हिमाचल प्रदेश विधानसभा २०२२ ; मोदींचे स्टार कॅबिनेट अनुराग ठाकूर CM पदाचे दावेदार ?

नुकत्याच हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या. येत्या १२ नोव्हेंबरला ६८ जागांसाठी हिमाचलमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत बघायला मिळणार आहे. 

एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे भाजप कंबर कसून प्रचाराला लागलेले दिसत आहेत. भाजप त्यांचं ‘मिशन रिपीट’ पुन्हा यशस्वी कसं होईल याकडे त्यांचं लक्ष आहे. यासंबंधी आप आणि कम्युनिस्ट पार्टी वगळता अजून कोणी आपले उमेदवार जाहीर केले नाहीयेत. 

खरंतर ‘आप’ हे भाजपच्या मूळ टेन्शनचं कारण नाहीच आहे, खरी चुरस असणारे भाजप आणि काँग्रेसची आणि भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी यंदा अनुराग ठाकूर यांचं नाव चांगलंच चर्चेत येताना दिसतंय. 

चर्चेत जरी असले तरीही अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतात का याचा विचार करणे गरजेचे आहे.

अनुराग ठाकूर यांच्याबद्दल जाणून घेऊया. अनुराग ठाकूर यांचा जन्म हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचा. त्यांचे वडील हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल आहेत. प्रेम कुमार धुमल यांचे कनिष्ठ पुत्र म्हणजेच अनुराग ठाकूर. 

अनुराग यांच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात २००८ मध्ये झाली जेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री पदावर होते.. २००९ आणि २०१४ च्या हमीरपूरच्या मतदार संघातून त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार म्हणून ते लोकसभेत गेले. २०१४ मध्ये त्यांना ऑल इंडिया भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष घोषित करण्यात आलं. 

२०१९ साली त्यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते भाजपचे पहिले असे खासदार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

१९९१ ची एकता रॅली आठवते? तशीच रॅली २०११ मध्ये अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा संघाने सुद्धा काढली होती. ही यात्रा जानेवारी महिन्यात कोलकातामधून सुरु झाली आणि श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून याची सांगता झाली होती. अनुराग ठाकूर यांच्याच नेतृत्वात ही यात्रा सफल झाली होती.  २०१९ मध्ये राज्याच वित्त खातं अनुराग यांच्या हातात सुपूर्द करण्यात आलं होतं. 

अरुण जेटली यांचं आश्रयस्थान म्हणून अनुराग यांच्याकडे बघितलं जायचं. त्यांचा राजकारणातला आत्तापर्यंतचा आलेख कायम चढत्या क्रमाने राहिला आहे मग तो आपल्या मुख्यमंत्री राहिलेल्या वडिलांच्या छत्रछायेमुळे असो किंव्हा मग स्वतःच्या जोरावर असो. 

म्हणूनच त्यांचं धडाडीचं नेतृत्व हे त्यांना हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री बनवण्यासाठीच मुख्य कारण आहे.

२०१७ च्या हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकी वेळी सुद्धा अनुराग ठाकूर यांचं नाव बरंच चर्चेत आलं होतं. २०१७ च्या निवडणुकीला प्रेम कुमार धुमाल यांचा काँग्रेस नेत्यांमधून पराभव झाला होता. प्रेम कुमार धुमाल हे २००७ ते २०१२ पर्यंत हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या विदर्भ सिंग यांनी त्यांचा पराभव केला होता. जेव्हा २०१७ मध्ये पुन्हा निवडणूक घ्यायची वेळ आली तेव्हा कँडिडेटच्या यादीत अनुराग यांचं नाव सर्वात वर होतं. 

आपल्या वडिलांचा वारसा चालवत मुलाने निवडणूक लढवावी आणि एक नवा चेहरा पार्टीला मिळावा अशा अर्थी त्यांचं नाव घेतलं जात होतं पण त्यावेळी संधी मिळाली ती जयराम ठाकूर यांना.

त्यादरम्यान अनुराग ठाकूर युनियन कॅबिनेट मिनिस्टर झाले. २०२१ मध्ये झालेल्या कॅबिनेट फेरबदलात त्यांना माहिती प्रसारण, युवा कार्यक्रम आणि खेळ अशी खाती मिळाली आहेत. वडिलांचा वारसा, खासदारकी, केंद्रात मंत्रिपद त्यामुळे २०१७ च्या मानाने त्यांची ताकद यंदाच्या निवडणुकीत वाढलेली दिसून येते. याच मजबूत झालेल्या त्यांच्या प्रतिमेचा वापर त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो असं चित्र दिसत आहे.

भाजपला उत्तरप्रदेश, हरियाणा या राज्यांसह आता हिमाचलमध्येही सलग दुसऱ्यांदा आपली सत्ता आणायची आहे हे स्पष्ट आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या तीन विधानसभा व एक (मंडी)लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने चारही जागांवर भाजपवर मात केली होती. 

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना महागाईच्या मुद्द्याने झालेली हार मान्य करावी लागली. तसंच मंडी हा जयराम ठाकूर यांचा बालेकिल्ला समजला जातो तिथे काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांनी जयराम यांना हरवून त्यांना मोठा धक्का दिला होता. 

हिमाचल प्रदेशात काँग्रेस तसं पाहता आधीएवढा मजबूत पक्ष राहिलेला नाही. पार्टीकडे जिंकून येईल असा ठोस चेहरा नाही. प्रतिभा सिंग यांचं नाव पुढे येत असलं तरी त्यावर पक्षाचा विश्वास नाहीये. असं असलं तरी याआधीच्या ४ निवडणुकीत भाजप काँग्रेस सामना २-२ असा बरोबरीचा घडला आहे. यावर्षी ही लढत ३-२ करण्याकडे भाजपच लक्ष असणार हे स्पष्ट आहे.

तसं नाही म्हणायला भाजपला ‘आप’ चं देखील टेन्शन आहेच म्हणा…

आम आदमी पार्टीला स्वतःचा विस्तार करत करत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचा आहे. त्यासाठी दिल्ली-पंजाब आणि आता आप चं गुजरात लक्ष्य आहे. सोबतच आप ला हिमाचल प्रदेशसुद्धा जिंकायचा आहे आणि त्यासाठी आप ने इतर पक्षांच्या तुलनेने सर्वात आधी प्रचाराला सुरुवात केली आहे. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका स्टेटमेंटमध्ये अनुराग ठाकूर यांचा उल्लेख केला होता. एप्रिल महिन्यात ते असं म्हटले होते, “भाजप जय राम ठाकूर यांच्या जागी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बनविण्याचा विचार करत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वाढत्या लोकप्रियतेसह निवडणुकीत पराभवाची भीती असल्याने भाजपला मोठा बदल करायचा आहे.” असं घडलं तर नाही पण येत्या काळात अनुराग ठाकूर हा एक सेफ पर्याय भाजप शकतो.

तुम्ही जर पाहिलं असेल तर बिलासपूरची रैली असो किंवा एकूणच हिमाचल प्रदेशमध्ये एवढ्यात झालेल्या प्रचार सभांमध्ये अनुराग ठाकूर यांचा सक्रिय सहभाग होता. पंतप्रधान मोदी यांनी वंदे भारत, बल्क ड्रग पार्क अशा मोठ्या सुधारणा आणि रोजगार हमीच्या घोषणा केल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटला अनुराग ठाकूर यांनी दुजोरा देत मोदी सरकार आपल्या प्रदेशात टिकवून ठेवायचे प्रयत्न सुरु ठेवलेत.

हिमाचल प्रदेशात नेहमीच सत्ता परिवर्तन झालं आहे. या सत्ताबदलात इथे राजपूत समाज निर्णायक ठरतो. त्यात अनुराग ठाकूर हे हिंदू राजपूत समाजातील आहेत.

राज्याच्या स्थापने पासून हिमाचल मध्ये राजपूत जातीचं वर्चस्व राहिलं आहे.  तसेच ब्राह्मण मतदारांची संख्या सुद्धा जास्त आहे. यामुळे काँग्रेस असो की भाजप राजपूत मते आपल्या बाजूला कशा प्रकारे राहतील यासाठी प्रयत्न करत असतात. २०२२ च्या निवडणुकीत हाच फार्मुला काँग्रेस, भाजप बरोबर आप ने सुद्धा स्वीकारल्याचे पाहायला मिळते.

त्यामुळेच अनुराग ठाकूर यांचं राजपूत असणं भाजपसाठी महत्वाचं आहे कारण हिमाचल प्रदेशच्या स्थापनेपासून एक गणित फिक्स आहे, ज्यांच्या बाजूनं राजपूतांची मतं, सत्ता त्यांचीच येत असते.

मागच्या वेळेस काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना बघायला मिळाला आहे. काँग्रेसचे वीरभद्र सिंग आणि भाजपचे प्रेम कुमार धुमल यांच्यात कायम चुरस राहिली आहे. यावेळी भाजपचे जयराम ठाकूर यांच्यासाठी मोठी परीक्षा असणार आहे. या सगळ्याचा फायदा नक्कीच अनुराग ठाकूर यांना होऊ शकतो आणि एक कुशल नेतृत्व म्हणून त्यांची वर्णी लागू शकते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.