग ते पुन्हा अस्वस्थ झालेत की काय म्हणून राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

नाथाभाऊ खडसे म्हणजे एकेकाळची खान्देशाची धडाडती तोफ. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी एक काळ गाजवला होता. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पण

दुर्दैवाने त्यांची संधी हुकली आणि देवेंद्र फडणवीस खुर्चीवर बसले. मुख्यमंत्री जरी नसले तरी सरकारमध्ये दोन नंबरचं स्थान नाथ भाऊंचं होतं.  पण पुढे त्यांचं भाजपमध्ये काय तर बिनसतं गेलं. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले, मंत्रिपद गेलं. एकेकाळी जगाला तिकीट वाटणाऱ्या एकनाथराव खडसेंना स्वतःलाच आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. अनेक अपमान पचवून शांत राहिलेल्या नाथाभाऊंनी नाही होय म्हणत अखेर भाजपला शेवटचा जय श्रीराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.

आज राष्ट्रवादीमध्ये देखील त्यांना कोणते पद मिळालेले नाही. विधानपरिषदेची आमदारकी राज्यपालांच्या टेबलावर अडकून पडली आहे.

एक काळ असा होता जेव्हा नाथाभाऊंना बोलावून बाबापुता करून भाजपने आमदारकीच तिकीट दिल होतं.

त्या आधी एकनाथ खडसेंचा प्रवास सविस्तर बघू.

मुळगाव जळगाव जिल्ह्यातील कोथळी. एका शेतकरी वारकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, वेळप्रसंगी आंदोलन करणे यात ते हिरीरीने पुढे असायचे. तेव्हाच त्यांची मित्रमंडळींमध्ये लोकप्रियता वाढली. पहिल्यांदा कॉलेजचे जीएस झाले. पुढे विद्यापीठाचे सीआर म्हणून निवडले गेले.

नाथाभाऊंनी तेव्हाच ठरवलं कि राजकारणातच करियर करायचं.

शिक्षण सुरु असतानाच त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. पहिल्याच फटक्यात त्यांचा एका मताने पराभव झाला. कॉलेजमधलं राजकारण आणि गावाकडचं राजकारण दोन्ही वेगळं असतं याचा त्यांना अंदाज आला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर गावी परत आले, तळागाळात काम सुरु केलं. याचाच परिणाम काहीच वर्षात ते कोथळी गावचे सरपंच झाले.

त्याकाळी जळगाव खानदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र कोणत्याही पक्षाचं लेबल नसलेले नाथाभाऊ यांनी आपल्या मित्रांसह पॅनल उभं केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवत निवडून देखील आले. कोथळीमध्येच नाही तर जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच एकहाती विजय मिळवत एक तरुण सरपंच बनला होता.

धडाडीने काम करायची शैली, ग्रामस्थांबरोबरच थेट संपर्क, कामाचा झपाटा यामुळे तालुका स्तराबरोबरच जिल्हा पातळीला त्यांचं नाव पोहचलं होतं. पण अजून कुठल्या पक्षाचा शिक्का त्यांच्यावर बसला नव्हता.

नेमके याच काळात दोन तरुण नेते आपला पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी धडपडत होते. त्या पक्षाचं नाव होत भाजप आणि ते दोन नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन. त्याकाळी भाजपला शेठजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखलं जायचं. पण मुंडे महाजन जोडगोळीने अक्षरशः टॅलेंट हंट केल्याप्रमाणे संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि एकएक कार्यकर्ते जोडले.

यातच त्यांनी जळगाव जिल्ह्यात एक तरुण नेता हेरला तो म्हणजे एकनाथ खडसे. जळगाव जिल्ह्यात राहून काँग्रेस विरोधच राजकारण करत असलेल्या आणि त्यात यशस्वी झालेल्या नाथाभाऊंना मुंडे महाजन यांनी भाजप मध्ये आणलं.

या काळात प्रमोद महाजन यांचं केंद्रात देखील वजन वाढलं होतं. वाजपेयींनपासून अडवाणींपर्यंत सगळ्यत नेत्यांची मर्जी त्यांनी संपादन केली होती.  त्यांच्याच आग्रहामुळे भाजपने प्रखर हिंदुत्वाचा स्वीकार केला, राज्यात शिवसेनेशी युती केली. १९९० सालच्या विधानसभा निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी कंबर कसली होती. शिवसेना भाजप युतीच्या दोन्ही पक्षांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात तरुणांना तिकीट दिलं.

एव्हाना नाथाभाऊ भाजपमध्ये येऊन दोन वर्षे झाली होती. तालुका पातळीवर काम करत असलेल्या या नेत्याला आता विधानसभेवर आणायचं असं महाजनांच्या मनात आलं. त्यांनी एकनाथ खडसेंना मुंबईला बोलावून घेतलं. नाथाभाऊ आपल्या निवडक सहकाऱ्यांसह मुंबईला आले.

त्यावेळी प्रमोद महाजनां समवेत वसंतराव भागवत, धरमचंद चोरडिया इत्यादी मंडळी भाजपच्या कार्यालयात हजर होती. प्रमोद महाजनांनी नाथाभाऊंना सांगितलं,

तुला विधानसभेची उमेदवारी करायची आहे.

नाथाभाऊ चाटच पडले. त्यांना हे अनपेक्षित होतं. आमदारकीसाठी अशी त्यांनी कोणतीही तयारी केली नव्हती. ना त्यासाठी लागणारे आर्थिक बळ देखील त्यांच्याकडे नव्हतं. त्यांनी महाजनांना सरळ सांगितलं कि,

माझी तयारी नाही आणि तशी परिस्थिती देखील नाही. 

पण महाजनांनी थोडंसं रागावत अधिकार वाणीने सांगितलं की तुला उमेदवारी करावीच लागेल. जागा निवडून येईल अशी स्थिती आहे. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. काळजी करू नको.

पण तरीही नाथाभाऊंनी नकार देत पुन्हा मुक्ताईनगर गाठलं. तिथे त्यांचे एक सहकारी होते मनोहर वराडे. ते राज्य वीज महामंडळाचे तांत्रिक संचालक होते. महाजनांशी त्यांची चांगली मैत्री होती. त्यांच्यापर्यंत खडसेंच्या नकाराची बातमी पोहचली. प्रमोद महाजनांनी त्यांना खडसेंना तयार करायची जबाबदारी दिली असावी.

वराडेनी नाथाभाऊंना भेटायला बोलावलं. पक्ष पाठीशी असताना तू उमेदवारीला का नाही म्हणतोस म्हणून त्यांची समजूत काढली. कसबसं एकनाथराव खडसेंना त्यांनी आमदारकीसाठी तयार केलं आणि पुन्हा प्रमोद महाजनांच्या भेटीसाठी मुंबईला आले.

तिथे गेल्यावर वराडे थेट महाजनांना म्हणाले,

नाथाभाऊ उमेदवारी करेल.

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत एदलाबाद मतदारसंघातून एकनाथराव खडसे भाजपकडून उभे राहिले. हा पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ होता. खरी लढत काँग्रेस एस आणि काँग्रेस आयच्या उमेदवारांमध्ये होती. डॉ.जी.एन.पाटील आणि हरिभाऊ जवरे हे दिग्गज नेते आपापसात लढत होते. त्या मानाने नवख्या असलेल्या एकनाथ भाऊंकडे कोणाचं लक्षच नव्हतं.

पण ज्याप्रमाणे ससा कासवाच्या लढतीत कासव बाजी मारते त्या प्रमाणे एकनाथराव खडसेंच्या प्रचाराने हळूहळू जनतेमध्ये  पसरवला. त्यांची भाषणे या काळात तुफान गाजली. दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांवर जोरदार आरोपांचा प्रहार करत नाथाभाऊंनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

जो उमेदवार निवडणुकीला उभं राहण्यास देखील तयार नव्हता, ज्याचं डिपॉजिट जप्त होईल अशी भीती वाटत होती ते एकनाथ खडसे २,६६२ मतांनी निवडून आले. नाथाभाऊंनी इतिहास घडवला होता.  निर्माण  दृष्टीने त्यांचं पहिलं पाऊल पडलं होतं.

ज्या महाजनांनी मागे लागून नाथाभाऊंना निवडणुकीला उतरवलं पुढे तेच एकदा खडसेंबद्दल म्हणाले,

“जसं कुंकवाविना सुवासिनी हि कल्पना करवत नाही तशी एकनाथविना विधानसभा हि कल्पनाच करवत नाही.”

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.