आजच्या विजयानं सिद्ध केलं, तो एक पराभव सोडला, तर खडसे आजवर एकही निवडणूक हरलेले नाहीत

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल अखेर लागला. खरंतर या निवडणुकीत खरी लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असली, तरी सगळ्या राज्याचं लक्ष राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडे होतं. खडसेंना हरवण्यासाठी भाजपने स्ट्रॅटेजी आखल्याचंही बोललं गेलं, पण अखेर या निवडणूकीत अनेकांच्या अपेक्षेप्रमाणं खडसे यांनी २९ मतं मिळवत यश मिळवलंय.

२०१४ मध्ये डावलली गेलेली मुख्यमंत्रीपदाची संधी, २०१९ च्या निवडणुकांमध्ये पूर्णपणे साईडलाईन होणं, या घडामोडींनंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर ईडीचा ससेमिराही पाठी लागला. या सगळयात सीडी बाहेर काढीन अशी धमकी देणारे खडसे भाजप विरोधात महाविकास आघाडीला बळ देण्यासाठी सभागृहात कधी पोहोचणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती, ती खडसेंच्या आजच्या विजयानं संपली आहे.

सोबतच आणखी एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, खडसेंनी आपल्या ४८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत फक्त एकच निवडणूक हरलीये. आजच्या विजयानं त्यांनी परंपरा कायम ठेवली असली, तरी हा एकमेव पराभव कुठला होता? त्या पराभवानं त्यांची राजकीय कारकीर्द कशी बदलली हे बघुयात.

एकनाथ खडसेंचा जन्म झाला, शेतकरी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या कुटुंबात. मुक्ताईनगरच्या कोथळी गावातल्या या कुटुंबात राजकारणाशी थेट संबंध असलेलं कुणीही नव्हतं. घरचा मुख्य व्यवसाय होता, शेती. मात्र खडसेंना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यांनी अकोल्यातल्या एल. आर. टी. महाविद्यालयात बी. कॉम. च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि तिथं पदवीही घेतली.

खडसेंच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं, तेव्हा त्यांनी जिंकलेली ग्रामपंचायत निवडणूक आणि प्रस्थापित काँग्रेसला धक्का देत मिळवलेलं सरपंचपद याची कायम चर्चा होते.

 १९८४ च्या कोथळीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये खडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकली आणि खडसे सरपंच झाले.

विशेष म्हणजे १९८८ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी आदल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना पुन्हा निवडून आणलं होतं. या दोन पराभवांमुळे कित्येक वर्ष जळगाव जिल्हा आणि तालुक्यावर वर्चस्व गाजवणारी काँग्रेस खिळखिळी झाली होती.

१९८८ च्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोनच वर्षांनी ते आमदार म्हणून विधानसभेत गेले आणि सलग ६ वेळा त्यांनी आमदारपद भूषवलं. राज्याचे मंत्री, विरोधी पक्षनेते अशा पदांवरही त्यांनी काम केलं. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकी आधी खडसेंना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानलं जात होतं, पण तेव्हा राजकीय समीकरणं बदलली.

जवळपास ३२ वर्ष भाजपमध्ये काम केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा झाली होती, मात्र राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेत संधी दिली. साहजिकच खडसेंची तोफ भाजपविरुद्ध धडाडणार का याची उत्सुकता असेल.

पण आतापर्यंतच्या ४८ वर्षांच्या कारकिर्दित खडसेंचा पहिला आणि एकमेव पराभव झाला होता, तो ग्रामपंचायत निवडणुकीतच.

ज्या ग्रामपंचायत निवडणुकीनं त्यांना आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची संधी दिली, त्याच मैदानात झालेला त्यांचा पराभव गाजला होता.

१९७४ सालची ही गोष्ट, तेव्हा खडसे अकोल्याच्या कॉलेजमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीला ते उभे राहिले होते. विशेष म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि खडसे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले.

या विजयामुळं त्यांचा राजकीय पटावर उतरण्याचा आत्मविश्वास वाढला.

आता त्यांनी गावाच्या राजकारणात जायचं ठरवलं. त्याआधी एक गाव-एक गणपती सारख्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी गावात अंधश्रद्धेमुळं बंद झालेला गणेशोत्सव पुन्हा सुरू केला होता. मात्र गावाच्या राजकारणात उतरणं हा मोठा विषय होता.

तेव्हा मुक्ताई नगरच्या आमदार होत्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. जिल्हा आणि तालुक्याची सत्ता पूर्णपणे काँग्रेसकडे होती. काँग्रेसच्या एकहाती वर्चस्वाला भेदणं कठीण होतं. मात्र तरीही खडसे यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचं ठरवलं. खडसे स्वतः आणि त्यांचं पॅनल निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध उभं राहिलं. तेव्हा खडसेचं वय होतं फक्त २२ वर्ष.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला २२ वर्षांचा मुलगा कोथळीच्या ग्रामपंचायतीसाठी थेट प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहतो या गोष्टीची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. या चर्चेमुळं अनेकांनी खडसेंना पाठिंबा दिला, त्यांच्या धाडसाला यश येईल असं बोललं जात होतं.

निवडणूक पार पडली, निकाल लागला आणि खडसेंचा अवघ्या एका मतानं निसटता पराभव झाला.

त्यांचं पॅनलही थोड्याफार फरकानं पराभवाला सामोरं गेलं. प्रस्थापितांना आपला गड राखण्यात यश आलं. गावाबाहेर राहून गावाचं राजकारण चालवण्याचा प्रयत्न करण्याचा धोका खडसेंनी पत्करला मात्र तो फसला. हा खडसेंचा राजकारणाच्या रिंगणातला पहिला पराभव ठरला, जो फक्त एका मतानं झाला होता.

यानंतर मात्र त्यांनी कोथळीचं पुनर्वसन घडवून आणणं, सहकार क्षेत्र आणि पंचायत समित्यांवर वर्चस्व स्थापन करत, थेट राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं नाव होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. 

आजच्या विधान परिषद निवडणुकीत बाजी मारत खडसे मोठ्या सेटबॅकनंतर कमबॅक करत आहेत.

विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ”वेगवेगळे आरोप करुन मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला.  एवढं करुन माझा छळ थांबला नाही, ईडीची चौकशी झाली, जावयाला अटक करण्यात आली, राहती घरं मोकळी करण्याचे आदेश ईडीनं देत मला बेघर करण्याचा प्रयत्न केला. अकाऊंटला एकही पैसा ठेवला नाही. राजकीय विजनवासात जाण्याची परिस्थिती असताना  शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला साथ दिली. एकप्रकारे माझं राजकीय पुनर्वसनच केलं. ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे आभार मानतो. सीडी असेल किंवा काहीही योग्य वेळी सगळं बाहेर काढलं जाईल.”

त्यामुळं सभागृहात ते भाजपचा वचपा काढत ते त्यांची कोंडी करणार का ? त्यांच्या विजयाचा राष्ट्रवादीला कसा फायदा होईल ? या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळणार आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.